विषारी लोक | टॉक्सिक पीपल | Toxic
People
शौर्य दहा वर्षाचा असताना एका मुलाबरोबर
त्याचे कडक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे कारण होते तो मुलगा अर्वाच्य शिवीगाळ
करतो म्हणून पण कोल्हापूर सारख्या शहरात शिवी ही सर्वसामान्य मानली जाते. शौर्यला
विचारले की शिवी दिली म्हणून काय झाले? त्यावर तो म्हणाला होता की “त्याच्या अशा
वागण्याने आमच्या खेळात व्यत्यय येतो आणि सर्वजन खेळ सोडून एकमेकांना शिवी देतात
आणि शेवट भांडणाने होतो. त्यामुळे तो मुलगा जवळून जरी गेला तरी त्रास होतो
त्यामुळे त्याच्याशी खेळणे टाळतो.” आपणासही असा अनुभव आला असेल की काही लोक आपल्या
जवळ असतील तर खूपच आल्हाददायक वाटते आणि काही लोक कधी निघून जातील असे वाटत राहते.
आपण नेहमी आल्हाददायक लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो तर विषारी लोकांना
टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो.
आपल्याभोवती अनेक प्रकारचे लोक वावरत
असतात. विचारांनी काही चांगली असतात, तर काही वाईट आणि व्यवहाराने काही खराब असतात तर काही आपल्यासाठी विषारी असतात.
यापैकी बहुतेक लोकांना आपण सहज ओळखू शकतो, परंतु विषारी लोकांना
ओळखण्यात अडचणी येतात. कधीकधी आपण त्यांना ओळखण्यात खूप उशीर केला किंवा आपणास
त्यांची कधीही ओळख पटली नाही तर अशा लोकांच्या सहवासात राहून आपण नेहमीच स्वत:वर
संशय घेऊ लागतो. असे लोक आपल्या मानसिक व भावनिक आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात.
चला तर मग जाणून घेऊया विषारी लोक कोण, कसे आणि का असतात.
आपल्या
आयुष्यात एखादी विषारी व्यक्ती आहे का?
मदत न करणारे, अनावश्यक बडबड करणारे आणि जटिल लोक आपल्या जीवनातील
सर्वात मोठे आव्हान असतात. आपणास आधार देणारे, प्रेमळ आणि ज्यांच्याबरोबर वेळ व्यतीत
करण्याने आनंद मिळतो अशा लोकासमवेत रहायला आवडते. पण आपल्या बालपणीचा एखादा खडूस
वर्गमित्र, नेहमी छुल्लक कारणावरून भांडण काढणारा शेजारी, कोणत्याही गोष्टीवरून
टोमणे मारणारे नातेवाईक, त्याच्या मनासारखे काम करूनही ओरडणारा बॉस, कितीही चांगली
सेवा देऊनही खेखसणारे गिऱ्हाईक या लोकांना काहीवेळासाठी आपण टाळू शकतो. आपल्या
जीवनात काही लोक असे असतात ज्यांना आपण कधीच टाळू शकत नाही ते म्हणजे वारंवार
अनावश्यक उपदेश करणारे पालक आणि सर्वात जवळचे एकमेकांना शत्रू मानणारे नवरा किंवा
बायको. तर अशा विषारी लोकांपासून आपला बचाव कसा करून
घ्यायचा या मोठा गहन प्रश्न. आपल्या जीवनात येणाऱ्या विषारी
लोकांशी कसे
व्यवहार करू शकतो, थांबवू शकतो आणि ती कशा पद्धतीने हाताळू
शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत.
हानिकारक लोक कसे ओळखावे?
1. स्वकेंद्रित
लोक
आपण बोलत असताना काही लोक आपल्या संभाषणात अडथळा आणतात का? किंवा असे
काही लोक आपल्या भोवती आहेत का की जे स्वत:विषयी बोलण्यात धन्यता मानतात. असे लोक आपणास
कोणताही प्रश्न विचारत नाहीत, ते आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षाही
करीत नाहीत आणि स्वत: गप्पही बसत नाहीत. नातेसंबंधात, हे लोक
पूर्णपणे स्व-केंद्रित असतात आणि इतरांच्या आवश्यकतांकडे कधीच लक्ष देत नाहीत. असे
लोक एखाद्या दु:खद कार्यक्रमातही आपल्यामुळे असे झाले, मी होतो म्हणून असे घडले,
केवल मी आणि मी........................ त्यामुळे अशा लोकांना गावाच्या वेशीवर
सोडून या किंवा यांच्या बोलण्यात मनोरंजन शोधा.
