शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

मॅस्लोची गरजांची अधिश्रेणी | Maslow’s Needs of Hierarchy

 

मॅस्लोची गरजांची अधिश्रेणी (Maslow’s Needs of Hierarchy)

एखाद्या परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो कारण कोणत्याही यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते. जन्मतः प्रत्येक मुलांसाठी आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते. किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी हातभार लावतात. त्यामुळे अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे. परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे. मूल शाळेत जाऊ लागले की हळूहळू मित्रमैत्रिणी, शिक्षक, आजूबाजूचा परिसर, समाज कळत नकळतपणे प्रेरणा देत असतात.

प्रेरणा म्हणजे साधारणतः आपण Motivation असे म्हणतो. पण, प्रेरणा म्हणजे नक्की काय? प्रेरणा म्हणजे स्फूर्ती देणे, प्रेरणा म्हणजे चालना, प्रेरणा म्हणजे अध्ययनाचा गाभा, ध्येयापर्यंत पोहोचण्याचे साधन, एखादी क्रिया करण्यासाठी लागणारे बळ म्हणजे प्रेरणा अशा व्याख्या करू शकतो. स्किनर प्रेरणेची व्याख्या शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून करतो. मॅकडुगल यांनी शारीरिक आणि मनोवैज्ञानिक अवस्था जी कोणतेही कार्य करण्यास आपणास प्रेरित करते त्यास प्रेरणा म्हटले आहे. प्रेरणेला इंग्रजीत motivation असे म्हणतात, हा शब्द लॅटीन भाषेतील movere या शब्दापासून तयार झालेला असून या शब्दाचा अर्थ हलवणे असा आहे.

आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा

आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असे मुख्य दोन प्रकार आहे. आंतरिक प्रेरणा ही जन्मजात असते. सतत काहीतरी करण्याची उर्मी म्हणजे आंतरिक प्रेरणा. अभिरुची, आवड, अभिवृत्ती, तत्परता यातून आंतरिक प्रेरणा मिळते. काही लोकांना आंतरिक प्रेरणा ध्येय प्राप्तीसाठी उद्युक्त करते. आपण आजूबाजूला पाहतो, काही माणसे धडपडत असतात आंतरिक प्रेरणेमुळे ते कोणता तरी ध्यास घेऊन कार्यरत असतात.

प्रेरणेचा दुसरा प्रकार म्हणजे बाह्य प्रेरणा. प्रत्येकालाच अंतःप्रेरणेने झपाटपलेले असते असे नाही, काहींना बाह्य प्रेरणेची चावी दिल्यास ते देखील यशाच्या वाटेवर सुसाट धावू लागतात. बाह्य प्रेरणा म्हणजे प्रोत्साहन (Incentive) देणे होय. उदेश्याप्रती एखाद्याचे लक्ष खेचून आणणे म्हणजे बाह्यप्रेरणा. याशिवाय पुरस्कार, बक्षीस, दंड, प्रशंसा, निंदा, सहयोग, हे बाह्य प्रेरणेचे घटक आहेत. आंतरिक प्रेरणेस सर गॉड्फ्रे थॉमसन यांनी स्वाभाविक प्रेरणा असे म्हंटले तर बाह्य प्रेरणेस कृत्रिम प्रेरणा म्हटले आहे. 'गरज ही शोधाची जननी आहे', अशी एक म्हण आहे. पण प्रेरणेच्या मुळाशी नेहमी कोणती ना कोणती गरज असते. या तत्त्वाचा उपयोग करून मास्लो यांनी प्रेरणेसाठी गरजांची अधिश्रेणी विकसित केलेली आहे.  

गरजांची अधिश्रेणी

अब्राहम मॅस्लो यांनी पूर्वी केलेल्या माकडांवरील प्रयोगांवरून हा सिद्धांत सुचला. सर्व प्राण्यांना आणि माणसांना अनेक गरजा असतात. त्यातल्या काही अति महत्त्वाच्या असतात तर काही कमी महत्त्वाच्या असतात. यातूनच या गरजांची एक शिडी किंवा श्रेणी तयार होते. उदाहरणार्थ, आपण लैंगिक अनुभवाशिवाय अनेक महिने, वर्षं राहू शकतो; अन्नाशिवाय अनेक आठवडे राहू शकतो, पाण्याशिवाय फक्त दोन दिवस राहू शकतो तर प्राणवायूशिवाय काही मिनिटंच जिवंत राहू शकतो. आपणास तहान आणि भूक लागली असेल आणि अन्नपाणी मिळालं तर प्रथम आपण पाणी घेऊ असं मॅस्लोनं नमूद केलं आहे. शारीरिक गरजांचं हे जसं असतं तसंच आपल्या मानसिक गरजांचंही असतं असं मॅस्लोनं मांडलं.

