शांतता: अशांत जगामध्ये मौनाचे सामर्थ्य | Silence: The Power of Quiet in a World Full of Noise
निसर्ग
नियम आपणास असे सुचवितो की, मनुष्याच्या बहुतेक
समस्यांचे निराकरण स्वतः मनुष्य करू शकतो. जर एखाद्याच्या जीवनात काही अडचणी येत
असतील तर ती व्यक्ती स्वत:च्या इच्छेनुसार काही निश्चित वेळेत त्या अडचणींतून
मुक्त होऊ शकते. यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे काही काळ पूर्णपणे शांत राहणे,
न बोलणे आणि स्वतःच समाधानावर विचार करणे. काही दिवस असे केल्याने
लवकरच सकारात्मक परिणाम दिसू लागतील.
संभाषण बुद्धिमत्तेसाठी मौल्यवान
ठरवू शकते, परंतु मौन म्हणजे प्रतिभेची शाळा. जगातील सर्व
तत्त्ववेत्ते हे सर्व मौनाचे साधक होते. आचार्य विनोबा म्हणायचे - "शांतता
आणि एकांत हे मनाचे सर्वोत्तम मित्र आहेत." सामान्य जीवनात मौन पाळणे शक्य
नसते, म्हणून लक्षात ठेवा की आवश्यक तेवढे बोलावे. मनावर जितके शक्य असेल
तितके नियंत्रण ठेवल्याने आपल्या मनाची शक्ती जमा होते त्यामुळे जीवनातील बऱ्याच
प्रश्नांची उत्तरे आपसूकच मिळतील.
सर्वसामान्यपणे आपण मौनाचा अर्थ असा घेतो
की शांतता म्हणजे ओठ न हलवणे पण हा अगदी मर्यादित अर्थ आहे. कबीर म्हणाले आहेत:
-
कबीरा यह गत अटपटी, चटपट लखि न जाए। जब
मन की खटपट मिटे, अधर भया ठहराय।
अधर म्हणजे ओठ, जेव्हा मनाची खटपट नाहीसे
होते तेव्हाच ओठ प्रत्यक्षात शांत होतात. आपले ओठ अधिक हालचाल करतात कारण आपले मन
विचलित झालेले असते आणि जोपर्यंत मन अशांत आहे तोपर्यंत ओठ हलत राहणार, कारण मूळ
गोष्ट मनाची अशांतता आहे. शांतता म्हणजे आतून आणि बाहेरून शांत असणे.
त्यामुळे असे समजू नका की एखाद्यास
निशब्द पाहून तो मौन झाला आहे. तो खूप जोरात ओरडत आहे, शब्द न
उच्चारता ओरडत आहे. तो बोलत आहे, फक्त आवाज ऐकू येत नाही एवढेच,
शब्दरहित, मूर्खपणाला मौन म्हणू शकत नाही. मौन हे आंतरिक तप आहे, म्हणून ते
अंतर्गत खोलीकडे जाते. शांततेच्या क्षणी, आंतरिक जगाचे
नवीन रहस्य उघड होतात. निसर्गाच्या नवनवीन रहस्याबरोबर सात्विक प्रेरणा घेऊन काही
क्षण शांत राहू शकतात. शांततेत अपार सामर्थ्य आहे, ते आपणास केवळ
नवी ऊर्जा देत नाही, तर आपणास बाह्य जगाचे निर्विकार स्वरूप
पाहण्याची दृष्टी देते.
गौतम बुद्ध आणि मौन:
एकदा गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी
एका गावातून चाललेले असतात, गावातून जात असताना अचानक एक माणुस त्यांच्यासमोर येऊन
उभा राहतो. तो माणूस प्रचंड संतापलेला असतो. रागाच्या भरात बुद्धांना बरंच काही
बोलत असतो. तुम्ही ज्ञानी नाही, तुम्ही विद्वान नाही, तुम्ही योगी नाही, तुम्ही ढोंगीपणा
करताय, तुम्ही लोकांना फसवताय आणि बरंच काही.... तो इतका संतापलेला असतो कि
बुद्धाना शिव्यासुद्धा देतो. गौतम बुद्ध मात्र हे सगळं शांतपणे ऐकत असतात पण
त्यांच्यासोबत असणाऱ्या अनुयायांना हा प्रकार सहन होत नाही ते त्याच्या अंगावर धाऊन
जाऊ लागतात. पण गौतम बुद्ध मात्र त्यांना हातानेच शांत राहण्याची खून करतात. इकडे
या माणसाची बडबड मात्र सुरूच असते. आपण यांना इतक वाईट बोलतोय तरीसुद्धा समोरून
काहीच प्रतिक्रिया येत नाही हे जेंव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मात्र तो थोडासा
वरमतो, शांत होतो आणि बुद्धांनाच प्रतिप्रश्न करतो की मी तुम्हाला वाईट बोलतोय, मी
तुम्हाला शिव्या देतोय तरीसुद्धा तुम्हाला राग येत नाहीये, तुम्ही इतके शांत कसे
राहू शकता.
