शनिवार, २७ एप्रिल, २०२४

वरिष्ठांची आज्ञा पाळणे | Obedience to Authority

 

वरिष्ठांची आज्ञा पाळणे Obedience to Authority

अलिकडे ठाणे जिल्यातील एका महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना त्या संबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे उघडकीस आला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवायला भाग पाडून अमानुष मारहाण केली जात आहे. संबंधीत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. पण विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.

ही एवढी क्रूरता येते कोठून? त्या मुलाने संबंधीत मुलाला का मारहाण केली असेल? यामागे काही मानसशास्त्रीय काही कारणे आहेत का? मिलग्राम प्रयोग हा वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्यावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारा एक प्रसिद्ध आणि वादग्रस्त अभ्यास झाला.

मिलग्राम प्रयोगाची सुरुवात

1960 च्या दशकात, येल विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ स्टॅनली मिलग्राम यांनी आज्ञा पाळण्यावर आधारित अनेक प्रयोग केले ज्यातून काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले. या अभ्यासात, एका अधिकारी व्यक्तीने (संशोधक) सहभागींना (शिक्षक) दुसऱ्या व्यक्तीला (विद्यार्थी) धोकादायक विद्युत शॉक देण्याचे आदेश दिले. तसाठी एका विद्यार्थ्यास (ज्यास प्रयोगाबाबत माहिती होती) एका खोलीत नेण्यात आले आणि त्याच्या हातांवर इलेक्ट्रोड लावण्यात आले. शिक्षक आणि संशोधक बाजूच्या खोलीत गेले जिथे इलेक्ट्रिक शॉक जनरेटर आणि स्विचेसची रांग होती. ही रांग 15 वोल्ट (हळुवार शॉक) पासून 375 वोल्ट (धोका: तीव्र शॉक) ते 450 वोल्ट (XXX) पर्यंत चिन्हांकित होती. शॉकचे धक्के खोटे होते, परंतु सहभागींना ते खरे वाटत होते. या प्रयोगांवरून असे दिसून आले की, लोक अधिकार आणि सत्ता यांनी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात आणि खूप आज्ञाधारक बनतात. तसेच, सामाजिक मान्यता आणि स्वीकृती मिळवण्याची इच्छा लोकांना चुकीच्या कृती करण्यास प्रवृत्त करू शकते.

                                                              (सर्व चित्रे इमेजेस google वरून साभार )

दुसऱ्या महायुद्धातील गुन्हेगार अडॉल्फ आइशमन याच्या खटल्याची सुरुवात झाल्यानंतर लगेचच, 1961 मध्ये मिलग्रामने आपले प्रयोग सुरू केले. लाखो ज्यूंची हत्यांचे आदेश देताना मी केवळ आदेश पाळत होतो, असा आइशमनचा बचाव मिलग्रामच्या लक्षात आला होता. त्याच्या 1974 च्या "ओबेडिन्स टू ऑथॉरिटी" (वरिष्ठांची आज्ञा पाळणे) या पुस्तकात मिलग्राम यांनी एक प्रश्न विचारला, "आइचमन आणि त्याच्यासोबत हत्याकांडात सहभागी असलेले लाखो जण फक्त आदेश पाळत होते का? की आपण त्या सर्वांना केवळ मोहरे म्हणू शकतो?"

त्यापुढच्या टप्प्यावर, विद्यार्थी पूर्णपणे शांत झाला आणि त्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. त्यानंतर प्रयोगकर्ते शिक्षकास या शांततेकडे चुकीच्या उत्तरासारखे पाहण्यास सांगितले आणि आणखी एक शॉक देण्यास सांगितले. बहुतेक सहभागींनी प्रयोगकर्त्याला विचारले की त्यांनी प्रयोग चालू ठेवावावा का? त्यानंतर प्रयोगकर्त्याने सहभागीला पुधील प्रमाणे आदेश देत होते:

"कृपया प्रयोग चालू ठेवा."

"परीक्षणासाठी आपण चालू ठेवणे आवश्यक आहे."

" प्रयोग चालू ठेवणे अत्यावश्यक आहे."

"आपल्याकडे दुसरा पर्याय नाही; आपण प्रयोग चालू ठेवलेच पाहिजे."