मॅस्लोनं 1943 साली लिहिलेल्या 'ए थिअरी ऑफ ह्युमन मोटिव्हेशन' या प्रबंधामध्ये त्याची प्रसिद्ध गरजांची अधिश्रेणी (Hierarchy of needs theory) थिअरी मांडलेली आहे. पुढे त्यानं ती विस्तृत स्वरुपात 1945 सालच्या त्याच्या 'मोटिव्हेशन अँड पर्सनॅलिटी' या पुस्तकात मांडली. मॅस्लोच्या मते, सर्वात खाली आणि सर्वात मूलभूत किंवा महत्त्वाच्या म्हणजे शारीरिक गरजा होत्या. यात अन्न, पाणी, ऑक्सिजन, योग्य तपमान, झोप, लैंगिक गरजा अशा गरजा मोडतात. या सगळ्यात पुन्हा एक अंतर्गत श्रेणी असली तरी या सर्वांशिवाय आपण जगूच शकणार नाही. त्याच्यावरची पातळी असते ती सुरक्षिततेच्या गरजेची. आपल्याला खायला प्यायला जरी चांगलं मिळालं, पण आपण जर सुरक्षित नसू तर काय उपयोग? सुरक्षितता आणि स्थैर्य यांची प्रत्येकाला गरज असतेच. यात चोर-दरोडेखोरांपासून सुरक्षितता, नोकरीची सुरक्षितता, आर्थिक सुरक्षितता इ. या सगळ्यांमुळे मानसिक सुरक्षितताही मिळते. सुरक्षितता प्राप्त झाल्यावर आपण आपुलकी आणि प्रेमाच्या शोधात असतो. त्यानंतर स्व-आदर हा निर्माण होण्यापूर्वी व्यक्ती स्थैर्य प्राप्ती साठी झगडत असते. शेवटी आत्म-वास्तविकीकरण पातळीकडे प्रवास सुरु होतो जो केवळ 2% लोक पूर्ण करतात. शारीरिक आणि सुरक्षिततेची गरज ही प्राथमिक तर प्रेमाची आणि स्व-आदराची गरज ही मानसशास्त्रीय मानली जाते. स्व-आदर ही सामाजिक तर उर्वरित गरजा वैयक्तिक विकासासाठी आवश्यक आहेत. सदर वर्चस्व श्रेणी खालील पिरॅमिडच्या सहाय्याने सविस्तर पाहू या.

 

(सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

1. शारीरिक गरजा (Physical Needs): पिरॅमिडच्या खालच्या पातळीवर अन्न, पाणी, विश्रांती, कपडे-लत्ते, वंश वृद्धी यांसारख्या शारीरिक गरजा असतात. या प्रेरणांची पूर्ती झाली नाही तर व्यक्तीचे जीवन धोक्यात येऊ शकते, कारण या गरजा मानवी अस्तित्वासाठी खुपच गरजेच्या असतात.

2. सुरक्षिततेच्या गरजा (Safety Needs): या पातळीवरील गरजांमध्ये सुरक्षितता, स्थिरता, परावलंबन, संरक्षण, निर्भयता यांचा समावेश होतो. लहान मुलांमध्ये या गरजांचे प्राबल्य असते. प्रौढ व्यक्तीदेखील सुरक्षित निवासस्थान, सुरक्षित अर्थार्जनाचे साधन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

3. प्रेमाची गरज (Love and Belonging Needs): मित्र व सोबती मिळवणे, आवडीच्या समूहाची सदस्यत्व मिळवणे यांद्वारे या गरजेची पूर्तता केली जाते. यालाच तद्भाविता म्हणतात. लहानपणी ही गरज पूर्ण झाली नाही तर प्रौढपणी अनेक समस्या उद्भवतात.