2.
नियंत्रणप्रिय लोक
नियंत्रणप्रिय लोक सर्व गोष्टींवर आणि आसपासच्या प्रत्येकावर नियंत्रण
ठेवू इच्छित असतात. आपण काय करतो, आपण काय बोलतो आणि आपण काय विचार करतो
यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा व्यक्ती आपल्या सर्वांच्या आवतीभोवती
नेहमी आढळतात. जेव्हा आपण या लोकांशी सहमत नसतो तेव्हा ते कावरेबावरे होतात आणि
आपण बरोबर असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करत राहतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे
आपण वागावे/करावे असे पटवून देत असतात. नातेसंबंधात अशा व्यक्ती इतरांना श्वासोच्छवास
घेण्यास दमछाक लावतात आणि जोपर्यंत आपण पूर्णपणे त्यांच्या मनासारखे करत नाही
तोपर्यंत आपल्या कार्यात सतत अडथळा आणतील. सावधगिरी बाळगा, हे लोक आपल्या भावनिक, संभाषण आणि
मानसिक स्वातंत्र्यावर घाला घालतात. जर शक्य असेल तर त्यांच्या तावडीतून बाहेर पडा!
3. भावनिक शोषण
भावनिक शोषण करणाऱ्या या व्यक्तींना "अध्यात्मिक शैतान" म्हणून देखील
ओळखले जाते कारण ते आपल्यातील सकारात्मकता शोषून घेतात किंवा भावनिक कोरडेपणा आणतात.
हे लोक नेहमीच काहीतरी दु:खी, नकारात्मक किंवा निराशावादी बोलत
असतात. संभाषण आणि नातेसंबंधांमध्ये ते कधीही सकारात्मकपणे पाहत नाहीत आणि
सर्वांना आपल्याच पातळीला आणण्याचा त्यांचा कल असतो. आपण इतराबरोबर असतो तेंव्हा
हे लोक त्यांनी आपल्यावर किती उपकार केले, आपण होतो म्हणून आपले निभावले,
त्यांच्यामुळेच आपले निभावले नाहीतर काय झाले असते....... वेळीच अशा लोकांना
त्यांची जागा दाखवून द्या नाहीतर हे लोक आयुष्यभर आपले भावनिक शोषण करत राहतील,
त्यामुळे वेळीच सावध व्हा.
4. चुंबकीय लोक
काही विषारी लोक चुंबकासारखे असतात. अशा
लोकांच्याबाबतीत नेहमीच चुकीचे घडत असते, एखादी समस्या सुटल्यानंतर आणखी एखादी समस्या
उद्भवलेली असतेच. अशा लोकांना केवळ आपली सहानुभूती, परानुभूती आणि समर्थन हवे असते पण सल्ला नको असतो. आपली मदत आणि समस्येचे
उत्तर त्यांना नको असते कारण कधीही काहीही निराकरण करण्याची त्यांची इच्छा नसते.
त्याऐवजी ते तक्रार आणि केवळ तक्रार करत असतात. नातेसंबंधात, चुंबकीय लोक पीडित असतात आणि स्वत:ला संकटात ओढून घेतात, कारण यामुळे
त्यांना महत्त्व प्राप्त होते असे वाटत असते. जर असा एखादा संकटाचा दीपस्तंभ असेल
तर सावध रहा, कदाचित आपण एके दिवशी या नाटकाचा भाग होऊन जाऊ.
5. ईर्ष्यावान लोक
ईर्ष्यावान लोकांना आनंदी लोकांची अॅलर्जी असते. ईर्ष्या किंवा मत्सर
करणारे लोक आश्चर्यकारकपणे विषारी असतात कारण त्यांच्यात इतका आत्म-द्वेष असतो की
तो आजूबाजूच्या कोणालाही आनंदी होऊ देत नाहीत. सहसा, या लोकांचा मत्सर
हा त्यांच्या न्याय-निवाडा, टीका किंवा गप्पांमधून दिसून येतो. त्यांच्या मते, इतर लोक भयंकर, शांत आणि कशाचीतरी
कमतरता असणारे असतात. जर एखादी व्यक्ती इतर लोकांबद्दल ईर्ष्या आणि मत्सरयुक्त गप्पा
मारण्यास सुरुवात केली तर सावध रहा, ही एक विषारी
व्यक्ती असू शकते आणि आपल्या पाठीमागे आपल्याबद्दलही अशाच पद्धतीने गप्पा मारत असते.
