मानवी
मेंदूचे नियम | Brain Rules
मानवी
मेंदू हा कसा काम करतो हे माहिती नसणे, नातेसंबंधाच्या दृष्टीने मोठी गैरसोय ठरू शकेल कारण बोधात्मक साक्षरतेमुळे
एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारे का वागते हे शोधण्यास, तसेच
इतरांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यास मदत होऊ शकते. मेंदू कसा काम करतो याबद्दल अनेक संशोधकांनी केलेल्या संशोधनातून काही सामान्य नियम निदर्शनास आलेले आहेत.
ते मेंदूचे नियम म्हणजे आपला मेंदू कसा कार्य करतो आणि आपण ते ज्ञान व्यावहारिक
उपयोगात कसे आणू शकतो यावर एक मनोरंजक आणि माहितीपूर्ण चित्रण आहे.
जॉन
मेडिना हे सिएटल वॉशिंग्टन येथील एक प्रतिथयश आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि संशोधन
सल्लागार आहेत; तसेच वॉशिंग्टन स्कूल ऑफ
मेडिसिनमध्ये बायोइंजिनियरिंगचे प्राध्यापक आहेत आणि सिएटल पॅसिफिक विद्यापीठातील
ब्रेन सेंटर फॉर अप्लाइड लर्निंग रिसर्चचे संचालक आहेत. तज्ज्ञ मंडळींनी पुनरावलोकन
केलेल्या विविध प्रकारच्या वैज्ञानिक अभ्यासांवर आधारित आपला मेंदू कसा कार्य करतो
याबद्दलचे सत्य मांडण्यासाठी मेडिना यांनी मेंदूच्या 12 नियमांची एक सूची तयार केलेली आहे. त्याचेच पुस्तक म्हणजे
मेंदूचे 12 नियम (Brain Rules) होय.
जॉन मेडिना हे चेताविज्ञान, शिक्षण आणि
व्यवसाय या तीन क्षेत्रातील परस्पर संवाद सुलभ करण्यावर भर देतात. आपल्या वैयक्तिक
विकासात आणि पाल्यांना घडविताना तसेच आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहोत त्यांना समजून घेण्यासाठी
नियमांच्या स्वरूपात 12 तत्त्वे असलेले पुस्तक म्हणजे ब्रेन रुल्स होय.
मेंदूच्या
नियमांमध्ये, बोधात्मक कार्यक्षमतेसाठी
व्यायाम आणि झोप का महत्त्वाची आहे, एखाद्या घटकाची पुनरावृत्ती
केल्याने स्मरणशक्ती का वाढते, तणाव कार्यक्षमतेवर कसा
परिणाम करतो, दृश्य भावना गुंतवून ठेवण्यास का महत्त्वाची असते
आणि प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे हे आपणास कळेल. मेंदूचे नियम वाचल्यानंतर,
आपणास मानवी मनाचे (आणि शरीराचे) अंतर्गत कार्य चांगल्या प्रकारे
समजेल जेणेकरून आपणास जाणीवपूर्वक स्वतःचे कार्यप्रदर्शन सुधारण्यास तसेच इतर
लोकांसोबत अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत होईल.
नियम
क्र. 1 व्यायामामुळे मेंदूची शक्ती वाढते.
