बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

भारतीय दर्शने | Indian Philosophy (Darshan)

भारतीय दर्शने

तत्त्वज्ञानाचा उगम हा प्राचीन भारतीय व पाश्चात्य तत्त्ववेत्यांच्या चिंतनातून झालेला आहे. प्राचीन काळी तत्त्वज्ञानाचे मूळ हे मानवी कुतुहलात दिसून येते. आपल्या अनुभवाला येणाऱ्या विश्वातील अनेक घटकांचा शोध घेऊन बुद्धीच्या सहाय्याने त्यांचे विश्लेषण त्यांनी केलेले आढळते. तत्त्वज्ञान हे मानवी जीवनाकडे व विश्वाकडे पाहण्याचा मुलगामी दृष्टीकोन निर्माण करते. 'तत्त्वज्ञानहा शब्द अतिशय संदिग्ध असल्यामुळे तो व्यापकही बनलेला आहे. विश्वाविषयींचे मूलगामी चिंतन म्हणजे तत्त्वज्ञान असा त्यांचा सर्वांना अभिप्रेत असलेला अर्थ आहे. म्हणून तत्त्वज्ञानाला सदवस्तुशास्त्रसत्ताशास्त्र (मेटॅफिजिक्स) असे म्हटले जाते. कोणत्याही विषयाचे मूलगामी व तर्कशुद्ध विवेचन म्हणजे तत्त्वज्ञान मानले जाते. या शब्दाच्या अशा अनिश्चित व विशाल व्याप्तीमुळे तो संदिग्ध राहिल्यास आश्चर्य नाही.

तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वासंबंधीचे ज्ञान होय. तत् म्हणजे ते जे काही आहे तेते सर्व एकूण एक या ‘तत्’चा ‘तत्’पणा म्हणजे तत्त्व होय. यालाच तत् चे सार असे म्हणतात. तत्त्वज्ञान या संयुक्त शब्दात तत्त्व आणि ज्ञान असे दोन शब्द असून तत्त्व या शब्दाचा अर्थ सत्य किंवा यथार्थ असाही आहे. यावरुन तत्त्वज्ञान म्हणजे सत्य किंवा यथार्थ स्वरुपाचे ज्ञान होय. तत्वज्ञान म्हणजे सत्यासाठी बौद्धिक शोध ह्या तत्वज्ञानाच्या व्युत्पत्ती विषयक अर्थाशी पाश्चिमात्य तत्वज्ञान जवळपास प्रामाणिक राहिले आहे. मानवाचे स्वरुप आणि आपण वास्तव्य करीत असलेल्या वास्तवाचे स्वरुप यांच्याशी निगडित कल्पनांची सर्वकष प्रणाली म्हणजे तत्वज्ञान. यावरून आपण असे म्हणू शकतो की मानवी जीवनाचे सर्व पैलू तत्वज्ञान विषयक विचारांनी प्रभावित व नियंत्रित आहेत. अभ्यासाचे एक क्षेत्र म्हणून तत्वज्ञान ही सर्वात जुनी शाखा आहे. तिला सर्व शास्त्रांची जननी मानले जाते. खरं तर सर्व ज्ञानाच्या मूळाशी तीच आहे.

भारतीय तत्त्वज्ञान:

भारतीय तत्त्वज्ञान' हे भारतीय कोणत्या अर्थाने आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. 'भारतीय' हा शब्द येथे केवळ भौगोलिक अर्थाने व देशवाचक म्हणून समजावयाचा की काय असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. भारतभूमीत प्राचीन काळापासून निर्माण झालेले, रुजलेले, मान्य झालेले, लोकमानसात व लोकजीवनात स्थिर झालेले, ज्याने या देशाच्या संपूर्ण अंतर्बाह्य जीवनाला व्यापून टाकलेले आहे असे जे तत्त्वज्ञान, ते भारतीय तत्त्वज्ञान असे म्हणायला हरकत नाही, पण केवळ भौगोलिक मर्यादांमुळे भारतीय तत्त्वज्ञानाला भारतीयत्व प्राप्त झालेले आहे असे नसून त्याला स्वतःचे असे गुणवैशिष्टय आहे म्हणून ते 'भारतीय' आहे असे म्हणणे उचित ठरेल. शतकानुशतके जीवनविषयक व विश्वविषयक आपला वेगळा व स्वतंत्र दृष्टिकोन या भारतभूमीत मांडला व आचरला गेला आहे व तो सर्वसामान्य लोकजीवनात इतका खोल रुजला गेला आहे की, तो भारतीय समाजाचा जणू कायमचा मानसिक व आध्यात्मिक वारसा ठरला आहे व या समाजाच्या जीवन-मरणाचा एक भाग बनलेला आहे.