6. थापा
मारणारे
थापा मारणारे लोक खोटारडे, अफवा
पासरविणारे, अतिशयोक्ती करणारे असतात. आपल्या जीवनात अशा विषारी
लोकांमुळे फसवणूक, मानहानी सारखे त्रास होऊ शकतो. असे लोक अनेकदा छोटे-मोठे खोटे
बोलत असतात, नातेसंबंधामध्ये अशा लोकांवर विश्वास ठेवणे
अशक्य बनते. आपल्यातील प्रामाणिकपणा कमी होऊ लागतो कारण आपण त्यांच्या प्रत्येक शब्दांवर
सतत शंका घेत असतो आणि त्यांच्या सहवासामुळे आपला स्वभाव संशयी बनून जातो. जर आपणास
अंतर्ज्ञानी आवाज ऐकू येत असेल तर सावध व्हा; आपणही
त्यांच्यासारखेच बणण्यापूर्वी त्या लोकापासून फारकत घ्या.
7. हेकेखोर लोक
हेकेखोर लोकामुळे सर्वकाही चिरडले जाते. हेकेखोर लोक नेहमी स्वत:लाच बरोबर
समजत असतात,
कोणाच्याही भावना किंवा कल्पना विचारात घेत नाहीत आणि सतत स्वत:ला प्राधान्य
देत असतात. नातेसंबंधात, असे लोक गर्विष्ठ असतात आणि त्यांची
वैयक्तिक मते वस्तुस्थिती म्हणून दुसऱ्यावर थोपवतात. अशा व्यक्ती वारंवार स्वत:ला खोलीत
सर्वात हुशार व्यक्ती समजतात, म्हणूनच ते प्रत्येक संभाषण
आणि व्यक्तीला एक आव्हान म्हणून पाहतात त्यामुळे त्यांना जिंकणे आवश्यक बनते.
क्वचितच असे लोक इतरांना समानतेची वागणूक देतात, इतरांशी प्रेमळ नातेसंबंध
प्रस्थापित करणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक असू शकते. आपला आदर केला जात नाही किंवा
आपल्या कल्पना समाप्त झालेल्या आहेत असे आपणास वाटू लागल्यास अशा लोकांपासून दोन
हात लांब रहा.
8. अफवा पसरवणारे:
"उच्च
विचारसरणी असणारे लोक नवीन कल्पनांवर चर्चा करतात, सरासरी
विचारसरणी असणारे लोक घटनांविषयी चर्चा करतात आणि निम्न विचारसरणीचे लोक लोकांविषयी
चर्चा करतात." - रुझवेल्ट
अफवा पसरवणारे लोक इतर लोकांच्या दुर्दैवात आनंदीत होतात. सुरुवातीस एखाद्याच्या
वैयक्तिक किंवा व्यावसायिक चुकांमध्ये डोकावून पाहणे मजेदार असेल, परंतु
कालांतराने हे कंटाळवाणे बनत जाते, पण अफवा पासरविणारे त्यातून आनंद मिळवितात. करोना
महामारीच्या काळात व्हाटसअॅप आणि फेसबूक सारख्या सामाजिक माध्यमावर अफवांचा महापूर
दिसत आहे. मानसोपचार तज्ज्ञाच्या मते, अफवा पसरवणारे
स्वतःच मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात. परंतु अनेकदा हे लोक बनेल आणि पाताळयंत्री
असल्याचे लक्षात आलेले आहे. कारण सारासार विचार न करणारे जे सर्वसामान्य लोक या
अफवांची शिकार होतात, ते अनाम भीतीने पछाडले असतात. असे लोक
एकतर देवाच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांचे हक्काचे ग्राहक होतात किंवा
समाजकंटकांसाठी सामाजिक उत्पात घडवण्यासाठी स्फोटकांच्या रूपाने आयते उपलब्ध
होतात. अशांच्या गराड्यात राहताना, आपण सुरक्षित आहोत,
हीच एकदिवस अफवा ठरेल.
विषारी
व्यक्ती आसपास असण्याची लक्षणे:
विषारी व्यक्तिमत्त्वाचे प्रकार समजावून घेत असताना आपणास कोणाची आठवण
झाली का? जर आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल ज्यास पाहण्याची भीती वाटते,
जो आपल्या मतांचा आदर करीत नाही आणि आपली प्रतिमा दुर्बल, नाकाम
किंवा आश्रित बनली असेल तर सावधान व्हा!
- आपणास अशा व्यक्तींना सतत जतन करावे लागते आणि त्यांच्या समस्या सोडवाव्या लागतात.
- आपण त्यांना लपवावे लागत असेल किंवा त्यांच्या चुकांवर पडदा टाकावा लागतो.