मानवी मेंदूचे वजन संपूर्ण शरीराच्या
वजनाच्या अंदाजे 2 टक्के इतके असते आणि तरीही शरीरात वापरल्या जाणार्या ऊर्जेच्या
20 टक्के भाग मेंदूकडून वापरला जातो हे अपेक्षेहून दहापट अधिक आहे. मानवी मेंदू
त्याच्याकडे असणार्या न्यूरॉन्सच्या 2 टक्याहून अधिक न्यूरॉन्स एका वेळेस
कार्यान्वित करू शकत नाही आणि जर यदाकदाचित असे घडलेच तर ग्लुकोजचा पुरवठा
आश्चर्यकारक रित्या संपुष्टात येईल आणि आपणास चक्कर येईल. सामान्यपणे आपल्या मेंदूची रचना रोज 12 मैल
चालण्यासाठी केली गेली होती, पण आज आपल्यामध्ये तंत्रज्ञान आणि भौतिक सुखसोयीमुळे
शारीरिक आणि मानसिक साचलेपण आलेले आहे. विचार करण्याचे कौशल्य सुधारण्यासाठी
हालचाल करणे अपेक्षित आहे. मेंदूचा नियम आपणास हे सूचित करतो की आपण एका जागी एकाच
अवस्थेत अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ बसू नये (यास काही लोक अपवाद असतील). व्यायाम
आपल्या मेंदूस रक्त पुरवतो, ऊर्जेसाठी ग्लुकोज आणि उरलेले विषारी
इलेक्ट्रॉन्स शोषून घेण्यासाठी प्राणवायू देतो. तो प्रथिनांना उत्तेजित करतो आणि
त्यामुळे न्यूरॉन्स एकमेकांशी समन्वय साधतात. हृदयसंस्थेशी निगडित व्यायाम
आठवड्यात फक्त दोनदा केल्यामुळे आपणास होऊ शकणाऱ्या सामान्य अवसादाचा (depression) धोका
अर्ध्याने कमी होतो. आपणास अल्झायमर होण्याचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो. रात्री
किमान 7 ते 8 स्वास्थपूर्ण झोप मिळणे मेंदूसाठी अत्यावश्यक असते कारण या कालावधीत
मेंदूतील आधारपेशी (Glial Cell)
चेतापेशींना एका जागी धरून ठेवतात, त्यांचा विकास घडवितात.
तसेच काही आधारपेशी चेतापेशींचे पोषण करतात, काही मृत
चेतापेशी शरिराबाहेर टाकून स्वच्छता करतात तर काही आधारपेशी चेतापेशींना आवरण
पुरवतात.
नियम
क्र. 2 मानवी मेंदूचा विकास ही उत्क्रांतीची देण आहे.
पर्यावरणातील क्रौर्यावर मात
करण्यासाठी आपण समोरच्यापेक्षा बलवान तरी बनले पाहिजे किंवा हुशार तरी बनले पाहिजे
हे दोनच मार्ग आढळतात. आपण दुसरा मार्ग निवडला, शारीरिक स्वरुपात अशक्त
असणाऱ्या मानवी प्रजातीने आपल्या संगद्यातील स्नायू बळकट करण्याऐवजी आपल्या मेंदूतील
न्यूरॉन्सची संख्या वाढवून संपूर्ण पृथ्वीवर ताबा मिळवला. आपल्या डोक्यात एकच
मेंदू नाही; आपल्यामध्ये तीन मेंदू आहेत. आपले
श्वसन टिकवण्यासाठी आपण पालीसारख्या मेंदूपासून सुरुवात केली. त्यानंतर त्याला
मांजरासारख्या मेंदूची जोड दिली अन् या दोघांवर एका कॉर्टेक्स नावाचा पातळ
जेलीसारखा तिसरा थर चढवला हा तो सर्वशक्तिमान “आधुनिक” मानवी मेंदू होय. मानवाची
उत्क्रांती होत असताना अनेक परिवर्तन घडून येऊन मानवाने पृथ्वीवर आपले साम्राज्य
उभे केले आणि त्यानंतर हवामानातील अनपेक्षित बदलामुळे गुहा आणि झाडावरून आपण गवताळ
प्रदेशात आलो. गवताळ प्रदेशात चालण्यासाठी चार पायांऐवजी दोन पाय वापरू शकल्याने आपल्या
गुंतागुंतीच्या मेंदूसाठी लागणारी ऊर्जा मुबलकपणे उपलब्ध झाली. सांकेतिक तर्क हे
मानवी बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्य असून ती उत्क्रांतीची देण आहे. एकमेकांच्या मनातील
हेतू तसेच आपल्याला काय प्रोत्साहित करते हे जाणून घेण्याच्या गरजेपोटी याची
उत्पत्ती झाली असावी. यामुळे आपल्याला आपल्या समूहात समन्वय साधता आला.
नियम
क्र. 3 प्रत्येक मेंदूची जुळणी (नेटवर्क) वेगवेगळी असते.