गौतम बुद्ध शांतपणे याच त्याच्या
प्रश्नावर त्याला प्रतिप्रश्न करतात, समजा तु एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी एखादी
वस्तू समोरच्याकडे घेऊन गेलास आणि त्या व्यक्तीने ती भेटवस्तू स्वीकारलीच नाही तर ती
भेटवस्तू कोणाची झाली. तो माणूस मुळात खूप
चिडलेला असतो तो गौतम बुद्धाना म्हणतो की हा काय प्रश्न झाला? त्यांनी ही भेटवस्तू
स्वीकारली नाही म्हणजे ती माझीच झाली ना; माझ्याकडेच राहिल ना; पण त्याचा इथे काय
संबंध. मंद स्मितहास्य करीत बुद्ध त्या व्यक्तीला म्हणतात की, वत्सा तु आतापर्यंत
जे काही अपशब्द, शिव्या आम्हाला दिल्यास त्या कशाचाही स्वीकार आम्ही केलेला नाही
त्यामुळे त्या तुझ्याकडेच राहिल्या आहेत. आता मात्र तो माणूस भानावर येतो आणि त्याला
त्याची चूक लक्षात येते आणि तो बुद्धांना शरण जातो.
आजच्या धकाधकीच्या युगात विचार केला तर
इथे एक गोष्ट लक्षात येते की आपण काय करत आहे, तर आपण प्रत्येक क्रियेस प्रतिक्रिया
देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे कुठेतरी मी हरवत जातो. सकाळी उठल्यापासून
रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी आपल्या समोर येत असतात त्याचा स्वीकार करायचा कि नाही
हे सर्वस्वी आपल्या हातात असताना आपण सगळ्याच गोष्टींचा स्वीकार करत जातो. आपल्यापैकी
प्रत्येकजण फेसबुक, ट्विटर, इनस्टाग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप वर आहे आणि नानाविध विचारांची
माणसं त्या ग्रुपवर असतात. कधीतरी कोणीतरी
खोडसाळपणे एखादा मेसेज ग्रुपवर पोस्ट करतो आणि मग क्रिया-प्रतिक्रिया,
वाद-प्रतिवाद यांचा अक्षरशः पाऊस पडतो त्यामुळे कळत-नकळतपणे आपण सुद्धा त्या
भाऊगर्दीत सामील होऊन जातो.
शांतता: अशांत जगामध्ये मौनाचे
सामर्थ्य
झेन गुरु थिक नाट हान (Thich Nhat Hanh)
यांनी आपल्या वास्तवाचे परीक्षण आणि सुधारणा करण्याच्या महत्वाच्या कार्यपद्धती सांगताना
शांततेचे महत्त्व सांगितलेले आहे. आपले मन हे निरंतर विचार करणारे रेडिओ स्टेशन आहे,
त्यामध्ये एक विचार संपण्यापूर्वी दुसऱ्या विचाराने जागा घेतलेली असते. हे सततचे
आवाज आपल्या विचार कौशल्यांना आकार देत राहतात आणि दु:खाच्या सागरात लोटतात. परंतु
मौन बाळगल्यामुळे आपण या आवाजामधील रिकाम्या जागा पाहू शकतो आणि आपण खरोखर कोण
आहोत आणि आपले ध्येय काय आहे हे शोधून काढू शकतो. हा व्यावहारिक मार्ग आपल्या
अंगभूत क्षमता पुन्हा नव्याने शोधण्यासाठी मदत करतो. थिक नाट हान यांनी शांतता:
अशांत जगामध्ये मौनाचे सामर्थ्य (Silence: The
Power of Quiet in a World Full of Noise) या पुस्तकात वरील विचार मांडलेले आहेत. सदर
पुस्तकातील मुख्य मुद्दे तपासून त्याचा सारांश खालीलप्रमाणे सांगता येईल.
