शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

21 व्या शतकासाठी 21 धडे | 21 Lessons For The 21st Century

 21 व्या शतकासाठी 21 धडे | 21 Lessons For The 21st Century

मानवाची उत्क्रांती ही एक खूपच दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यात लाखो वर्षांच्या काळात शरीर, मेंदू, समाज आणि सांस्कृतिक विकास झाला आहे. हॉमिनिड्सचा उदय सुमारे 2.5 दशलक्ष वर्षांपूर्वी होमो हॅबिलिस नावाचा मानव उदयास आला, ज्याने पहिल्यांदा साधनांचा वापर केला. सुमारे 1.8 दशलक्ष वर्षांपूर्वी होमो इरेक्टसने आग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर केला. त्यांनी आफ्रिका ते आशिया आणि युरोपमध्ये स्थलांतर केले. भारतीय उपखंडात, सोहन आणि भीमबेटका यासारख्या स्थळांवर पाषाणयुगीन अवशेष आढळतात. सुमारे 300,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव (होमो सेपियन्स) आफ्रिकेतून उत्क्रांत झाला. त्यांनी विविध प्रसंग आणि घटनामधून अनुभूतुच्या आधारे बोधनिक (Cognitive) क्षमतांमध्ये मोठी वाढ घडवून आणली, ज्यामुळे भाषेचा विकास आणि सामाजिक संरचनांची निर्मिती झाली.

    सुमारे 10,000 BCE - 3000 BCE दरम्यान नवपाषाण युगाची सुरुवात झाली. नवपाषाण युगात मानवाने शेती करायला सुरुवात केली, जे समाज स्थायिक होण्यास आणि गावे, शहरांची निर्मितीला कारणीभूत ठरले. उदा. मेसोपोटेमिया, नाईल नदीचे खोरे. या काळात मातीची भांडी, कापड निर्मिती, आणि पक्की घरे यांचा विकास होऊन सांस्कृतिक विकासाला चालना मिळाली. भारतीय उपखंडात, नर्मदा आणि साबरमती नद्यांच्या किनाऱ्यांवर माणसाचे वस्तीचे पुरावे आढळतात. तसेच मेहरगड (सध्याचे पाकिस्तान) आणि दक्षिण भारतातील स्थळांवर नवपाषाण संस्कृतीचे पुरावे सांगतात की भारतात या काळात शेती आणि स्थायी जीवनाची सुरुवात झाली.

प्राचीन संस्कृती (3000 BCE - 500 CE) मेसोपोटेमिया, इजिप्त, सिंधु, ग्रीक आणि रोमन यासारख्या महान संस्कृतींचा विकास झाला; ज्या लेखन, न्याय, आणि शासनाच्या व्यवस्थांमध्ये प्रगत होत्या. या काळात मोठी शहरे, साम्राज्ये, आणि व्यापारी मार्ग तयार झाले, यातून सुसंस्कृत समाज व्यवस्थेचा उदय झाला. इ.स.पू. 3300–1300 BCE भारतातील पहिली ज्ञात नागरीकरणाची प्रक्रिया सिंधू संस्कृतीत झाली, हडप्पा आणि मोहेन्जोदरो ही महत्त्वाची शहरे होती. इ.स.पू. 1200–600 BCE काळात लोहाचा वापर वाढला आणि आर्यांचे आगमन झाले. भारतातील वैदिक संस्कृतीचा उदय झाला आणि वैदिक साहित्य ह्या काळातील प्रमुख उपलब्धी आहे. तसेच या काळात भारतात 16 महाजनपदे स्थापन झाली. याच काळात बुद्ध आणि महावीर यांचा जन्म झाला, ज्यामुळे बौद्ध आणि जैन धर्म उदयास आले. नंद वंशाच्या उदयानंतर मगधचे महत्व वाढले त्यांनतर चंद्रगुप्त मौर्याने पहिल्यांदा एकत्रित भारताचा मोठा भाग नियंत्रित केला. अशोकाचा काळ हा धार्मिक सहिष्णुतेचा आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराचा काळ होता.