४. स्व-आदराची गरज (Self-esteem Needs): आपण समाजातील आदरणीय व उपयोगी व्यक्ती आहोत, सक्षम आहोत असा आत्मविश्वास असेल तर स्व-आदर वाढतो. त्या गरजा पूर्ण न झाल्यास न्यूनगंड निर्माण होतो. स्व-आदर वाढल्यामुळे व्यक्ती स्वत:ची प्रगती करून प्रतिष्ठा मिळवू शकते.

मॅस्लोने दिलेल्या मूळ गरजांच्या श्रेणीमध्ये स्व-आदर प्रेरणेनंतर आत्म-वास्तविकीकरण ही गरज होती (1971); पण नंतरच्या काळात मॅस्लोने स्व-आदर व आत्म-वास्तविकीकरण या दोन गरजांच्यामध्ये बोधात्मक व सौंदर्यविषयक या दोन गरजांची भर घातली (1998). पण नंतर त्यांनी लोकोत्तर गरज समाविष्ट करून गरजांची अधिश्रेणी 8 पातळ्यामध्ये रुपांतरीत केली.

5. बोधात्मक गरजा (Cognitive Needs): बोधात्मक गरज म्हणजे वैचारिक भूक होय. आजूबाजूचे जग जाणून घेण्यासाठी व्यक्ती ज्ञानसंपादन करत असते. काही व्यक्ती तत्त्वज्ञानातील अथवा विज्ञानातील सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न करत असतात त्यालाच बोधात्मक गरजा म्हणतात.

6. सौंदर्यविषयक गरजा (Aesthetic Needs): बोधात्मक गरज पूर्ण झाल्यानंतर जगातील सौंदर्याचे रसग्रहण करण्याकडे व्यक्तीचा कल होतो. आजूबाजूच्या परिस्थितीतील व्यवस्थितपणा, समतोल, सुसूत्रता यांमध्ये व्यक्तीला सौंदर्य जाणवते व स्वत:च्या जीवनातही असेच नियोजन, क्रमबद्धता असावी असे वाटू लागते. कलात्मक गोष्टींची आवड असणाऱ्या व्यक्तींमध्ये या गरजा जास्त आढळतात.

7. आत्म-वास्तविकीकरणाच्या गरजा (Self-actualization Needs): या गरजा वर्चस्वश्रेणीत सर्वांत उच्च स्थानी असतात. स्वतःच्या क्षमता ओळखून त्यांचा महत्तम विकास करण्यासाठी व्यक्ती धडपडते. स्वत:मधील सुप्तावस्थेत असलेले कलागुण, छंद यांचा विकास करणे काही व्यक्तींना आवडते. स्वत:च्या क्षमतांचा विकास करून अशा व्यक्ती कला, विज्ञान, क्रीडा व साहित्य क्षेत्रात मोलाची भर घालतात.

8. लोकोत्तर गरज (Transcendence Needs): लोकोत्तर गरज म्हणजे मानवी बोधन, वर्तन आणि संबंध हे स्वतःशी, इतर महत्त्वपूर्ण लोकांसाठी, सर्वसाधारणपणे मानवांसाठी, इतर प्रजातींशी, निसर्गाशी आणि जगताशी असणारा संबंध अतिउच्च पातळीच्या आणि सर्वसमावेशक किंवा समग्र स्तरांचा संदर्भ देते.

 

(सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

वाढ विरुद्ध कमतरता गरजा

स्लोनी गरजांची अधिश्रेणी वाढ आणि कमतरता या गरजांमध्ये विभागणी केलेली आहे. वाढ आणि कमतरतेच्या गरजांमधील मुख्य फरक म्हणजे गरजा पूर्ण झाल्यामुळे प्रेरणेतील बदल. वाढीच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे प्रेरणा वाढते. याउलट, कमतरतेच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे प्रेरणा कमी होते.