तत्त्वज्ञान हे फावल्या वेळेचे काम:

भारतात तत्त्वचिंतन करणे ही फावल्या वेळात करावयाची मनाची करमणूक, रिकाम्या मनाच्या कल्पनांचा खेळ, बुद्धीची एक प्रकारची कसरत, निसर्गातील घटनांविषयी वाटणाऱ्या कुतूहलाचे व आश्चर्याचे समाधान करण्यासाठी केलेले चिंतन असे नाही; तर तत्त्वचिंतन करणे ही मानवी मनाची आंतरिक गरज, प्रेरणा व ओढ समजली जाते. तत्त्वचिंतन करणे ही एक प्रकारची चैन समजली जात नाही; तर उलट ते जीवनाचे सर्वश्रेष्ठ मूल्य समजले जाते. भारतीय तत्त्वचिंतन गंभीरपणे जीवनाचे सार्थक करण्याच्या हेतूने केले जाते. इतर वैज्ञानिक ज्ञानाला किंवा कलांच्या अभ्यासाला साहाय्यक व पोषक असे ज्ञान या दृष्टीने तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे भारतीय लोक वळत नाहीत. तर भारतीय तत्त्वज्ञान कडे सर्व वैचारिक क्षेत्रे आधार आणि स्फूर्ती म्हणून पाहत, कारण तत्त्वज्ञान हे शास्त्रांचे शास्त्र आहे.

भारतीय दर्शनांचे प्रकार

भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रणालींना दर्शन म्हणतात. या दर्शनांत विविधता व वेगळेपणा आहे. सर्व दर्शन सदृश नाहीत तर स्थूलमानाने या दर्शनांची विभागणी किंवा वर्गीकरण आस्तिक आणि नास्तिक अशा दोन प्रकारांत केलेले आढळते. 'आस्तिक' याचा अर्थ वेदांचे प्रामाण्य व अधिकार मानणारी व 'नास्तिक' म्हणजे वेदांचे प्रामाण्य व अधिकार न मानणारी दर्शन होत. ईश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनाही आस्तिक अशी संज्ञा आहे व ईश्वराचे अस्तित्व मान्य असणारे 'ईश्वरवादी' म्हणून व मान्य नसणारे 'निरीश्वरवादी' म्हणून ओळखले जातात. खरे म्हणजे वेदांचे प्रामाण्य मानणारेसुद्धा एकाच ठरीव साच्याचे नाहीत.

चार्वाक, बौद्ध व जैन ही दर्शने नास्तिक दर्शन म्हणून ओळखली जातात तर न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदान्त (उत्तरमीमांसा) ही वेदोपनिषदांचे प्रामाण्य मानणारी अशी षड्‌दर्शन म्हणून ओळखली जातात. पण त्यांच्यातही बरेच सूक्ष्म भेद आहेत. प्रत्येक दर्शनाचा आपल्या परीने तत्त्वचिंतनाच्या विशिष्ट बाजूवर अधिक भर आहे असे दिसून येते.

 

वेदांचे प्रामाण्य आस्तिक दर्शनांना मान्य आहे; याचा अर्थ असा नाही की, वेदांतील सर्वच विचार काटकोरपणाने त्यांना मान्य आहेत. कारण वेदांमध्ये अनेक व भिन्न विचार व्यक्त झालेले आहेत व तसेच उपनिषदांमध्येही अनेक भिन्न विचार प्रकट झालेले आहेत. वेदांचे प्रामाण्य, अधिकार व महत्त्व आस्तिक दर्शनांना मान्य आहे. याचा अर्थ त्यांचा वेदांना मान देण्यास विरोध नाही, असा घेणे अधिक उचित ठरेल. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग या दर्शनात वेदांचे स्पष्ट उल्लेख व त्यांतील विचारांचे आधार घेतले जात नाहीत किंवा त्यांचा परामर्शही घेतलेला आढळत नाही, खरे तर सांख्याचे स्वरूप वेदेतर आहे असेही एक मत आहे.

