सोमवार, १८ एप्रिल, २०२२

ऑक्युपेशनल थेरपी | Occupational Therapy

 

ऑक्युपेशनल थेरपी | Occupational Therapy

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि तणावपूर्ण कार्यस्थळ यामुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत आहेत, ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व कटकटीतून मुक्त होण्यासाठी आपणास तज्ञांची मदत घ्यावी लागते. संबंधित तज्ज्ञ आपल्यावर विविध पद्धतींनी उपचार करून समस्येपासून मुक्ती देतात. त्याच वेळी, ते आपणास मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात. काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांना भेटण्यापूर्वी किंवा भेटल्यानंतर काही तज्ञांची सेवा घ्यावी लागते. अशा तज्ञांची विशेषतः वैद्यकीय सेवा, ट्रॉमा सेंटर आणि फ्रॅक्चर व्यवस्थापनासाठी आवश्यकता असते. या सर्व सोयी सुविधा ऑक्युपेशनल थेरपी अंतर्गत पुरविल्या जातात. या संबंधित व्यावसायिकांना ऑक्युपेशनल थेरपिस्ट असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे कार्य फिजिओथेरपिस्ट सारखे असते, यामुळेच त्यांना वैद्यकीय आणि फिटनेस क्षेत्रात मोठी मागणी आहे. सद्याच्या तणावपूर्ण परीस्थितीत ऑक्युपेशनल थेरपी हे एक असे क्षेत्र आहे जिथे प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी पुरवठ्यापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्टची भारतातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे.

ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय?

डॉक्टर, परिचारिका आणि फिजिओथेरपिस्ट व्यतिरिक्त, आरोग्य व्यावसायिकांची आणखी एक श्रेणी आहे जी रुग्णांना त्यांच्या पायावर परत उभे राहण्यास मदत करतात. हा एक व्यावसायिक थेरपिस्टचा गट आहे. व्यावसायिक थेरपिस्ट मानसिक किंवा शारीरिक आजार किंवा अपंगत्व असलेल्या लोकांना सामान्य जीवन जगण्यासाठी आणि शक्य तितके सक्रिय राहण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या शब्दांत, व्यावसायिक थेरपिस्ट लोकांना एक उद्देशपूर्ण आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले जीवन जगण्याची कौशल्ये शिकवतात. हे थेरपिस्ट रुग्णांना कामावर परत येण्यास आणि वेदनिक, कारक, संवेदनिक आणि बोधनिक उपक्रमाद्वारे दैनंदिन जीवनातील सामान्य कार्ये करण्यास सक्षम बनवतात. व्यावसायिक थेरपिस्ट वैकासिक अपंगत्व, अध्ययन अक्षमता, ऑटिझम, अर्धांगवायू, पाठीचा कणा आणि मेंदूच्या दुखापती, संधिवात, नैराश्य, स्किझोफ्रेनिया, स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सनसारख्या विविध प्रकारचे रोग आणि विकारांच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

ऑक्युपेशनल थेरपीचा इतिहास

इ.स.पू. 100 वर्षांपूर्वी एस्क्लेपियाड्स (Asclepiads) नावाच्या ग्रीक डॉक्टरने याचा शोध लावला. संगीत, मसाज, व्यायाम आणि थेरपीयुक्त स्नान याद्वारे त्यांनी मानसिकदृष्ट्या अपंगांवर उपचार सुरू केले. 18 व्या आणि 19 व्या शतकात, काही देशांमध्ये मतिमंद विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी या पद्धती वापरल्या जात होत्या. 20 व्या शतकात, यास ऑक्युपेशनल थेरपी असे नाव देण्यात आले. 1910 मध्ये, अमेरिकन ऑक्युपेशनल थेरपी असोसिएशनने अधिकृतपणे 'ऑक्युपेशनल थेरपी' असे नाव दिले.