व्यक्तीचे वय जसजसे वाढते तसतशी व्यक्ती या पिरॅमिडच्या वरच्या दिशेने सरकते. बहुसंख्य व्यक्तींच्या आयुष्यासाठी ही वर्चस्वश्रेणी लागू पडत असली तरी काही व्यक्ती याला अपवाद असतात. उदाहरणार्थ, खालच्या पातळीवरील गरजा अपूर्ण असतानाही उच्च पातळीवरील गरजांच्या पूर्ततेसाठी काही व्यक्ती झटतात; तर अल्पसंतुष्ट स्वभावाच्या व्यक्ती क्षमता असूनही त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत नाहीत. बाह्य परिस्थितीत झालेल्या बदलांमुळेही काही व्यक्तींचे वर्तन या वर्चस्वश्रेणीला अपवाद ठरते. उदाहरणार्थ, आर्थिक उत्पन्नाचे साधन एकाएकी बंद झाले तर आत्म-वास्तविकीकरणाच्या पातळीपर्यंत पोहोचलेली व्यक्ती पुन्हा शारीरिक पातळीवरील गरजा पूर्ण करण्यात गुंतेल, परिस्थितीनुसार व्यक्ती या प्रेरणांच्या पातळ्यांवर वरखाली होत राहतात. मॅस्लोचा एकूण जीवनात अनेक महान व्यक्तींशी संबंध आला. त्यांच्या जीवनचरित्राचा बारकाईने अभ्यास करून मॅस्लोने ही वर्चस्वश्रेणी मांडलेली आहे.

मास्लोचा सिद्धांत खालील गृहितकांवर आधारित आहे:

  • लोकांचे वर्तन गरजांवर आधारित असून गरजांची पूर्तता वर्तन ठरवते. जेव्हा गरजा पूर्ण होतात तेव्हा एखादी व्यक्ती सकारात्मकतेने वागते आणि जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा नकारात्मक वागतात.
  • लोक अपूर्ण गरजांमुळे प्रेरित होतात आणि एकदा विशिष्ट गरज पूर्ण झाली की ती प्रेरणा देणारा घटक बनून राहते. म्हणून, प्रेरणा गरजांच्या समाधानाने संपते, त्यानंतर पुढील उच्च गरज प्रेरक म्हणून काम करते.
  • एखाद्या व्यक्तीच्या गरजा मूलभूत पासून सुरू होतात आणि इतर उच्च स्तरावरील गरजांपर्यंत जातात. म्हणून, आपण असे म्हणू शकतो की लोकांच्या गरजा श्रेणीबद्ध क्रमाने आहेत.
  • जेव्हा खालच्या गरजा पूर्ण होतात तेव्हाच एखादी व्यक्ती अनुक्रमे पुढील उच्च स्तरावर जाते.

हा सिद्धांत सोपा, संक्षिप्त आणि माहितीपूर्ण आहे. हा सिद्धांत व्यवस्थापकांना कर्मचार्‍यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या महत्त्वाची कल्पना देते. या सिद्धांताने व्यापक मान्यता मिळविली आहे. यावरून आपणास प्राथमिक गरजामधून बाहेर पडून मानसशास्त्रीय गरजाकडे प्रवास लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण सामाजिक गरजा पूर्ण करून वैयक्तिक उन्नतीकडे लक्ष द्यायला हवे.

संदर्भ:

Hoffman, E. (1988). The right to be human: A biography of Abraham Maslow. Los Angeles, CA: Jeremy P. Tarcher.

Maslow, A. H. (1943). A theory of human motivation. Psychological Review, 50 (4), 370-96.

Maslow, A. H. (1954). Motivation and personality. New York: Harper and Row.

Maslow, A. H. (1962). Toward a psychology of being. Princeton: D. Van Nostrand Company.

Maslow, A. H. (1970). Motivation and personality. New York: Harper & Row.

Maslow, A. H. (1973). A theory of human motivation. In R. J. Lowry (Ed.), Dominance, self-esteem, and self-actualization: Germinal papers of H. A. Maslow (pp. 153-173). Belmont, CA: Wadsworth.

Maslow, A. H. (1987). Motivation and personality (3rd ed.). Delhi: Pearson Education.

Taormina, R. J., & Gao, J. H. (2013). Maslow and the motivation hierarchy: Measuring satisfaction of the needs. The American Journal of Psychology, 126(2), 155-177.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

खरंच वाचन सवयी लोप पावत आहे का?

वाचन सवयी | Reading Habits  COVID- 19 महामारीने जगभरातील अनेक क्षेत्रांवर दीर्घकालीन परिणाम केले , ज्यात शिक्षण व वाचन यावर होणारे परिणाम ...