अनुमान प्रमाण
अनुमानाने
होणारे ज्ञान हे ज्ञानेंद्रियांच्या बाहय वस्तूंशी सन्निकर्ष न होता निर्माण होते.
सांख्यकारिकेत अनुमानाची व्याख्या, ’लिंगलिंगीपूर्वकम
ज्ञानमनुभानम!’ अशी केली आहे. सांख्यमतानुसार अनुमान ज्ञान
हे व्याप्त-व्यापाक आणि पक्षधर्मता यांच्या ज्ञानावर आधारलेले असते. म्हणजेच
अनुमान हे व्याप्तीवर आधारलेले असते. सांख्याना न्यायाचे पंचावयवी (प्रतिज्ञा,
हेतू, उदाहरण, उपनय व निगमन) वाक्य मान्य आहे. सांख्यमतानुसार व्याप्ती ही
अनौपाधिक असली पाहिजे. औपाधिक व्याप्तीवर अनुमान आधारता येत नाही.
तर्कशास्त्रामध्ये
अनुमानाच्या दोन प्रकाराबाबत चर्चा केलेली आढळते. तर्कशास्त्र हे युक्त
अनुमानासंबंधीचे सामान्य नियम शोधून काढते व त्यांची पद्धतशीर व्यवस्था लावते.
यावरून त्याचे मुख्य दोन प्रकार.
अ. निगामी अनुमान
(Deductive): निगामी अनुमानास निगमनात्मक अनुमान
असेही म्हणतात. 'दिलेल्या
सामान्य विधानाच्या सहाय्याने विशिष्ट गोष्टीविषयी निष्कर्ष अनुमानित करण्याच्या
प्रक्रियेस निगामी अनुमान असे म्हणतात.
उदा.१. सर्व
माता प्रेमळ असतात.
माधुरी ही माता आहे.
म्हणून माधुरी ही प्रेमळ आहे.
उदा. २. जेथे
जेथे धूर आहे तेथे अग्नि आहे.
या पर्वतावर धूर आहे.
म्हणून या पर्वतावर अग्नि आहे.
वरील दोन्ही
उदाहरणमध्ये आपण सामान्य नियमापासून विशिष्ट गोष्टीविषयी निष्कर्ष काढला आहे.
त्यामूळे ती निगामी अनुमाने ठरतात.
ब. विगामी
अनुमान (Inductive) : विगामी अनुमानास विगमनात्मक अनुमान असेही
म्हणतात. 'दिलेल्या
विशिष्ट विधानांच्या सहाय्याने सामान्य विधाने (नियम) अनुमानित करण्याच्या
प्रक्रियेस विगामी अनुमान असे म्हणतात.
उदा.१. रामाने
विस्तवास हात लावला त्याला भाजले
शामने विस्तवास हात लावला त्याला भाजले
कृष्ण, गोविंदा, गोपाळ इत्यादीनी विस्तवास हात लावला त्यामूळे त्यानाही भाजले.
म्हणून, विस्तवास हात लावल्यास सर्वांना भाजते.
उदा.२. अ' मनुष्य मृत्यू पावला
ब मनुष्य मृत्यू पावला
क', 'ड', 'इ', 'फ' इत्यादी अनेक माणसे मृत्यू पावली
म्हणून सर्व माणसे मृत्यू पावतात.
वरील दोन्ही
उदाहरणामध्ये आपण विशिष्ट विधानापासून, विस्तवास हात लावल्यास भाजले व सर्व माणसे मृत्यू पावतात. असा सामान्य
नियम निष्कर्षित केलेला आहे. त्यामूळे ती विगामी अनुमाने ठरतात.
सर्वसामान्यपणे अनुमानाचे वरील दोन प्रकार
सर्वत्र अभ्यासले जातात. त्यामुळे यासंबंधीची माहिती आपणास तर्कशास्त्रात अधिक
पाहायला मिळेल.
अनुमानाचे प्रकार: सांख्य
वीत आणि
अवीत असे अनुमानाचे दोन प्रकार आहेत. ‘वीत’ अनुमानात व्याप्ती ही प्रामुख्याने
हेतू व साध्यपद यांच्यातील भावसाहचर्यांने प्राप्त होत असते.
उदा:- जेथे जेथे धूर तेथे तेथे अग्नी असतो
हे वाक्य वीत अनुमानाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. वीतानुमानात अन्वय व व्यतिरेक
या दोन्ही पध्दतींची व्याप्ती तयार होते. वीतानुमानाचे पूर्ववत (कारणापासून
संभाव्य कार्य होणे जसे ढग आणि पाऊस) आणि सामान्यतोदृष्टी (शिंगे असलेला प्राणी
दिसला तर सामान्यत: त्यास शेपूट असते) असे दोन उपप्रकार आहेत.