अभ्यासक्रम आणि पात्रता

भारतातील 25 हून अधिक संस्था ऑक्युपेशनल थेरपीच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम पुरवतात. भारतातील ऑक्युपेशनल थेरपीशी संबंधित कार्यक्रमांना ऑल इंडिया ऑक्युपेशनल थेरपिस्ट असोसिएशनने मान्यता दिली आहे. यात डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

  • उमेदवाराकडे ऑक्युपेशनल थेरपीमधील किमान बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. किंवा विद्यार्थ्याने ऑक्युपेशनल थेरपीमध्ये B.Sc केले आहे. 
  • उमेदवार रुग्णासोबत काम करण्यास आणि त्यांना प्रेरित करण्यास सक्षम असावा.
  • त्याचे संवाद कौशल्य खूप चांगले आणि प्रभावी असावे.
  • संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • लोकांना शारीरिकरित्या बरे करण्याची तसेच त्यांना मानसिकरीत्या आराम देण्याची क्षमता असली पाहिजे.

डिप्लोमा अभ्यासक्रम

जर आपल्याकडे 12 वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) असेल तर आपण 3 वर्षांचा डिप्लोमा इन ऑक्युपेशनल थेरपी कोर्स करू शकता.

पदवी अभ्यासक्रम

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र घेऊन बारावी करणाऱ्यांना साडेचार वर्षांचा बॅचलर प्रोग्राम करता येतो. बॅचलर स्तरावर बी.एस्सी. इन ऑक्युपेशनल थेरपी आणि बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी अभ्यासक्रम आहेत.

पदव्युत्तर अभ्यासक्रम

विज्ञान विषयात पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी ऑक्युपेशनल थेरपीमध्ये एम. एस्सी. च्या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये एम.एस्सी. आणि पीजी स्तरावर ऑक्युपेशनल थेरपीचे मास्टर कोर्स उपलब्ध आहेत. पीजी डिप्लोमा प्रोग्राम 2 वर्षांचा असतो. बर्‍याच संस्थांमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा असते. राष्ट्रीय पुनर्वसन प्रशिक्षण आणि संशोधन संस्था कटक, भारतीय आरोग्य आणि शिक्षण संशोधन संस्था पटना, इंद्रप्रस्थ विद्यापीठ दिल्ली, दिल्ली ग्रामीण विकास संस्था याव्यतिरिक्त ऑक्युपेशनल थेरपीचे अभ्यासक्रम पुरविणारे महाराष्ट्रातील काही महाविद्यालये आणि विद्यापीठे खालीलप्रमाणे.

  • Seth GS Medical College, Mumbai
  • LTMMC MumbaiLokamanya Tilak Municipal Medical College
  • AIIPMR Mumbai – All India Institute of Physical Medicine and Rehabilitation
  • TNMC Mumbai – Topiwala National Medical College and BYL Nair Charitable Hospital
  • Government Medical College and Hospital, Nagpur
  • Dr DY Patil University, Navi Mumbai

अभ्यासक्रम

या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शरीररचनाशास्त्र, जैवरसायनशास्त्र, शरीरविज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, पॅथॉलॉजी, सुक्ष्मजीवशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, सर्जरी आणि मेडिसिन, मानसोपचार, मानसशास्त्र या विषयांचा समावेश असतो. या कोर्समध्ये वर्गातील प्रशिक्षणाबरोबरच थेरपी क्लिनिकमधील व्यावहारिक सत्रांचा समावेश असतो.

करिअर आणि नोकऱ्या

जर आपणास लोकांना मदत करण्यासं आवडत असेल आणि कायमचे किंवा तात्पुरते शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या लोकांसाठी काही करायचे असेल किंवा वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांसाठी काही करायचे असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी खूप चांगले आहे. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रमाणन परीक्षेला बसावे लागते. त्यानंतर परवाना मिळतो. एकदा परवाना मिळाल्यावर, आपण व्यक्तिशः सराव करू शकता. सराव करण्यासाठी परवाना अनिवार्य आहे.

सध्या लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मानसिक, भावनिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा विकारांवर मात करण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्ट काम करतात. आपण या क्षेत्रात फ्रीलान्सर म्हणूनही काम करू शकता. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परदेशात जाण्याची चांगली संधी आहे.