“शांतता म्हणजे अबोल नव्हे, बहुतेक गोंगाट
आपल्या स्वत:च्या डोक्यात व्यस्त असतात.”
शांतता: अशांत जगामध्ये मौनाचे सामर्थ्य हे पुस्तक बौद्ध भिक्षू आणि नोबेल पीस पुरस्कार नामांकित थिक नाट हान यांनी लिहिलेले आहे. राग, भीती, द्वेष आणि इतर भावनांबद्दल पुस्तकांमध्ये त्यांनी संकलित केलेली संकल्पना ‘सजगता’ ही दिशा देणारी भावना आहे. पाश्चिमात्य देशातील सर्वात प्रिय बौद्ध गुरुपैकी एक. त्यांचे वर्णन रहस्यमय, कवी, अभ्यासक आणि कार्यकर्ते यांचे संयोजन म्हणून केले आहे, जे बुद्धांच्या विचराने प्रेरित होऊन लिखाण करतात.
सदर पुस्तकात थिक नाट
हान हे आत आणि बाहेरील गोंधळाकडे आपले लक्ष वेधून घेतात आणि आवाजाने भरलेल्या
जगात शांतता शोधण्यास प्रवृत्त करतात. केवळ बाह्य जगाच्या अनागोंदी गोष्टीकडे लक्ष
देण्याची गरज नाही तर आपले ह्रदय आणि मन देखील सतत वायफळ बडबड आणि विचारांनी भरलेले
आहे त्यामुळे आपण आनंद आणि समाधान यांच्याशी संपर्क साधू शकत नाही. जीवनाचा आवाज
ऐकण्यासाठी आपणास शांतता आणि सजगता आवश्यक आहे ज्यामुळे सावधपणे जीवनाचा आवाज ऐकण्यास
मदत होईल.
“व्यक्तीच्या जीवनात जितकी प्राणवायू आवश्यक तितकीच
शांतता आवश्यक आहे, जितके वनस्पतींना प्रकाशाची आवश्यकता
असते. जर आपल्या मनात शब्द आणि विचारांची गर्दी झाली असेल तर आपल्या स्वत:साठी
जागा असणार नाही.”
सदर पुस्तकात विविध प्रसंग, सोप्या बौद्ध
शिकवणी आणि व्यावहारिक सरावांची मांडणी आहे जे आपणास शांततेच्या मार्गाने मनापासून
जगण्यास मदत करते. आपण गोंधळलेल्या परिस्थितीचे गुलाम बनलेले आहोत त्यामुळे गोंधळ
हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आपल्या आजूबाजूला उत्तेजनाचे एक खुले
मैदान आहे ज्यामुळे आपल्याला शांततेची भीती वाटते. आपण अविरत विचारांच्या इतके
आहारी गेलेलो आहोत जेव्हा जेव्हा आपला सामना होतो तेव्हा शांततेचा आवाजही “गडगडाट”
वाटायला लागतो आणि एकांतपणात काय करावे हे आपणास सुचत नाही. या पुस्तकात सखोल ऐकणे, स्थिरतेचे सामर्थ्य, अवधानाचे महत्त्व
आणि हितसंबंध जोपासणे या विषयांना स्पर्श केला गेला आहे.
आपण जे अनुभवतो आणि जाणवतो ते आपण
असतो. जर आपण रागावलेले असू तर आपणास रागाचा अनुभव येईल. जर आपण प्रेमात असू तर आपणास
प्रेम दिसेल. आपण जसे जगाकडे पाहू त्याच दृष्टिकोनातून जग दिसेल. सकारात्मक भावनांना
सामोरे जाण्यासाठी आणि जीवनाचा संपूर्ण अनुभव घेण्यासाठी, आपण आपल्या वैयक्तिक
स्वपेक्षा मोठे असणे आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या डोक्यात भरलेल्या आवाजापासून
आराम मिळेल.
या पुस्तकातील काही महत्त्वाचे
मुद्दे खालीलप्रमाणे:
वैयक्तिक जाणीव आणि सामूहिक जाणीव - लोक सामुदायिक
शत्रुता किंवा कळपांच्या मानसिकतेत का अडकतात? आपल्या समजूतदारपणा आणि प्रेमाच्या
बियाणांना सभोवतालच्या लोकाकडून खत-पाणी दिले जाते - आपण आपल्या आसपासच्या
लोकांकडूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता शोषून घेत असतो; त्यामुळे
लोकांची निवड काळजीपूर्वक करा.
जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वास - प्रत्येक श्वास आणि
उच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने शरीर आणि मनाची सजगता जागृत होते.
नॉन स्टॉप अंतर्गत बडबड – आपल्यामध्ये अंतर्गत एक
रेडिओ स्टेशन आहे जे आपले अंतर्गत संवाद सतत चालू ठेवते. आपण आपले विचार जनावरांसारखे
रवंथ (डोक्यात घोळवत) करत असतो. खाद्यपदार्थांप्रमाणेच वेदनिक आहाराचेही मनापासून
सेवन करणे आवश्यक आहे.
विचार न करण्याची कला - श्वासोच्छवासावर लक्ष
केंद्रित करून शरीर आणि मन यांच्यातील संबंध पुन्हा प्रस्थापित करणे, यासाठी धैर्य
आणि सराव आवश्यक आहे.
जागरूकता जपणे – ध्यान-धारणा करणे म्हणजे शांत
बसून विचार करणे असा नाही. आपल्या वास्तव मनासाठी जागा तयार करण्यासाठी कल्पना, विचार आणि संकल्पना मांडण्याची
आवश्यकता आहे. आपण गर्दीच्या ठिकाणी असूनही एकांततेचा आनंद घेऊ शकतो.
आनंददायक विरूद्ध त्रासदायक शांतता - कोणीतरी आपणास
सक्ती करीत आहे म्हणून ध्यान-धारणा करू नका तर आपणास दहा किंवा पंधरा किंवा तीस
मिनिटे सक्तीने बसण्याची आवश्यकता आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत जागरूक
रहा.
ऐकण्याची कला – आपण नेहमी संभाषण करतो परंतु
समोरच्या व्यक्तीस समजणे कठीण जाते? आपण केवळ श्रवण करतो पण ऐकत
नाही, म्हणून आपले प्रतिसाद हे सजग नसतात आणि त्यामुळे प्रामाणिक संवाद गमावून
बसतो.
स्थिरतेची शक्ती - आपण खरोखरच जगतो आहोत कि केवळ
जिवंत आहोत?
जेव्हा सजगता आणि एकाग्रता आपल्यात येयेईल तेव्हा आपण स्वतःच
स्वत:चे होऊन जातो.
दु:खाचा सामना करताना – सजग श्वासोच्छ्वास आणि
शांतता आपणास केवळ आनंदच देत नाहीत तर वेदना आणि भीतीची जाणिव करून देतात कारण आपण
आपल्या अंतःकरणात असलेल्या दुःख आणि नकारात्मक भावनात्मक उर्जाबद्दल अधिक सजग होतो.
समज, करुणा व प्रेरणा विकसित होण्यासाठी दुःखाची ओळख, स्वीकार व परिवर्तन
घडविणे आवश्यक आहे.
स्वचे बेट - जेव्हा आपले आतील आणि बाह्य वातावरण
विविध आवाजाने भरलेले असते तेव्हा आपण नेमके कुठे असतो हे आपणास माहित आहे काय? एकटेपणाचे दोन
परिमाण आहेत – एक शारीरिकरित्या एकटे राहणे, आणि एखाद्या
गटातही केंद्रस्थानी राहणे. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा
प्रेम-जिव्हाळा नकोत नुसत्या नाती या विमल लिमये यांच्या कवितेतील ओळी समर्पक लागू
होतात.
हितसंबंध जोपासणे – आपण आज सेलफोन, ईमेल, सोशल मीडिया आणि संवादाच्या विविध माध्यमांच्या युगात आहोत, परंतु कुटूंब आणि सामाजिक सदस्यांमध्ये उल्लेखनीय संवाद फारच कमी आहे. आपण
इतरांशी कनेक्ट होऊ इच्छित असल्यास, आपण त्यांना अधिक मजकूर
पाठविण्याची गरज नाही, परंतु अधिक चांगल्या प्रकारे समजून
घेण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यासाठी वास्तविक बोलणे आणि सक्रियपणे ऐकणे
आवश्यक आहे.
वास्तविक नातेसंबंधांची शक्ती - शांतता आणि सजगता
आपणास अर्थपूर्ण मैत्री आणि नातेसंबंध विकसित करण्यास, सकारात्मक उर्जेच्या
सामूहिक सवयी विकसित करण्यास आणि एकमेकांना पोषक करण्यास मदत करते.