मानवी मेंदू सदैव काहीतरी शिकत असतो
त्यामुळे मेंदू आपली वायरिंग सतत बदलत असतो. आपण आपल्या आयुष्यात जे करतो आणि शिकतो
त्याप्रमाणे आपला मेंदू दिसतो कारण तो अक्षरशः त्याचे री-वायरिंग करतो. मेंदूतील
वेगवेगळ्या जागा भिन्न भिन्न लोकांत वेगवेगळ्या वेगाने विकसित होतात. दोन वेगवेगळ्या
लोकांचे मेंदू एकच माहिती एकाच पद्धतीने एकाच जागी साठवत नाहीत. बुद्धिमान
होण्याचे आपल्याकडे अनेक मार्ग आहेत आणि यातील अनेक बुद्ध्यांक मापन चाचणीत त्या
व्यक्तीचा म्हणून खरा IQ दिसतच नाहीत. कारण बोरिंग (1923) या मानसशास्त्रानी
बुद्धिमत्तेची कार्यात्मक व्याख्या करताना म्हणतो की “बुद्धिमत्ता चाचण्याद्वारे
जे मापन केले जाते ती बुद्धिमत्ता”. म्हणजे प्रत्यक्षात जे आहे त्याचे मापन नसून
विशिष्ट चाचणीमध्ये जे काही आहे ते आपण किती उन्नत पातळीपर्यंत व्यवस्थित सोडवितो
त्यावर अवलंबून असते. यावरून आपली शिक्षण व्यवस्था ही शारीरिक वयानुसार आहे ती बदलून
मानसिक वयाचा विचार प्रकर्षाने व्हायला हवा.
नियम
क्र. 4 आपण कंटाळवाण्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.
मानवी मनाची एक सर्वसाधारण धारणा
किंवा सत्य असे आहे की आपण कंटाळवाण्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आपल्या मेंदूतील
लक्ष केंद्रित करू शकणारा प्रकाशबिंदू एका वेळेस एकाच गोष्टीवर
लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपण एका वेळेस अनेक गोष्टी करू शकत नाही, आपण
अष्टावधानी नाही. आपण ज्यांना अष्टावधानी म्हणतो ते सर्वजण एका वेळी एकाच कामावर लक्ष
केंद्रित करत असतात अन्य कामे यांत्रिकपणे घडत असतात कारण ती कामे मेंदूच्या
सवयीचे किंवा अंगवळणी पडलेली असतात. मॅकडुगल यांचा एक मानसशास्त्रीय प्रयोग
आहे अवधान विभाजन याद्वारे हे सिद्ध झालेले आहे.
एखाद्या घटनेच्या तपशीलवार माहितीची
नोंद करण्यापेक्षा तिची रूपरेखा पाहणे व अमूर्त गोळाबेरीज करणे आपल्याला अधिक
चांगले जमते, तसेच भावनात्मक उत्तेजना मेंदूला शिकण्यात मदत करते. एक वक्ता किंवा
शिक्षक म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, श्रोते दर 10 ते 15 मिनिटांनी
विचलित होतात म्हणून त्यांना मूळ विषयाकडे वळवण्यासाठी आपण
काही चुटकुले, किस्से अथवा भावनिक/ आवेशपूर्ण अशा घटनांचे
वर्णन करावे लागते.
नियम
क्र. 5 लक्षात ठेवण्यासाठी उजळणी करणे गरजेचे असते.