भारतीय दर्शनांचे वर्गीकरण आणखी वेगळया रीतीने करता येते. उदा. न्याय दर्शनात ज्ञानशास्त्रीय- अनुमानप्रधान, प्रमाणप्रधान बाजूंना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. 'न्यायदर्शन' हे भारतीय अनुमानशास्त्र किंवा तर्कशास्त्र आहे म्हणून त्यास पद्धतिशास्त्रीय व ज्ञानशास्त्रीय असे म्हणणे उचित ठरेल. वैशेषिक दर्शनात विचार-पदार्थांना (Categories) विशेष प्राधान्य असल्याने आणि ते विश्वरचनेचा व विश्वस्वरूपाचा विचार अधिक करीत असल्यामुळे त्याला पदार्थदर्शन किंवा विश्वरचनाशास्त्र म्हणणेही योग्य ठरेल.

इतर दर्शन प्रामुख्याने मानवी जीवनाचा, त्यातील सुख-दुःखांचा, साफल्याचा, आनंदाचा, कृतार्थतेचा व सर्वोच्च ध्येय प्राप्त करून घेण्यासाठीच्या साधनेचा किंवा मार्गांचा किंवा तपस्येचा अधिक गांभीयनि व सखोलतेने विचार करतात. म्हणून त्यांना जीवनदर्शन असेही म्हणणे उचित ठरेल. अशा दर्शनात सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, बौद्ध, जैन, चार्वाक या जीवनाच्या आदर्शाचा अधिक आस्थेने विचार केलेला असल्यामुळे त्यांना जीवनवादी दर्शन म्हणणे उचित ठरू शकेल.


    जीवनाचे उद्दिष्ट वेगवेगळे असू शकते आणि ज्या उद्दिष्टाला अधिक प्राधान्य दिले जाते त्याला अनुसरून त्या जीवनदर्शनाचे स्वरूप निश्चित करता येते. असा निकष लावल्यास भारतीय दर्शनांचे तीन जीवनदर्शनांचे प्रकार समजता येतील. ज्या जीवनदर्शनात मोक्षप्राप्ती हे सर्वोच्च ध्येय समजले जाते त्यांना मोक्षप्रधान दर्शन समजता येईल. पण साधारणपणे चार्वाक सोडून सर्वच भारतीय दर्शन मोक्ष हे सर्वोच्च ध्येय मानतात. अशा दर्शनांत वेदांत, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, बौद्ध व जैन या दर्शनांचा समावेश होऊ शकतो. जे दर्शन कर्मकांडप्रधान धार्मिक कार्यांना महत्त्व देते असे मीमांसादर्शन धर्मप्रधान किंवा कर्मप्रधान समजता येते, आणि चार पुरुषार्थ्यांपैकी अर्थ व काम या दोन पुरुषार्थांना ज्यात सर्वोच्च महत्त्व दिलेले आहे ते चार्वाकदर्शन अर्थ-कामप्रधान समजता येते. चार्वाकदर्शन भौतिकवादी किंवा लोकायत म्हणूनही समजले जाते.

 

 तात्त्विक दर्शनांमध्ये धर्मामध्ये अंतर्भूत असणाऱ्या अनेक संकल्पनांचा विचार केलेला आढळतो; कारण धार्मिक विचार, विश्वास व श्रद्धा यांना तत्त्वज्ञानगर्भ विचारांचा आधार व अधिष्ठान दिलेलेच असते व द्यावेही लागते. तत्त्वज्ञान व धर्म यांची अत्यंत स्पष्ट रूपात विभाजक रेषा काढणे अशक्य असते हेही विसरता येणार नाही. एकूण भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रणालींचे, दर्शनांचे असे व्यापक, विविधांगी, समृद्ध व सखोल स्वरूप या सर्व दर्शनातून व्यक्त झालेले पाहावयास मिळते.

अ. वेदांना न मानणारे दर्शने (अभिजात):

वेदांना न मानणारे (अभिजात) भारतीय दर्शन म्हणजेच हेटेरोडॉक्स दर्शन म्हटले जाते. यामध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन दर्शनांचा समावेश होतो:

1. चार्वाक दर्शन: भौतिकवादी दृष्टिकोन, इंद्रियांना अनुभवता येतील अशाच गोष्टी खऱ्या असतात, ते आत्मा, परमात्मा यांसारख्या अमूर्त संकल्पनांना नाकारतात.