शांततेचे आपल्या जीवनातील महत्त्व:
कोणत्याही स्व-प्रेरणा पुस्तकाची ताकद
लेखकाच्या वक्तृत्व आणि लिखाणावर अवलंबून नसून ती लेखन प्रत्यक्षात आणण्यावर
अवलंबून असते. म्हणूनच, आधी सांगितल्याप्रमाणे अशा पुस्तकांचे पुनरावलोकन
करणे कठीण आहे. थिक नाट हान अशा शैलीत लिहितात जे अगदी सहज पोचण्याजोगे आणि आपली जिवानाशी
संबंधित आहे – हे पुस्तक छत असताना प्रत्यक्ष झेन गुरूशी संभाषण करण्यासारखे आहे. परंतु
पुस्तकाचे खरे परिणाम त्याच्या सुचविलेल्या पद्धतींचे पालन करण्यामध्ये आहे.
शांत राहण्यामुळे स्व-जाणिव, आत्मविश्वास, एकाग्रता आणि
मनाची शांतता यात वाढ होते. शांत राहिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीस सकारात्मक विचार करण्याची
चालना मिळते. शांत राहिल्यामुळे शरीरातील उर्जा संचय वाढतो आणि आपण कोणतेही कार्य पूर्ण
क्षमतेणे करू शकतो. अनावश्यक बोलण्यामुळे ऊर्जा खर्च होते त्यामुळे आपण विनाकारण बोलून
केवळ आपली उर्जा आणि क्षमतेचा दुरूपयोगच करत असतो. आपण शांत राहिल्यामुळे इतरांचे म्हणणे
काळजीपूर्वक ग्रहण आणि आकलन करू शकतो आणि त्यामुळे आपली सारासार आणि स्थिर विचार करण्याची
शक्ती वाढते.
मौन धारणा ही एक मोठी साधना आहे, ज्यामुळे आपली
मानसिक ताकद वाढते आणि त्यामुळे बौद्धिक साधनेच्या
सर्वच क्षेत्रात मौनास मान्यता मिळालेली आहे, मानसशस्त्रज्ञ आणि
करियर तज्ज्ञ हे स्मृती क्षमता वाढविणे, एकाग्रता, चिरशांती आणि सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी मौन साधनेस महत्त्व देतात.
जेव्हा आपण मौन धारण करतो तेंव्हा स्व-संवाद सुरू होतो, स्व-मूल्यांकन केल्याने नवीन
मानसिक ऊर्जा प्राप्त होते व या छोट्या बदलामुळे आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक
बदल झालेला दिसून येईल.
मौन हा जीवनात शक्ती संचय करण्याचा सर्वोत्तम
मार्ग आहे, हे संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहे. अधिक आणि निरर्थक बोलण्यामुळे
संघर्ष होण्याची शक्यता अधिक असते. अत्यंतिक गोंगाटात केवळ मौनच कार्य करू शकते.
त्यामुळे शांतता हा अनेक प्रकारच्या समस्यांवरील सोपा उपाय आहे. हे एक अद्वितीय
शस्त्र म्हणून कार्य करते. मौन हे शांततेचे दुसरे नाव आहे. वैचारिक द्वंद्व आणि
द्वेष हे मौन बाळगल्यामुळे शांत होतात. मौन एखाद्या व्यक्तीमध्ये सहनशीलता जागृत
करते, ज्यामुळे राग शांत करतो. तसेच मौन हे विचारमंथनात प्रभावी भूमिका
बजावते. मौन हे केवळ आंतरिक जाणीव होण्यास मदत होत नाही तर स्व-बोध होण्याची शक्यता
देखील वाढवते.
“Silence
is an answer too”
संदर्भ:
Thich
Nhat Hanh (2015). Silence: The Power of Quiet in a World
Full of Noise. London: Penguin Random House
Turner,
G. (2015). The power of silence: the riches the lie within. New York: Bloomsbury
USA
शांततेसाठी मौनच कसे उपयोगी पडते याचे आपण अतिशय छान विश्लेषण केले सर💐💐💐💐
उत्तर द्याहटवाKhup Chan
उत्तर द्याहटवाKhup chan arth sangitalay sir silence kiti mahtvacha aahe aaplya jivnat khup chan mandlay
उत्तर द्याहटवाSilence is the power of mind ...Very nice sir.
उत्तर द्याहटवाखुपच माहितीपुर्ण...
उत्तर द्याहटवा