‘अवीत’
अनुमान हे शेषवत (सापाची कात दिसल्यास साप येऊन गेला) अनुमान असते व ते केवळ
व्यतिरेकी व्याप्तीवर म्हणजे अभाव साहचर्चावर आधारलेले असते. सांख्याचे अनुमान
विषयक मत न्याय-वैशेषिक मताशी जवळजवळ पूर्णपणे जुळणारे आहे.
न्यायानी मान्य केलेल्या ज्ञानाच्या चार प्रमाणात
अनुमान या प्रमाणाला फार उच्च स्थान आहे. किंबहुना अनुमानाचा इतका खोल विचार व अभ्यास
भारतात प्रथम न्यायशास्त्रानेच केलेला आहे. अनुमान हा तर्कशास्त्राचा अत्यंत महत्वाचा
घटक आहे. किंबहुना रुढ भाषेत तर्क करणे हे अनुमान करण्याशी समानार्थक समजले जाते.
अनुमानाविषयी न्यायाची कामगिरी अत्यंत भरीव व चिरस्थायी ठरली आहे.
अनुमान हा शब्द अनु + मान म्हणजे दुसऱ्या
एका ज्ञानानंतर येते असे ज्ञान. अनुमान हे आधी झालेले एक ज्ञान गृहीत धरते.
पूर्वानुभव असल्याशिवाय अनुमान करता येत नाही. अनुमान म्हणजे तर्कानी जगणे होय. तो
एक प्रकारचा अंदाज असतो. अनुमानात ज्याच्यापासून अनुमान केले जाते ते दृश्य किंवा
प्रत्यक्ष असते व जे जाणले जाते ते अदृश्य किंवा अदृष्ट असते. अनुमानापूर्वी
प्रत्यक्ष ज्ञान घडलेले असावे लागते. वात्स्यायनाच्या मते प्रत्यक्षाशिवाय अनुमान
शक्य होत नाही. उद्योतकाराने प्रत्यक्ष व अनुमानात्मक ज्ञानातील फरक खालील रीतीने
केलेला आहे.
1. योगजज्ञान वगळता सर्व ज्ञान एकाच प्रकारचे असते,
तर अनुमानाचे मात्र विविध प्रकार असतात.
2. प्रत्यक्ष हे फक्त वर्तमानकाळात घडू शकते व ज्ञानेंद्रियांच्या
कक्षेत जेवढे येते तेवढेच प्रत्यक्षाने समजू शकते, तर अनुमान
हे भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळांना लागू पडते.
3. अनुमानाला व्याप्ती व स्मरणाची गरज असते, तर प्रत्यक्षाला तशी काही गरज लागत नाही. जेथे प्रत्यक्ष उपलब्ध होते तेथे
अनुामनाची गरज पडत नाही. शिवाय ज्यांचे ज्ञान निश्चित झालेले असते किंवा जे
पूर्णपणे अज्ञात असते अशांच्या बाबतीत अनुमानाचा काहीही उपयोग होत नाही. फक्त
ज्याच्याविषयी संदेह असतो अशांच्या बाबतीतच अनुमानाचा उपयोग होत असतो. दृष्य वस्तुपासुन
अदृश्य वस्तूचे ज्ञान होण्यास अनुमान मदत करते. अनुमानाचे वर्णन करताना
न्यायसारांत म्हंटले आहे की, ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या
बाहेर असणाऱ्या गोष्टींचे त्यांच्या इंद्रियग्राहय वस्तूशी असणाऱ्या
व्याप्तिसंबंधाच्या मदतीने जे ज्ञान होते ते अनुमान ज्ञान होय.
अनुमान हे अप्रत्यक्ष प्रकारचे ज्ञान असते
ते कोणत्या तरी माध्यमाच्या मार्फत असते. कोणत्यातरी चिन्हाच्या (लिंगाच्या)
मदतीने जे अदृश्य असते त्यांचे ज्ञान जेव्हा केले जाते तेव्हा ते अनुमान होते.
उदा - धूर दिसला म्हणजे त्यांच्या जवळपास
अग्नी असला पाहिजे, असा जेव्हा आपण अंदाज करतो त्याला अनुमान म्हणतात. ज्यांच्या मार्फत किंवा
ज्यांच्या दर्शनावरुन अदतदृश्य वस्तूचे अनुमान केले जाते त्याला लिंग किंवा हेतू
म्हणतात.