मेंदूत अनेक प्रकारच्या स्मृती
यंत्रणा आहेत. एका प्रकारात संकेतन (Encoding), साठवण (storage), पुनःप्राप्ती (retrieval) आणि
विस्मृती (forgotten) या चार स्थिती आढळतात. आपल्या मेंदूकडे
येणाऱ्या माहितीचे अनेक तुकड्यांमध्ये लगेच विघटन होते व ते कॉर्टेक्सच्या
वेगवेगळ्या क्षेत्रात साठवणीसाठी पाठवले जातात. शिकलेले काही तरी लक्षातदेखील
राहील, असे वाटणाऱ्या बहुतेक घटना आपण शिकण्याच्या
पहिल्या काही क्षणातच लक्षात ठेवतो. आपण स्मृतीचे सुरुवातीच्या काही क्षणातच
जेवढ्या विस्तृतपणे संकेतन करतो, तेवढी ती चिरकाल लक्षात राहते. आपण
ज्या वातावरणात काही गोष्टी केल्या त्याची पुनर्निर्मिती त्याच वातावरणात त्या गोष्टी
लक्षात ठेवण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. म्हणून अभ्यास हा नेहमी विशिष्ट
स्थितीत बसूनच करावा, शक्यतो बैठक स्थिती मदतगार ठरू शकते. मानसशास्त्रात प्रयत्न
प्रमाद अध्ययन उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली, त्यामध्ये त्यांनी
सरावाचे महत्त्व विशद केलेले आहे. सराव हा अध्ययनाचा महत्त्वपूर्ण नियम आहे आणि
अध्ययन आणि स्मृती या परस्परावलंबी
प्रक्रिया आहेत.
नियम
क्र. 6 उजळणी करावयाचे असते हे मुद्दाम लक्षात ठेवावे लागते.
मेंदूमध्ये माहिती पाठवताना वेदक (sensory), अल्पकालीन (short term) आणि
दीर्घकालीन (long term) स्मृती
प्रक्रिया घडून येतात. बहुतेक आठवणी काही
क्षणातच विलय पावतात; पण अस्थिर वेळेत ज्या स्मृती तग
धरतात त्या काळाबरोबर दृढ होतात. हिप्पोकँपस (हा विशेषतः अल्पकालीन स्मृतींचे
परिवर्तन दीर्घकालीन रुपात करण्यात व्यग्र असतो.) व कॉर्टेक्समधील उभयपक्षी संवादामुळे दीर्घकालीन
स्मृती तयार होतात. हिप्पोकँपस ही स्मृतीच्या जुळणी तोडत नाही तोवर हे तसेच राहते. त्यानंतर स्मृती कॉर्टेक्समध्ये स्थिरावते, यास अनेक
वर्षे लागू शकतात. आपला मेंदू नवीन माहिती आणि जुन्या
आठवणी एकत्र करून साठवतो. जेंव्हा जुन्या आणि नवीन माहितीमध्ये साहचर्य प्रस्थापित
होते तेंव्हाच ते चिरकाल टिकते. साहचर्य प्रस्थापित होत नाही तोपर्यंत वस्तुस्थितीचे
केवळ ढोबळ चित्र आपल्यासमोर उभे राहते. दीर्घकालीन स्मृती अधिक विश्वासार्ह
बनवण्याचा मार्ग म्हणजे त्यात हळूहळू नवीन माहिती जोडणे आणि निश्चित कालावधीच्या
टप्प्यात उजळणी करणे, हा होय. त्यामुळे विशिष्ट
कालावधीनंतर उजळणी करणे अपेक्षित आहे, अन्यथा स्मृती दीर्घकाळ लक्षात राहणार नाही.
नियम
क्र. 7 उत्तम विचारासाठी उत्तम झोप आवश्यक असते.
आपला मेंदू आपणास सतत जागे ठेवणाऱ्या
आणि झोपायला लावणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या पेशी आणि रसायनांमधील तणावाच्या
स्थितीचा सामना करतो. आपण झोपलेले असताना मेंदूतील न्यूरॉन्स तीव्र लयबद्ध हालचाल
दर्शवतात, बहुधा आपण दिवसभरात जे काही शिकतो, ऐकतो किंवा बघतो त्याची ही उजळणी
असते. वेगवेगळ्या लोकांची झोपेची गरज भिन्न असते आणि त्याचप्रमाणे त्याची
वेळसुद्धा. दुपारच्या डुलकीसाठी शारीरिक प्रेरणा मात्र सार्वत्रिक आढळते पण काही
भागात ती अनिवार्य असते. निद्रानाशाचा दुष्प्रभाव एकाग्रता, प्रशासकीय
कार्यक्षमता, कार्यसंबद्ध स्मरणशक्ती, कल, आकडेमोड क्षमता, तर्कसंगत
विचारशक्तीवर तसेच कारक लवचीकतेवरसुद्धा पडतो. आवश्यक झोप न मिळाल्याने व्यक्तींची
एकाग्रता, चपळता आणि विचारशक्ती कमकुवत होते, त्यांच्या कामात
चुका होतात आणि अपघातही घडू शकतात.