मध्ययुग (500 CE - 1500 CE) रोमन साम्राज्याच्या पतनानंतर, युरोपमध्ये फ्यूडल समाजव्यवस्था प्रचलित झाली, चर्च आणि धर्माचे वर्चस्व होते. इस्लामिक जगतात शास्त्र, गणित, वैद्यक, आणि तत्वज्ञानात प्रचंड प्रगती झाली. प्रत्येक खंडातील स्वायत्त विकास: जगाच्या इतर भागांत (उदा. आफ्रिका, आशिया, अमेरिकेत) विविध संस्कृती आणि समाजांचे विकास घडले. गुप्त काळाला भारताचा "सुवर्णकाळ" म्हटले जाते. विज्ञान, गणित, साहित्य, कला, आणि तत्त्वज्ञानात प्रगती झाली. आर्यभट्ट, कालिदास यांसारख्या विद्वानांची ख्याती या काळात होती. तसेच राजपूत साम्राज्य, दिल्ली सल्तनत आणि मोघल साम्राज्य यांचा उदय झाला आणि साहित्य, कला आणि वास्तुशास्त्र नव्याने उदयास आले.  

 पुनरुज्जीवन आणि आधुनिक काळाची सुरुवात (1500 CE - 1900 CE) या काळात कला, विज्ञान, आणि मानवतावादाचे पुनरुज्जीवन झाले. गॅलिलिओ, न्यूटन यांसारख्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक पद्धती विकसित केल्या. 18व्या शतकात सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन, शहरीकरण, आणि तंत्रज्ञान विकास झाला यातून जगभर व्यापाराचे जाळे वाढले. या काळात युरोपियन शक्तींनी जगभरात वसाहती स्थापन केल्या आणि नवीन प्रदेशांवर नियंत्रण मिळवले. भारतात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्याच बरोबर इंग्रज आणि इतर परकीय आक्रमणे झाली आणि या काळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आणि शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आले.

20व्या शतकातील वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती, या शतकात विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली. उदा. इलेक्ट्रिसिटीचा वापर, विमानांची निर्मिती, आणि संगणक क्रांती. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांनी जगभरातील राजकीय रचना बदलल्या. विविध राष्ट्रांनी स्वातंत्र्य प्राप्त केले, आणि शीतयुद्धाचा काळही सुरू झाला. शतकाच्या शेवटी, माहिती तंत्रज्ञानाने जगभरातील लोकांमध्ये संवाद सुलभ केला, ज्यामुळे जागतिकीकरण आणि इंटरनेटचा प्रसार झाला. मानवाची उत्क्रांती केवळ शारीरिकच नाही तर मानसिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून देखील होती. या विकासाने मानवाला साधनांचा वापर करणाऱ्या प्राण्यापासून उच्च प्रगत समाज तयार करणाऱ्या सजीवांपर्यंत घेऊन आले.

21 व्या शतकासाठी 21 धडे:

21 Lessons for the 21st Century हे युवाल नोआ हरारी यांचे पुस्तक आहे, ज्यात त्यांनी आधुनिक जगातील काही प्रमुख आव्हाने आणि शक्यता यांचा विचार केला आहे. या पुस्तकात 21 व्या शतकातील विविध सामाजिक, राजकीय, तांत्रिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. पुस्तकातील काही महत्त्वाचे विषय:

  • तंत्रज्ञानाचे वाढते वर्चस्व आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम.
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि मशीन लर्निंग यांचा भविष्यावर होणारा प्रभाव.
  • राजकारण, लोकशाही, राष्ट्रवाद आणि जागतिकीकरण यातील संघर्ष.
  • शैक्षणिक प्रणालीतील बदल आणि भविष्याचे शिक्षण कसे असावे.
  • हवामान बदल, पर्यावरणीय आव्हाने, आणि जैवविविधता संकटे.

हरारीने या पुस्तकात मानवी संस्कृतीला प्रभावित करणाऱ्या विविध घटना आणि शक्यतांचा आढावा घेतला आहे आणि आपल्याला या सर्व गोष्टींवर विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.

1. तंत्रज्ञानाची आव्हाने:

तंत्रज्ञानाचे वाढते वर्चस्व आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर सखोल चर्चा या पुस्तकात आढळते. तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कसे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत आणि भविष्यात कशा प्रकारे ते अधिक प्रभावी होतील, हे पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे.