कामाचे स्वरूप

सल्लागार, ऑक्युपेशनल थेरपी तंत्रज्ञ, ऑक्युपेशनल थेरपी नर्स, पुनर्वसन थेरपी सहाय्यक, स्पीच आणि लँग्वेज थेरपिस्ट, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर, लॅब टेक्निशियन, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, नॅशनल सेल्स मॅनेजर आणि ऑक्युपेशनल थेरपी इनचार्ज इत्यादी. ऑक्युपेशनल थेरपिस्ट कोर्स पूर्ण केल्यानंतर परवाना घेऊन सरकारी आणि खाजगी रुग्णालये, मानसिक आरोग्य सेवा केंद्रे, पुनर्वसन केंद्रे, प्रौढ सेवा सुविध केंद्रामध्ये नोकरी मिळू शकते. आपली इच्छा असल्यास एक थेरपिस्ट किंवा सल्लागार म्हणून आपले स्वतःचे क्लिनिक देखील उघडू शकता.

  • शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या लोकांना आवश्यक ते उपचार प्रदान करणे.
  • रुग्णांच्या शारीरिक किंवा मानसिक प्रगती अहवालावर लक्ष ठेवणे.
  • ट्रॉमा सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेणे. 
  • रुग्णालयांच्या आपत्कालीन आणि फ्रॅक्चर व्यवस्थापन विभागात काम करणे.
  • जे शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत त्यांना त्यांचे जीवन सुरळीत करण्यासाठी मदत करणे.
  • ज्या लोकांना मानसिक विकार आहेत त्यांना दैनंदिन काम पूर्ववत करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
  • रूग्णांना बरे करण्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे उपचार आणि व्यायाम शिकविणे.

आवश्यक कौशल्ये

हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना संवेदनशीलतेपासून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा लागतो, कारण यामध्ये त्यांना रुग्णांच्या वेदना समजून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे आवश्यक आहे. उत्तम संवाद कौशल्य, टीमवर्क, मेहनत, जोखीम घेणे आणि दबाव हाताळणे यासारखे गुण या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बहुतेक काम वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने केले जातात, यासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्टचे ज्ञान खूप महत्वाचे आहे.

पगार

अमेरिकेतील ऑक्युपेशनल थेरपिस्टचा सरासरी वार्षिक पगार सुमारे $70,000 किंवा सुमारे 5 दशलक्ष आहे. भारतात सुरुवातीला 10 ते 12 हजार रुपये मिळतात. काही वर्षांचा अनुभव मिळाल्यास आपणास बंपर पगार मिळू शकतो.

आपल्या मुलास बालरोगविषयक ऑक्युपेशनल थेरपीची आवश्यकता असू शकेल अशी काही चिन्हे जेवढ्या लवकर लक्षात येतील तेवढ्या लवकर आपण सावध होऊ शकतो ती लक्षणे जसे वयानुसार विकासाचे टप्पे गाठण्यात अडचणी, सुक्ष्म कारक कौशल्यांसंबंधी समस्या, स्थूल  कारक कौशल्यांसंबंधी समस्या आणि वेदनिक प्रक्रियेतील समस्या. तर लवकर जाणून घेणे आणि योग्य ऑक्युपेशनल थेरपिस्टची निवड करणे आवश्यक बनते.


(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार)

संदर्भ

Aiota: All India occupational therapist association ची वेबसाईट https://www.aiota.org/

Punithan, Neelima (2008). Basics in Occupational Therapy and Therapeutic Activities, New Delhi: Jaypee Brothers Medical Publishers Pvt ltd

Slaich, Veena (2006). Occupational Therapy and Rehabilitation, New Delhi: Jaypee Brothers Medical Publishers Pvt ltd

World Health Organisation (2002). Towards a Common Language for Functioning, Disability and Health: ICF The International Classification of Functioning, Disability and Health. Geneva: World Health Organisation

२ टिप्पण्या:

Thank you for your comments and suggestions

खरंच वाचन सवयी लोप पावत आहे का?

वाचन सवयी | Reading Habits  COVID- 19 महामारीने जगभरातील अनेक क्षेत्रांवर दीर्घकालीन परिणाम केले , ज्यात शिक्षण व वाचन यावर होणारे परिणाम ...