  • सदवस्तुशास्त्र: चार्वाक दर्शन पूर्णपणे भौतिकवादी आहे. त्यांनी आत्मा, ईश्वर, आणि परलोक ह्यांचे अस्तित्व नाकारले. त्यांचे मत आहे की, केवळ पृथ्वी, अग्नी, वायू, आणि जल ही चार तत्त्वेच वास्तविक आहेत.
  • पद्धतीशास्त्र: त्यांनी प्रत्यक्ष अनुभवावर भर दिला, प्रत्यक्ष अनुभव हाच एकमेव ज्ञानाचा मार्ग. ज्ञानाचे साधन म्हणजे इंद्रियांचे अनुभूती आणि प्रत्यक्ष निरीक्षण आहे असे मानले.
  • नीतिशास्त्र: चार्वाक दर्शनात इहवाद (हेडोनिज्म) आहे, ज्यात जीवनाचा आनंद घ्या, असे सांगितले जाते. सुख प्राप्त करणे आणि दुःख टाळणे हेच जीवनचे ध्येय.

2. बौद्ध दर्शन: दुःखाचे कारण आणि त्याचे निराकरण शोधणे, आत्मा नाही तो निरंतर बदलणारा प्रवाह आहे, बुद्धीचा वापर करून मुक्ती प्राप्त करणे.

  • सदवस्तुशास्त्र: बौद्ध दर्शनाने "अनात्मवाद" (अर्थात आत्मा नाही) सिद्धांत मांडला. जगताची निर्मिती ही कारण-कार्य (प्रतित्यसमुत्पाद) सिद्धांतावर आधारित आहे. सर्व गोष्टींना क्षणभंगुरता (अनित्य) आहे, आणि सर्व सजीवांमध्ये दुःख आहे.
  • पद्धतीशास्त्र: बौद्ध दर्शनात चित्त आणि इंद्रिय यांच्या एकत्रित प्रयत्नातून ज्ञान प्राप्त होते. केवळ प्रत्यक्ष अनुभव, आणि अनुमान या प्रमाणांना महत्त्व दिले.
  • नीतिशास्त्र: बौद्ध दर्शनात करुणा, अहिंसा, आणि मध्यम मार्ग (अष्टांगिक मार्ग) यांना महत्त्व आहे. पाप व पुण्य यावर जोर दिला जातो.

3. जैन दर्शन: अहिंसा परमो धर्म मानून जीवनात कैवल्य हे साध्य मानतात. धर्म या दृष्टीने पाहता ‘अहिंसा’ त्याचा प्राण आहे, तर तत्त्वज्ञान या दृष्टीने पाहता ‘अनेकांतवाद’ हा त्याचा पाया आहे. 'जैन' हा शब्द जिन या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ 'विजेता' असा होतो.

  • सदवस्तुशास्त्र: जैन दर्शनाने आत्मा आणि कर्म यांचे अस्तित्व मानले आहे. त्यांनी जगाच्या शाश्वतता आणि अनेकांतवाद (सत्याचे विविध अंग) सिद्धांत मांडले.
  • पद्धतीशास्त्र: जैन दर्शनाने सात नय (ज्ञानाचे स्वरूप) आणि स्याद्वाद (सापेक्षवाद) यांना महत्त्व दिले. त्यांच्यामध्ये तप, ध्यान, आणि आत्मनियंत्रण ह्यांनी ज्ञानाची प्राप्ती होते.
  • नीतिशास्त्र: अहिंसा हे जैन दर्शनाचे सर्वोच्च नैतिक मूल्य आहे. सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, आणि अपरिग्रह ह्या व्रतांचे पालन जैन दर्शनात अनिवार्य आहे.

ब. वेदांना मानणारे दर्शने (षड्‌दर्शन)

वेदांना मानणारे भारतीय दर्शन म्हणजेच ऑर्थोडॉक्स दर्शन म्हणून ओळखले जाते. यामध्ये सहा प्रमुख दर्शनांचा समावेश होतो: सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, आणि वेदांत. हे दर्शन वेदांचा अधिकार मानतात आणि त्यांना अंतिम सत्य मानतात.

1. सांख्य दर्शन: विवेक ज्ञानाला प्राध्यान्य असल्यामुळे या दर्शनाला सांख्य हे नाव पडले. प्रकृती व पुरुष ही दोन मूलभूत तत्त्वे या दर्शनात मानल्यामुळे हे द्वैतवादी दर्शन आहे.