हरारी यांच्या मते, तंत्रज्ञानाचे वाढते प्राबल्य अनेक नोकऱ्यांवर परिणाम करेल. AI आणि ऑटोमेशनमुळे अनेक नोकऱ्या नष्ट होतील, ज्यामुळे लोकांच्या रोजगाराच्या संधींमध्ये मोठे बदल होतील. तंत्रज्ञानाच्या जगात डेटा ही सर्वात महत्त्वाची संपत्ती बनली आहे. मोठ्या कंपन्या आणि सरकार डेटा गोळा करून लोकांच्या वर्तनाचे विश्लेषण करतात आणि त्याचा वापर करून निर्णय घेतात. तंत्रज्ञानामुळे आपली खरेदी करण्याची पद्धत, मित्र निवड, आणि अगदी राजकीय विचारसरणीवरही प्रभाव पडतो. सोशल मीडिया आणि अल्गोरिदम लोकांच्या विचार प्रक्रियेला प्रभावित करत आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे गोपनीयता आणि नैतिकतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. AI आणि डेटा वापरामुळे लोकांचे खाजगी जीवन अधिक खुले झाले आहे, आणि त्यावर कसे नियंत्रण ठेवावे, हा मोठा प्रश्न आज आहे.

AI आणि रोबोट्स यामध्ये होणारी प्रगती मानवाचे अस्तित्व आणि त्याच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. भविष्यातील तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा मानवी अस्तित्वासाठी कसा उपयुक्त ठरू शकेल, यावर हरारी यांनी विचार केलेला आहे. यातून स्पष्ट होते की तंत्रज्ञानाचे वाढते वर्चस्व आपले जीवन अधिक सोपे करत असले तरी, त्याचे गंभीर परिणामही आहेत.

2. नोकरी-व्यवसायाची आव्हाने:

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), बिग डेटा, आणि मशीन लर्निंग यांचा भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा सखोल विचार आज केला जात आहे. त्यानुसार, या तंत्रज्ञानांचा परिणाम केवळ तांत्रिक स्तरावर नाही, तर मानवाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगावर होईल.

AI आणि ऑटोमेशनच्या प्रगतीमुळे अनेक उद्योगांमध्ये मानवी श्रमाची गरज कमी होईल. त्यामुळे अनेक पारंपारिक नोकऱ्या संपुष्टात येतील, तर नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित नोकऱ्या निर्माण होतील. मात्र, हे संक्रमण अनेकांना आव्हानात्मक ठरू शकेल, कारण सर्वांनाच तंत्रज्ञानाशी जुळवून घेता येईलच असे नाही. बिग डेटा आणि AI वापरून सरकारे आणि कंपन्या अधिक सखोलपणे नागरिकांची माहिती गोळा करू शकतील. त्यामुळे खासगीपणाचे प्रश्न उभे राहतील. कोणती माहिती कशी आणि कशासाठी वापरली जाते, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे आणि नियमांची आवश्यकता निर्माण होईल.

AI आणि रोबोटिक्सच्या वाढत्या वापरामुळे नैतिक मुद्दे उपस्थित होतील. उदाहरणार्थ, AI प्रणाली निर्णय घेण्यास सक्षम झाल्यावर मानवी नैतिकतेची व्याख्या आणि तिची अंमलबजावणी कशी होईल? AI युद्धात किंवा गुन्हे तपासणीसाठी वापरल्यास काय नैतिक आव्हाने उभे राहतील? AI मुळे मानवी सर्जनशीलतेवर, स्वातंत्र्यावर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडू शकतो. काही तज्ञांच्या मते, AI भविष्यात मानवाच्या क्षमता ओलांडू शकते, ज्यामुळे मानवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

हरारी यांच्या मते, भविष्यात AI आणि बिग डेटा या तंत्रज्ञानांनी जगात मोठे सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. यासाठी मानवजातीला जागतिक पातळीवर सामूहिक पद्धतीने विचार करावा लागेल आणि या आव्हानांना तोंड द्यावे लागेल.

3. राजकीय आव्हाने:

"राजकारण, लोकशाही, राष्ट्रवाद आणि जागतिकीकरण" या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मुद्द्यांमधील संघर्षाची कारणे आणि त्याचा भविष्यातील संभाव्य परिणाम समजावून सांगितला आहे.

हरारी म्हणतात की, तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे पारंपरिक लोकशाही मॉडेलला आव्हाने निर्माण होत आहेत. अल्गोरिदम, बिग डेटा, आणि AI सारख्या तंत्रज्ञानामुळे राजकीय निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पडत आहे. काही देशांमध्ये, सत्ताधारी लोक या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकशाहीवर बंधने आणण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दशकांत जागतिकीकरणामुळे राष्ट्रवाद कमी झाला असे वाटले होते, परंतु आता अनेक देशांमध्ये राष्ट्रवादाचे पुनरुत्थान होत आहे. हरारी यावर विचार करतात की, आधुनिक जगात लोक स्वतःच्या राष्ट्रीय ओळखीला अधिक महत्त्व देत आहेत. हे जागतिकीकरणाच्या धोरणांवर टीका करत आहे, कारण काही लोकांना जागतिक व्यापार आणि सांस्कृतिक आदानप्रदानात त्यांच्या ओळखीचा, संस्कृतीचा, आणि स्वायत्ततेचा धोका वाटतो.

