डिजिटल
सजगता (Digital Mindfulness): तंत्रज्ञानाच्या
युगातील मानसिक समतोल
आजचे
सामाजिक-मानसिक वास्तव हे पूर्णतः डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे. स्मार्टफोन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI),
सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, ऑनलाइन मीटिंग्स
आणि 24x7 उपलब्धतेच्या अपेक्षांमुळे मानवी जीवन अधिक वेगवान,
सोयीस्कर आणि माहितीसमृद्ध झाले आहे. तथापि, मानसशास्त्रीय
संशोधन स्पष्टपणे दर्शवते की या डिजिटल सुलभतेची एक गंभीर किंमत मानसिक आरोग्याला
मोजावी लागत आहे. लक्ष विचलन, मानसिक थकवा, चिंता, नैराश्य, अवसाद, झोपेचे
विकार आणि सामाजिक ताण-तणाव हे डिजिटल अतिरेकाचे ठळक परिणाम म्हणून पुढे येत आहेत
(Rosen, Lim, Smith, 2011).
याच
पार्श्वभूमीवर डिजिटल सजगता ही संकल्पना केवळ उपयुक्त नाही, तर अत्यावश्यक ठरते. डिजिटल सजगता म्हणजे तंत्रज्ञानाचा त्याग करणे नव्हे,
तर तंत्रज्ञानाचा सजग, जाणीवपूर्वक, मर्यादित आणि उद्देशपूर्ण वापर करणे होय. यामध्ये व्यक्ती तंत्रज्ञानाच्या
स्वयंचलित सवयींना बळी न पडता, स्वतःच्या मानसिक अवस्थेची,
गरजांची आणि परिणामांची सतत जाणीव ठेवते. अशा प्रकारे, माणूस तंत्रज्ञानाचा गुलाम न होता, त्याचा सजग
वापरकर्ता बनतो.