उदा- धूर हे अग्नीचे लिंग आहे व अग्नी हे
साध्य आहे. ज्याचे अनुमान केले जाते त्यास साध्यपद म्हणतात व ज्याच्या बाबतीत
अनुमान करावयाचे असते त्यास पक्ष म्हणतात.
उदा - या पर्वतावर अग्नी आहे. या विधानात
हा पर्वत पक्षपद आहे. अग्नी साध्यपद आहे व धूर हे मध्यपद/ लिंग आहे. मध्यपदाची
पक्षपदात उपस्थिती असावी लागते, तिला ‘पक्षधर्मता’ असे म्हणतात आणि लिंगाचा साध्याशी जो नित्यनिरपवाद
संबंध असतो त्यास ‘व्याप्ति’ म्हणतात. पक्षधर्मतेने सीमित झाालेल्या व्याप्तिला
परामर्श म्हणतात म्हणून ‘परामर्शनन्यं ज्ञानं अनुमितीः’ अशी अनुमानाची व्याख्या
केली जाते आणि व्याप्तिविशिष्ट पक्षधर्मताज्ञानं परामर्श:! अशी परामर्शाची
व्याख्या केलेली आहे. धूर व अग्नी याचे उदाहरण घ्यावयाचे झाल्यास जेथे जेथे धूर
असतो तेथे तेथे अग्नी असतो.
या पर्वतावर धूर आहे.
\या पर्वतावर अग्नी आहे असे संविधान मांडले
जाते.
दिङ्नागाच्या व त्याच्या मताचा इतरांच्या दृष्टीने
अनुमान हे फक्त संवेद्य सत्तेच्या पातळीवरच युक्त असते. अंतिम सत्ता अनिर्वचनीय व
अव्याख्येय असल्यामुळे आणि ती सर्व कल्पना
व विचार यांना अगम्य असल्यामुळे तिच्याशी अनुमानाचा कोणताही संबंध येत नाही.
त्यांच्या मते अनुमानाची निर्मिती विचार व बुध्दी ही करीत असतात, आणि व्यावहारिक सृष्टीत
अनुमानाचे स्थान महत्वाचे असते हे नाकारता येणार नाही. देश, काल,
परिस्थिती यांच्या भेदांमुळे अनुमानाची सत्यता संशयास्पद ठरु शकते
हे भर्तुहरीचे म्हणणे शांतरक्षित व धर्मकिर्ती यांना मान्य नाही. त्यांच्या मते
पुरापासून अग्नीचे अस्तित्व अनुमानित होणे हे टाळता येणारच नाही.
पूर्व मीमांसक अनुमान हे ज्ञानाचे दुसरे महत्वाचे
प्रमाण मानतात. सर्वच ज्ञान प्रत्यक्ष पध्दतीने प्राप्त होत नाही ही गोष्ट
सर्वमान्य आहे. प्रत्यक्ष ज्ञानाला गंभीर मर्यादा पडतात. प्रत्यक्षज्ञान हे
प्रत्येक व्यक्तिला वेगळे होत असते आणि त्यात इंद्रिये व विषय यांचा प्रत्यक्ष
सन्निकर्ष होणे अत्यावश्यक असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक विषयाशी
प्रत्येक वेळी सन्निकर्ष होईलच तशी शक्यता फार थोडी असते. जगात अनंत वस्तू व घटना
असतात व त्या प्रतिक्षणी बदलत असतात. त्या सर्वांशी सर्वच व्यक्तींना स्वतः
वैयक्तिक संबंध प्रस्थापित करुन त्या जाणणे केवळ अशक्य असते म्हणून ‘अनुमान’ हे
ज्ञानप्राप्तीचे अप्रत्यक्ष साधन म्हणून महत्वाचे असते, आणि फार मोठया प्रमाणात
मानवास ज्ञान अनुमानाच्या मार्गे मिळत असते.
संदर्भ:
दीक्षित श्री. (2009). भारतीय तत्वज्ञान, कोल्हापूर: फडके प्रकाशन
जोशी, ग. ना. (2004 ). भारतीय तत्वज्ञानाचा बृहद् इतिहास खंड – 1 ते 12, पुणे: शुभदा सारस्वत प्रकाशन
सरदेसाई, एस. जी. (2001). भारतीय
तत्त्वज्ञान : वैचारिक आणि सामाजिक संघर्ष, मुंबई: लोकवाङमय गृह
ठाकरे, भू. मा. (2004). तर्कशास्त्र. पुणे: कुंभ प्रकाशन
जोशी आणि कुलकर्णी (2009). तत्वज्ञान तर्कशास्त्र, पुणे: कॉन्टिनेन्टल
प्रकाशन
धन्यवाद
उत्तर द्याहटवा