जागतिकीकरणाने जगाला अधिक परस्परावलंबी बनवले आहे, परंतु त्याचे काही नकारात्मक परिणामही आहेत. अनेक लोकांना जागतिक व्यापार आणि तंत्रज्ञानामुळे त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. यामुळे राष्ट्रवादी भावना वाढत आहेत आणि अनेक देश जागतिक पातळीवरील सहकार्याऐवजी स्वतःच्या हितसंबंधांना प्राधान्य देत आहेत.

तंत्रज्ञानाच्या मदतीने राजकारणाचे स्वरूप बदलत आहे. सोशल मीडियाचा वापर करून लोकांची मते तयार केली जात आहेत आणि निवडणुकीत या गोष्टींचा उपयोग होत आहे. हरारी यावर प्रकाश टाकतात की, AI आणि बिग डेटा यांचा वापर लोकांच्या मतांवर आणि निर्णयांवर कसा प्रभाव टाकत आहे, आणि हे लोकशाहीसाठी कसे धोका निर्माण करू शकते. हरारी यांचे हे विचार सूचित करतात की 21 व्या शतकातील राजकारणात लोकशाही, राष्ट्रवाद, आणि जागतिकीकरण यांचे अनोखे मिश्रण असेल, ज्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक आव्हाने महत्त्वाची भूमिका बजावतील.

4. शैक्षणिक आव्हाने: 

शैक्षणिक प्रणालीतील बदल आणि भविष्याचे शिक्षण कसे असावे यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. हरारीच्या मते, 21 व्या शतकातील शिक्षण प्रणालीला जगातील वेगाने होणारे तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. त्याच्या मते शैक्षणिक प्रणालीत पुढील गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतील:

  • मुलांची अनिश्चिततेशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवणे: भविष्यातील नोकऱ्या आणि कौशल्ये आजच्या शैक्षणिक प्रणालीत शिकवली जात नाहीत. तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीमुळे काही उद्योग नष्ट होतील, तर काही नवीन तयार होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना बदलांसाठी तयार करण्यासाठी शाळांनी त्यांच्यात लवचिकता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढवावी.
  • सर्जनशीलता आणि संवाद कौशल्ये: भविष्यात, यंत्रमानव आणि AI मूलभूत कामे करू शकतील, परंतु सर्जनशीलता, समस्या सोडवणे, आणि आंतर-मानवी संवाद ही कौशल्ये महत्वाची ठरतील. शाळांनी विद्यार्थ्यांना या कौशल्यांवर भर द्यावा.
  • तंत्रज्ञानाबद्दल समज आणि नैतिकतेचा विचार: विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याची स्पष्ट समज दिली पाहिजे. त्याचबरोबर, तंत्रज्ञानाचा नैतिक वापर, खोट्या बातम्यांपासून सावध राहणे आणि गोपनीयतेचे महत्त्व शिकवणे आवश्यक आहे.
  • जीवनात सतत शिकत राहणे: शिक्षण हे केवळ बालपणात किंवा तरुणावस्थेतच मर्यादित राहणार नाही. तांत्रिक बदलांमुळे, लोकांना त्यांच्या संपूर्ण जीवनात विविध कौशल्ये शिकणे आणि आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण हे सतत सुरू राहणारी प्रक्रिया होईल.
  • सहकार्य आणि जागतिक दृष्टिकोन: जागतिक स्तरावर विचार करणारे, विविध संस्कृती आणि लोकांसोबत सहकार्य करणारे नागरिक घडविणे गरजेचे आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना सहकार्य, संवाद आणि जागतिक समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची क्षमता दिली पाहिजे.

हरारी यांच्या मते, पारंपरिक शिक्षण पद्धतीत केवळ माहितीचे पाठांतर करणे पुरेसे नाही. माहिती सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे, विद्यार्थ्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य माहिती शोधणे, तिचे विश्लेषण करणे, आणि तिचा योग्य वापर कसा करायचा हे शिकणे.