  • सदवस्तूशास्त्र: सांख्य दर्शन द्वैतवादी आहे, जे प्रकृती (मूळ पदार्थ) आणि पुरुष (चैतन्य आत्मा) या दोन तत्त्वांवर आधारित आहे.
  • पद्धतीशास्त्र: सांख्य दर्शनाने प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द प्रमाण मानले आहे. इंद्रियांचा त्याग करून मनाची शुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त करणे हा उद्देश आहे.
  • नीतिशास्त्र: सांख्य दर्शनाने व्यक्तीला इंद्रियसुखांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे, कारण ते सुखी जीवनाच्या मार्गातील अडथळे आहेत.

2. योग दर्शन: 'दृश्यते अनेन इति दर्शनम्' म्हणजे 'ज्याद्वारे पाहिले/जाणले जाते ते दर्शन होय' या व्युत्पत्तीनुसार योग हा ज्ञान प्राप्त करून घेण्याचे एक साधन किंवा दृष्टिकोन आहे.

  • सदवस्तूशास्त्र: योग दर्शन सांख्य दर्शनाशी जोडलेले आहे. तेही द्वैतवादी आहे, पण त्यामध्ये आत्मा (पुरुष) आणि शरीर-मन (प्रकृती) यांच्यातील संबंधांवर अधिक भर आहे.
  • पद्धतीशास्त्र: योग दर्शन पातंजल योगसूत्रांवर आधारित आहे, ज्यामध्ये अष्टांग योगाचा मार्ग सांगितला आहे. यांनीही सांख्य दर्शनाप्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द प्रमाण मानले आहे.
  • नीतिशास्त्र: योग दर्शनाने आत्मसंयम, साधना, आणि नैतिकतेवर भर दिला आहे, ज्यायोगे ध्यान आणि साधनेतून आत्मज्ञान प्राप्त होते.

3. न्याय दर्शन: ज्याच्या मदतीने एखाद्या तत्त्वापर्यंत पोहोचता येते, त्यास न्याय म्हणतात. न्यायात पुराव्याच्या आधारे निर्णय घेतले जातात, हे तर्कशास्त्र या विषयाशी संबंधीत आहे.

  • सदवस्तूशास्त्र: न्याय दर्शनाने तर्कशास्त्रावर भर दिला आहे. याच्या मते, ज्ञानाचे चार स्रोत आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, उपमा, आणि शब्द.
  • पद्धतीशास्त्र: न्याय दर्शनात तर्क आणि प्रमाणांचा वापर करून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तर्कशास्त्राचा वापर करून आत्मज्ञानाची प्राप्ती कशी करता येईल, हे त्यांनी स्पष्ट केले. न्याय दर्शनाने प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान प्रमाण मानले आहे.
  • नीतिशास्त्र: न्याय दर्शनाने सत्याच्या शोधात तर्काचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नैतिकता तर्कसंगत विचारांवर आधारित असावी असे त्यांनी मानले.

4. वैशेषिक दर्शन: 'विशेष' या पदार्थाला मूळ मानण्याच्या प्रवृत्तीमुळे या शास्त्राचे नाव वैशेषिक आहे. वैशेषिक तत्त्वज्ञान 6 पदार्थांचा विचार होतो - पदार्थ, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय.

  • सदवस्तूशास्त्र: वैशेषिक दर्शन वस्तुंच्या विशेष गुणधर्मांवर आधारित आहे. त्यांनी पदार्थांची 9 वर्गात विभागणी केली: पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिक्, आत्मा, आणि मन.
  • पद्धतीशास्त्र: वैशेषिक दर्शनाने तर्क आणि विश्लेषणावर आधारित सैद्धांतिक आणि वैचारिक विचारधारा मांडली आहे. वैशेषिकांनी प्रत्यक्ष आणि अनुमान हे दोन प्रमाण मानलेले आहेत.
  • नीतिशास्त्र: वैशेषिक दर्शनाने नैतिकतेच्या दृष्टिकोनातून सत्य, अहिंसा, आणि इतर नैतिक गुणांना  महत्त्व दिले आहे.

5. पूर्व मीमांसा: धार्मिक कर्म हा विषय वेदांच्या ज्या पूर्व भागामध्ये प्रतिपादिला आहे त्याची मीमांसा या दर्शनात केली आहे, म्हणून यास पूर्वमीमांसा म्हणतात.