सततच्या अनियमित झोपेमुळे मेंदूचे आणि मानसिक आजार उद्भवू शकतात.
नियम
क्र. 8 तणावग्रस्त परिस्थितीतून मेंदू एकसारखेच शिकत नाही.
अॅड्रेनलिन (फाइट और फ्लाइट) आणि
कॉर्टिसॉल (एलिट स्ट्राइक फोर्स) संप्रेरके ही आपल्या शरीराची
संरक्षण यंत्रणा आहेत. ही यंत्रणा अणकुचीदार
दात असलेल्या वाघाचा गंभीर हल्ला असेल अथवा क्षणार्धात नष्ट होणार्या धोकादायक
घटनेवर लगेच प्रतिसाद देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. पण ही यंत्रणा घरातील सतत
त्रास देणारे शत्रुत्व, वैरभाव यासारखे जुनाट
तणाव कमी करण्यासाठीचे प्रतिसाद देण्यास सिद्ध होत नाहीत. आपण जुनाट तणावाने
ग्रासलेले असताना अॅड्रेनलिन आपल्या रक्तवाहिन्याच्या आतल्या आवरणात ओरखडे निर्माण
करते व यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ते कॉर्टिसॉल हिप्पोकँपसच्या
पेशींना इजा पोहोचविते, आपल्या शिकण्याच्या आणि स्मृतीच्या
क्षमतेस कमकुवत बनविते. वैयक्तिक पातळीवर, समस्येवर आपले
मुळीच नियंत्रण नाही, ही भावना सर्वांत वाईट प्रकारचा तणाव आहे, अशाप्रकारे आपण
हतबल होतो. संपूर्ण समाजावर, मुलांच्या शाळेत शिकण्यावर आणि
कर्मचाऱ्यांच्या कामातील कार्यक्षमतेवर भावनात्मक तणावाचे खूप प्रचंड दुष्परिणाम
होतात. आपल्या शरीराला एवढ्या सर्व संकटातून का जावे लागते? याचे उत्तर
खूपच सोपे आहे. लवचिक, लगेच उपलब्ध होणाऱ्या आणि अत्यंत
काटेकोरपणे तणावास प्रतिसाद देणाऱ्या या यंत्रणेशिवाय आपण सर्वजण जगूच शकत नाही.
लक्षात असू द्या की, मेंदू हे आपल्याला जिवंत ठेवण्यास
मदत करणारे जगातील सर्वांत अत्याधुनिक इंद्रिय आहे.
नियम
क्र. 9 मेंदूची शक्ती वाढविण्यास अधिकाधिक संवेदना उत्तेजित करावे लागते.
आपण कोणत्याही घटनेशी संबंधित माहिती
आपल्या संवेदनांद्वारा शोषून घेतो, त्याचे
विद्युतीय संकेतांमध्ये परिवर्तन करतो (यातील काही दृष्टी व इतर ध्वनीपासून इ.), ते संकेत
मेंदूच्या वेगवेगळ्या भागात वितरीत करतो आणि त्यानंतर काय घडले याची पुनर्निर्मिती
करतो. यानंतर शेवटी त्याची एक संपूर्ण घटना या नात्याने जाणीव करून घेतो. हे संकेत
कशाप्रकारे जोडायचे यासाठी आपला मेंदू भूतकाळातील अनुभवांवर अवलंबून असतो आणि
म्हणूनच दोन लोक एकाच घटनेची जाणीव खूप वेगळ्या प्रकारे करून घेऊ शकतात.
आपल्या संवेदना एकत्र काम करतात उदा.