- आपण अशा व्यक्तींच्या दर्शनाने घाबरत आहात.
- अशा व्यक्तीबरोबर बाहेर गेल्यावर आपणास हतबलता जाणवते.
- आपल्या आसपास अशा
व्यक्ती आल्यास आपणास राग येतो, उदास वाटते किंवा निराश होता.
- असे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याशी गप्पा मारतात.
- आपणास अशा लोकांना प्रभावित करावेसे वाटणे.
- आपण त्यांच्या नाटकीपणा किंवा समस्येमुळे प्रभावित आहात.
- असे लोक आपल्या गरजाकडे दुर्लक्ष करतात आणि ‘नाही’ हा शब्द एकूण घेत नाहीत.
विषारी
लोकांपासून मुक्त होण्याचे मार्ग:
आपण एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहोत आणि
आपली स्वत:ची अशी वेगळी मते आहेत याची जाणिव हवी. तसेच खालील प्रात्यक्षिक मार्ग
आपणास अशा व्यक्तिपासून मुक्त होण्यास मदत करतील.
- मुद्दामहून लक्ष वेधून घेणार्याकडे दुर्लक्ष करा.
- अफवांवर विश्वास ठेवणे किंवा शेअर करणे थांबवा.
- विश्वासू आणि निष्ठावान मित्रांबरोबर वेळ घालवा.
- हेराफेरी करणाऱ्या लोकापासून लांब रहा.
- खोटारडया लोकांना आपल्या स्वत:वर हावी होऊ देऊ नका.
- क्षुल्लक संघर्षात आणि प्रसंगात अडकू नका.
- चिडविण्यासाठी होणाऱ्या अपमानाकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे.
- अशा व्यक्तींना आपल्या प्रश्नांची उत्तरे सरळ देण्याची मागणी करा.
- स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
- समस्यांवर नव्हे तर निराकरणांवर लक्ष केंद्रित करा.
आपण आपल्या आयुष्यात अद्भुत, मदत करणाऱ्या आणि प्रेमळ लोकासोबत राहण्यास पात्र आहोत. खरं तर, आयुष्य खूपच छोटे असल्याने आपणास सर्वश्रेष्ठ बनण्यात मदत न करणाऱ्या विषारी लोकांच्यात वेळ घालवू नये. आपली संगत आपला उत्कर्ष निश्चित करत असते. त्यामुळे जीवनात चांगल्या लोकांची संगत करून जीवन सुखी समाधानी बनविता येते. मला आशा आहे की आपण या लेखातील माहितीचा वापर विषारी लोकांविरूद्ध लसीकरण म्हणून कराल. धन्यवाद!
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
Bern,
E. (2016). Games People Play: The Psychology of Human Relationships, New York: Penguin
Life, Available: https://amzn.to/338xTpl
Alkhteb,
M. (2020). What to Do to Toxic People: Strategies to Handle Manipulators, Leave
Toxic Relationships, and Set Boundaries, France: worthyinside.com, Available: https://amzn.to/3tb63mX
Arabi,
Shahida (2020). The Highly Sensitive Person's Guide to Dealing with Toxic
People: How to Reclaim Your Power from Narcissists and Other, New York: New Harbinger
Available: https://amzn.to/33brQQO
Cantopher, T. (2017). Toxic People: Dealing with
Dysfunctional Relationships, UK: Sheldon
Press, Available: https://amzn.to/3ucmJvO
Cox,
S. (2018). Toxic People: Letting Go: Identify Them in Your Home and Work, and
Learn How to Avoid Being Damaged by Them (Psychology Now) Available: https://amzn.to/2PGCRXe
Glass, Lillian (2012). TOXIC PEOPLE: 10 Ways of
Dealing with People Who Make Your Life Miserable, New York: Simon and Schuster, Available: https://amzn.to/2PJl2XJ
Griffith,
J. (2021). How to Deal with Toxic People: Do You Know Someone Toxic who puts
your life in Conflict? I Would like to offer you a way to Exclude Toxic and ...
life, or to Limit their Influence on You. UK: Charlie Creative Lab, Available:
https://amzn.to/3ujwics
Iton,
N. (2019). Toxic People. The Rules of the Game: How to Identify and Deal with
Toxic, Irrational and Difficult People in Your Life (Kindle Edition) Available: https://amzn.to/33b9xLz
खूप छान लेख आहे.
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिलंय सर👌
उत्तर द्याहटवाVery nice article
उत्तर द्याहटवाVery nice article
उत्तर द्याहटवा👌👌👌👌
उत्तर द्याहटवा