  • सदवस्तूशास्त्र: पूर्व मीमांसा म्हणजे कर्मकांडाची मीमांसा. त्यांनी वेदांतील विधी आणि यज्ञ कर्म यांचे वर्णन केले आहे.
  • पद्धतीशास्त्र: त्यांनी वेदांमध्ये दिलेल्या कर्मकांडांच्या महत्त्वावर भर दिला आहे. यज्ञ आणि उपासना यांना प्राधान्य दिले आहे. सहा प्रमाणाना मान्यता आहे.
  • नीतिशास्त्र: पूर्व मीमांसा कर्मकांड आणि नैतिक जीवन जगण्यावर भर देते. यज्ञ-यागाद्वारे व्यक्तीने आपल्या कर्माचा विस्तार करावा असे सांगितले आहे.

6. वेदांत दर्शन: वेदांच्या अंत्य भागी येणारी जी उपनिषदे प्रतिपादलेले आहे असे तत्त्वज्ञान.

  • सदवस्तूशास्त्र: वेदांत दर्शन अद्वैत, विशिष्टाद्वैत, आणि द्वैत अशा विविध मतांनी विभागलेले आहे. सर्वात प्रसिद्ध म्हणजे शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत, ज्यात आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत असे सांगितले आहे.
  • पद्धतीशास्त्र: वेदांत दर्शन आत्मज्ञान, भक्ति, आणि ध्यानावर आधारित आहे. त्यांनी मोक्षप्राप्तीचा मार्ग साधण्याच्या शिक्षणावर भर आहे. सहा प्रमाणाना मान्यता आहे.
  • नीतिशास्त्र: वेदांताने सत्य, अहिंसा, आत्मसंयम, आणि इतर नैतिक मूल्यांवर भर दिला आहे, ज्यायोगे व्यक्तीला मोक्ष प्राप्त करता येईल.

भारतीय ज्ञान प्रणाली ही एक प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे ज्यामध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान, वैद्यकशास्त्र, गणित, कला आणि अध्यात्म यासारख्या विविध विषयांचा समावेश आहे. ही हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या पारंपारिक ज्ञानाचा आणि आकलनाचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संग्रह आहे. भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व इतके अधिक यासाठी की, हे हजारो वर्षांपासून विकसित झाले आहे आणि भारतीय समाज आणि संस्कृतीवर त्याचा सखोल प्रभाव पडलेला आहे. यात तत्त्वज्ञान, विज्ञान, वैद्यकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, साहित्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. आज नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना ते व्यवस्थित समजून घेणे आणि मानवतेच्या उन्नतीमधील त्याचे योगदान जाणणे आवश्यक आहे.

    भारतीय ज्ञान प्रणालीचे उद्दिष्ट वास्तवाचे स्वरूप, जीवनाचा उद्देश आणि जीवनातील सर्व गोष्टींचा परस्परसंबंध समजून घेणे हा आहे. ही अस्तित्वाची मूलभूत तत्त्वे, मानवी जीवनातील परस्परसंबंध आणि आत्म-साक्षात्कार आणि आध्यात्मिक उन्नतीचा शोध समजून घेण्याचा प्रयत्न करते. भारतीय ज्ञान प्रणालीचे उद्दिष्ट हे सर्वंकष आणि सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे हे आहे जे भौतिक शोधांच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाच्या सखोल पैलूंचा शोध घ्यावा हिच अपेक्षा.

संदर्भ:

चट्टोपाध्याय, देवीप्रसाद (1965). भारतीय दर्शन सरल परिचय, राजकमल प्रकाशन

गोखले, प्रदिप (1994). भारतीय दर्शनांचे वर्गीकरण – एक दृष्टीकोन, परामर्श, 15/4, 283-290

जोशी, गजानन (1994). भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास (1 ते 12  खंड), मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ

कंगले, र. पं. (1985). श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ

दीक्षित, श्रीनिवास (2009). भारतीय तत्त्वज्ञान - नववी आवृत्ती, फडके प्रकाशन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

सेपिओसेक्सुअल | Sapiosexual

  सेपिओसेक्सुअल | Sapiosexual " 3 इडियट्स " या चित्रपटातील करीना कपूर द्वारा साकारलेलं पिया हे पात्र. तिला तिच्या पार्टनरच्या ज्...