दृष्टीचा प्रभाव श्रवणावर पडतो म्हणजेच आपण अनेक संवेदना एकाच वेळेस उत्तेजित
केल्या तर आपण सर्वोत्तम प्रकारे शिकू शकतो. गंधामध्ये गत आठवणींना उजाळा देण्याचे
असामान्य सामर्थ्य आहे, याचे कारण गंधाचे संकेत थॅलॅमसला न जुमानत
थेट आपल्या अपेक्षित स्थानांकडे जातात त्यामुळे हे घडते. यात भावनांवर देखरेख
करणारे अमेग्डलासुद्धा समाविष्ट आहे.
नियम
क्र. 10 दृष्टी इतर सर्व संवेदानावर मात करते.
दृष्टी ही सर्व प्रकारात आपली
सर्वश्रेष्ठ संवेदना असून ती आपल्या मेंदूतील स्रोतांचा अर्धा भाग वापरते. आपण तेच
पाहतो, जे आपला मेंदू आपल्याला पाहण्यास सांगतो आणि ते शंभर टक्के अचूक नसते
(दृश्यम चित्रपट जरूर पहा). आपण करत असलेल्य दृक् विश्लेषणाच्या अनेक पायऱ्या
आहेत. डोळ्यांचा पडदा, फोटॉन्सना चित्रपटासारख्या
माहितीच्या मालिकेत जुळवतो. दृक् कॉर्टेक्स या मालिकांवर प्रक्रिया करतो, काही गतीची
नोंद करतात, इतर रंग नोंदवतात इ. अखेरीस आपण ती सर्व माहिती
पुन्हा एकत्र करतो आणि मग आपल्याला पाहता येते. आपण लिखित अथवा मौखिक शब्दांपेक्षा
चित्रांतून खूपच चांगल्या प्रकारे शिकतो आणि ते लक्षात ठेवतो. कारण प्रख्यात
मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट मेहराबियन यांनी उक्ला येथे भावना
व्यक्त करताना अशाब्दिक संवादाच्या महत्त्वावर अभ्यास केला. या अभ्यासात शब्द - 7%,
आवाजातील चढउतार - 38% आणि चेहऱ्यावरील हावभाव – 55% असे संवादाचे विश्लेषण आढळते.
यावरून आवाजातील चढउतार आणि चेहर्यावरील हावभाव संभाषणात 93% योगदान देतात.
नियम
क्र. 11 पुरुष आणि स्त्रियांचे मेंदू भिन्न असतात.
पुरुषांकडे एक आणि स्त्रियांकडे दोन
असणारे एक्स क्रोमोझोम आणि त्यातील एक जरी पर्यायी असला तरीही तो बोधात्मक
"हॉट स्पॉट" कळीची जागा असतो आणि त्यात मेंदूच्या निर्मितीत लागणारी
जनुके खूप मोठ्या प्रमाणात असतात. जनुकीयदृष्ट्या स्त्रिया अधिक गुंतागुंतीच्या
असतात; कारण त्यांच्या पेशीतील सक्रिय एक्स क्रोमोझोम आई आणि वडिलांच्या
पेशींचे संमिश्रण असते. पुरुषांचे सर्व एक्स क्रोमोझोम आईकडून येतात आणि त्यांचे
वाय क्रोमोझोम शंभरहून कमी जनुकांचे वहन करतात आणि एक्स क्रोमोझोम त्या तुलनेत 1500
जनुकांचे वहन करतात. रचना आणि जीवरसायनशास्त्रीयदृष्ट्या पुरुष आणि स्त्रियांचे
मेंदू भिन्न असतात उदा. पुरुषांकडे अधिक मोठा अमिग्डेला असतो आणि तो सेरोटोनिन
अधिक वेगाने तयार करतो; परंतु या भिन्नतेला काही अर्थ आहे का
हे अजून पर्यंत उलगडलेले नाही. तरीही तीव्र तणावावर स्त्रिया आणि पुरुष भिन्न
प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त का करतात? यांचे उत्तर म्हणजे स्त्रिया आपल्या डाव्या
अर्धगोलाचा ॲमिग्डेला कार्यान्वित करतात आणि भावनात्मक तपशील लक्षात ठेवतात. पुरुष
उजवा अमिग्डेला वापरतात आणि सारांश मिळवतात. अनेक संशोधनातून असे दिसून आलेले आहे
की स्त्रिया ह्या पुरुषापेक्षा भावनिकरीत्या अधिक सक्षम असतात.