मिलग्राम प्रयोगाचे फलित

मिलग्राम प्रयोगामध्ये, सहभागी किती मोठा शॉक देण्यास तयार आहे यावरून आज्ञाधारकपणा मोजला गेला. सहभागींना खूप अस्वस्थ वाटले, ते खिन्न आणि प्रयोगकर्त्यावर रागावलेले असले तरीही, त्यांनी आदेशाचे पालन शेवटपर्यंत करतच राहिले. मिलग्रामच्या फलितांवरून असे दिसून आले की, अभ्यासात सहभागी झालेल्या 65% लोकांनी सर्वात मोठे शॉक दिले. म्हणजे अभ्यासात सहभागी झालेल्या 40 लोकांपैकी 26 जणांनी सर्वात मोठे धक्के दिले, तर 14 जण सर्वात जास्त धक्का देण्याआधीच थांबले.

आज्ञा पालनावर परिणाम करणारे घटक

या प्रयोगात सहभागी झालेल्या इतक्या लोकांनी अधिकारी व्यक्तीने सांगितल्यानंतर क्रूर कृत्य असे का केले? मिलग्राम यांच्या मते, अशा उच्च स्तरातील आज्ञा पालनाची कारणे म्हणजे काही परिस्थितिजन्य घटक आहेत:

·       अधिकारी व्यक्तीची प्रत्यक्ष उपस्थिती पालनात नाट्यपूर्ण वाढ करणारी होती.

·       येल विद्यापीठ (विश्वसनीय आणि अधिकार असलेली शैक्षणिक संस्था) या अभ्यासाचे आयोजक असल्याने, अनेक सहभागींना असे वाटले की हा प्रयोग सुरक्षित असणारच आहे.

·       शिक्षक आणि विद्यार्थी यांची निवड यादृच्छिक दिसत होती.

·       सहभागींनी असे गृहीत धरले की प्रयोगकर्ता हा एक सक्षम तज्ञ आहे.

·       शॉक वेदनादायक असतील परंतु धोकादायक नसतील असे सांगण्यात आले होते.

मिलग्राम प्रयोगातील नैतिक समस्या

मिलग्रामचे प्रयोग हे दीर्घकाळापासून मोठ्या प्रमाणात टीका आणि वादविवादाचे विषय ठरले आहेत. सुरुवातीपासूनच, त्यांच्या प्रयोगांची नैतिकता अत्यंत संशयास्पद होती. सहभागींना लक्षणीय मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागला. प्रयोगातील काही प्रमुख नैतिक मुद्दे खालीलप्रमाणे होते:

  • फसवणूक झाल्याची भावना
  • सहभागी झालेल्यांच्या संरक्षणाचा अभाव
  • प्रयोग थांबवण्याची विनंती केल्यानंतरही प्रयोगकर्तांकडून चालू ठेवण्याचा दबाव, सहभागींच्या माघारा घेण्याच्या हक्कावर हस्तक्षेप

सदर प्रयोगात सहभागी (शिक्षकाच्या भूमिकेत) झालेल्या अनेकांना मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे, असे मानले जाते की, प्रयोगाच्या शेवटी सर्वांना खरीखुरी माहिती देण्यात आली. प्रयोगाची पद्धत आणि फसवणूक याबाबत संशोधकांनी स्पष्टीकरण दिले होते. यातूनच संशोधनाची नीतीतत्त्वे पुढे आलीत - सहभागींची सुरक्षितता, प्रयोगाची सुस्पष्ट माहिती, प्रयोग मधून सोडण्याचा अधिकार, हानी पोहणार नाही याची काळजी इत्यादी.

समारोप

मिलग्राम प्रयोग हा सामाजिक मानसशास्त्रातील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त प्रयोगांपैकी एक आहे. या प्रयोगाने अधिकार आणि आज्ञाधारककपणा, सामाजिक दबाव आणि व्यक्तिमत्व यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक घटनांवर प्रकाश टाकला आहे. प्रयोगाचे निष्कर्ष आजही वैज्ञानिक आणि सामाजिक चर्चेचा विषय आहेत. तरीही मिलग्राम प्रयोगाने अनेक नैतिक प्रश्नांना जन्म दिला आहे. सहभागींना फसवणे आणि त्यांना मानसिक त्रास देणे योग्य होते का? प्रयोगाच्या परिणामामध्ये खरोखरच वास्तविक जगातील वर्तनाचे प्रतिबिंब दर्शविते का? या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

संदर्भ

Milgram, S. (1974). Obedience to Authority: An Experimental View. New York: Harper and Row.

Brown, R. (1986). Social Forces in Obedience and Rebellion. Social Psychology: The Second Edition. New York: The Free Press.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

खरंच वाचन सवयी लोप पावत आहे का?

वाचन सवयी | Reading Habits  COVID- 19 महामारीने जगभरातील अनेक क्षेत्रांवर दीर्घकालीन परिणाम केले , ज्यात शिक्षण व वाचन यावर होणारे परिणाम ...