5. पर्यावरणीय आव्हाने:

हवामान बदल, पर्यावरणीय आव्हाने, आणि जैवविविधता संकटे यांचा विशेष उल्लेख केला आहे, कारण हे विषय 21 व्या शतकातील जगासमोर असलेल्या प्रमुख आव्हानांपैकी आहेत. या मुद्द्यांवर पुस्तकात पुढील प्रकारे चर्चा केली आहे:

  • हवामान बदल: हरारी स्पष्ट करतात की, हवामान बदल मानवजातीसमोरील एक मोठे संकट आहे. ते म्हणतात की मानवजातीने औद्योगिकीकरण, वनतोड, आणि जीवाश्म इंधनांचा अति वापर करून नैसर्गिक संतुलन बिघडवले आहे. यामुळे जागतिक तापमान वाढत आहे, हवामानाच्या अतिवृष्टी व दुष्काळासारख्या घटना घडत आहेत, आणि समुद्राची पातळी वाढत आहे. हे परिणाम पृथ्वीवरील सर्व सजीवांवर विपरीत परिणाम करत आहेत.
  • पर्यावरणीय आव्हाने: हरारी सांगतात की मानवी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी पर्यावरणीय संसाधनांचा नाश होतो आहे. प्रदूषण, विषारी कचरा, जंगलतोड आणि जैविक संसाधनांचा गैरवापर यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. पर्यावरणाच्या या नुकसानीमुळे भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक साधने टिकवून ठेवणे एक मोठे आव्हान आहे.
  • जैवविविधता संकटे: पुस्तकात जैवविविधतेच्या घटण्यावरही विचार करण्यात आला आहे. हरारी यांचा दावा आहे की मानवाच्या क्रियाकलापांमुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर वन्यजीवांचे वातावरण बदलले, त्यामुळे अनेक प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत. जैवविविधता कमी झाल्याने परिसंस्थांचा समतोल बिघडतो, आणि त्याचा परिणाम शेवटी मानवांवरही होतो.

हरारी यांच्या मते, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हाने हाताळण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा या संकटांमुळे मानवजातीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

समारोप

या पुस्तकात 21 मुद्द्यांवर चर्चा केली गेली आहे, ज्याव्दारे 21 व्या शतकात मानवजातीसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकला आहे. तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. मानवी कौशल्यांची गरज कमी होणार आहे, त्यामुळे लोकांनी स्वतःला कसे घडवायला हवे यावर लेखक चर्चा करतो. आधुनिक काळात डेटा खूप महत्त्वाचा झाला आहे. कंपन्या आणि सरकारे मोठ्या प्रमाणात डेटा गोळा करत आहेत. यामुळे आपली गोपनीयता धोक्यात आली आहे. भविष्यात सायबर युद्धे, आर्थिक आणि तांत्रिक युद्धे होण्याची शक्यता आहे. जगभरात जागतिकीकरणाने अनेक फायदे दिले, पण त्याचवेळी राष्ट्रीयतेची भावना देखील वाढली आहे. यामुळे जागतिक स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो.

21 व्या शतकासाठीच्या बदलत्या गरजांना अनुसरून शिक्षणाची प्रणाली बदलण्याची गरज आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने मानवाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. वैज्ञानिक शोध आणि नैतिक मुद्द्यांवर चर्चा करणे अत्यावश्यक ठरते आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोट्सच्या उदयामुळे काही लोकांना आपल्या जीवनाचा अर्थ सापडणार नाही. यासाठी आत्मचिंतन आणि जीवनाच्या ध्येयांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरेल. या धड्यांतून हरारीने आधुनिक जगाच्या समस्यांवर विचार मांडत, मानवी जीवनाचा अभ्यास करून त्यावर तात्कालिक उपाय देखील सुचवलेले आहेत.


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Harari, Y. N. (2018). 21 Lessons For The 21st Century, Jonathan Cape

हरारी, वाय. एन.एस. (सुनील तांबे यांनी केलेले भाषांतर) (२०२०). 21व्या शतकासाठी 21 धडे, मधुश्री पब्लिकेशन्स

1 टिप्पणी:

Thank you for your comments and suggestions

मन वळवण्याचे मानसशास्त्र | The Psychology of Persuasion

मन वळवण्याचे मानसशास्त्र |  The Psychology of Persuasion                        अंगुलिमाल हा एक क्रूर दरोडेखोर होता. तो लोकांना ठार मारून ...