नियम
क्र. 12 आपण सामर्थ्यवान आणि नैसर्गिक संशोधक असतो.
आपण कशाप्रकारे शिकत असतो, यासाठी लहान
मुले आदर्श उदाहरण आहे. आपण नुसतीच वातावरणावर निष्क्रिय प्रतिक्रिया व्यक्त करून
नव्हे, तर सक्रिय निरीक्षण, गृहीतक निर्माण करून, प्रयोग करून
आणि निष्कर्ष काढून आपण शिकत असतो. मेंदूतील विशिष्ट भाग या शास्त्रोक्त पद्धतीस
अनुमती देतात. उजवा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (मेंदूचा पुढील भाग) आपल्या गृहीतकात
त्रुटी शोधतो (“तीक्ष्ण सुळ्यांचा बाघ निरुपद्रवी नसतो”), आणि त्याच्या
बाजूचा भाग वर्तन बदलण्यास सांगतो ("पळा”). आपल्या मेंदूभर विखुरलेल्या
“प्रतिकृती चेतापेशींमुळे” आपण वर्तन ओळखू शकतो आणि त्यांचे अनुकरण करू शकतो. आपल्या
प्रौढ मेंदूचे काही भाग लहान मुलाच्या मेंदूएवढे मृदू राहतात आणि त्यामुळे आपण
नवीन चेतापेशी निर्माण करू शकतो आणि आपल्या आयुष्यभर नवीन गोष्टी शिकू शकतो.
समारोप
मानवी मेंदूची क्षमता सर्वसाधारण
आघात शोषण्याएवढी सक्षम असते. पण डोक्याला
इजा होणे, आघातामुळे मेंदूत झालेला रक्तस्राव, विषाणूजन्य आजार,
मेंदू आवरण दाह, कर्करोग, आनुवंशिक विकार, चेतापेशींचे आजार, चेतापेशींचा परस्पराशी संपर्क खंडित होणे यामुळे मेंदूच्या कार्यांत गंभीर
परिणाम होतात. मेंदूचा रक्तपुरवठा काही सेकंद जरी खंडित झाल्यास मेंदूचा काही भाग
पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत होतो. तसेच त्या भागाच्या कार्यात अपरिवर्तनीय
बदल होतात. पाण्यात बुडणे, गुदमरणे, हवाविरहीत
खोलीत अधिक वेळ काढणे अशामुळे झालेले मृत्यू हे मेंदू मृत झाल्याने होतात.
मेंदूला चालना देण्यासाठी आणि
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी कायम नवीन गोष्टी शिकायला हव्यात असं तज्ज्ञ सांगतात.
बौद्धिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी दिवसभरातील कामाचे प्राधान्यक्रम ठरावा, कामातील एकाग्रता
वाढवा, एकूणच सर्सवच कामात सक्रिय रहा, नेहमी उत्साही रहा, नवनवीन गोष्टी शिकत रहा, स्वतःला पुरेसा वेळ द्या, आणि दिवसाच्या शेवटी
पुनरावलोकन आवश्य करा. तसेच न्युरोबिक्स सारखे मेंदूचे व्यायाम जरूर करा यासाठी
खालील लिंकवर क्लिक करा. आपणास मेंदूच्या नियमाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता
निर्माण झाल्यास खालील इंग्रजी आणि मराठी अनुवादीत पुस्तक जरूर वाचावे.
https://www.psychologywayofpositivelife.com/2021/04/neurobics.html
संदर्भ
मेडिना, जॉन (2016). ब्रेन रुल्स,
औरंगाबाद: साकेत प्रकाशन (अनुवादक -व्यंकटेश उपाध्ये)
Medina, John (2020). Brain Rules, USA: Pear Press
Khupch chan vishay agadi sakhol pane mandlay tq so much sir
उत्तर द्याहटवा