मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

नवीन वर्षासाठी 12 संकल्प

 

नवीन वर्षासाठी 12 संकल्प

नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेले निश्चय किंवा उद्दिष्ट. हे संकल्प आपल्याला जीवन अधिक शिस्तबद्ध, समृद्ध, आणि समाधानकारक बनवण्यास मदत करतात. नवीन वर्ष हे नवा आरंभ करण्यासाठी उत्तम संधी असते. उदाहरणार्थ, पहिला संकल्प म्हणजे नियमित व्यायाम करण्याचा. अनेक लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिमला जाणे, रोज चालणे किंवा योगासने करण्याचा निर्धार करतात. दुसरा संकल्प म्हणजे वाचनाची सवय लावणे. दर महिन्याला एक चांगले पुस्तक वाचण्याचा निर्धार केल्याने आपले ज्ञान वाढते आणि विचारांची मर्यादा रुंदावते. तिसरा संकल्प म्हणजे आर्थिक शिस्त पाळणे. अनावश्यक खर्च कमी करून बचत करण्याचा निर्धार केल्याने भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थैर्य मिळवता येते. अशा संकल्पांनी आपल्या जीवनात प्रगती साधता येते आणि एक नवा दृष्टिकोन मिळतो. यशस्वी लोकांच्या काही सवयी असतात, त्यांनी त्या अंगी बनविलेल्या असतात ज्यामुळे ते यशस्वी होतात. अशा सवयी आणि संकल्पाविषयी जाणून घेऊयात.

यशस्वी लोकांचे संकल्प

यशस्वी व्यक्ती त्यांच्या नियोजित जीवनशैलीसाठी काही विशिष्ट सवयी, दृष्टीकोन, आणि रणनीतींचा वापर करतात. ही रहस्ये त्यांच्या यशामागील प्रमुख कारणे असतात. खाली दिलेली माहिती तुम्हाला त्यांची जीवनशैली समजून घेण्यास मदत करेल आणि सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी प्रेरणा देईल.

1. उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करा:

यशस्वी लोक एकाच उत्पन्न स्रोतावर अवलंबून राहत नाहीत. ते विविध मार्गांनी पैसा कमवतात, जसे की व्यवसाय, गुंतवणूक, प्रॉपर्टी, आणि इतर मार्ग. उत्पन्नाचे विविध स्त्रोत असणे हे आर्थिक स्थैर्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. एलेन मस्क केवळ टेस्ला आणि स्पेसएक्सवर अवलंबून नाही. तो न्यूरालिंक, द बोरिंग कंपनी, आणि सोलरसिटीसारख्या कंपन्यांतून उत्पन्न मिळवतो. तसेच मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज, तेल-गॅस, दूरसंचार (Jio), आणि रिटेल अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. उत्पन्नाचे विविध स्त्रोत असल्यामुळे रिलायन्स सतत प्रगती करत आहे. यासाठी Multiple Streams of Income by Robert Allen आणि The Millionaire Fastlane by MJ DeMarco यांची पुस्तके आपणास समृद्ध करू शकतील.

2. गुंतवणुकीवर भर द्या:

यशस्वी लोक त्यांच्या कमाईचा एक मोठा हिस्सा गुंतवणुकीसाठी वापरतात. ते शेअर बाजार, स्टार्टअप्स, किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवतात. पैसा केवळ खर्च करण्यासाठीच असतो असे नाही तर तो वाढविण्यासाठी गुंतवणूक महत्त्वाची आहे. वॉरेन बफे (अमेरिकन गुंतवणूकदार) यांनी आपल्या कमाईचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवला, ज्यामुळे त्यांना लांब पल्ल्याचा मोठा फायदा मिळाला. तसेच रतन टाटा यांनी "टाटा कॅपिटल" आणि "टाटा सन्स"द्वारे विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी स्टार्टअप्समध्ये (उदा. Ola, Paytm) यासारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून भारतात नवकल्पनांना पाठबळ दिले. यासाठी The Intelligent Investor by Benjamin Graham आणि Common Stocks and Uncommon Profits by Philip Fisher यांची पुस्तके आपणास समतोल गुंतवणुकीस मदत करू शकतील.

3. व्यक्तिगत ब्रँडिंग निर्माण करा:

यशस्वी लोक स्वतःला एक ब्रँड म्हणून उभे करतात. त्यांच्या नावाशी विश्वास आणि गुणवत्ता जोडलेली असते, त्यामुळे त्यांचे उत्पादन किंवा सेवा याची नेहमी मागणी असते. विराट कोहलीने केवळ क्रिकेटमधूनच नाही तर ब्रँड अँम्बेसेडर म्हणून स्वतःची ओळख तयार केली, ज्यामुळे सर्वात अधिक कमाई करणारा खेळाडू बनला. तसेच इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव विश्वासार्हतेचे प्रतीक आहे. त्यांचा साधेपणा आणि नैतिक व्यवसाय धोरणांमुळे त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे. यासाठी Crushing It! by Gary Vaynerchuk आणि Building a Story Brand by Donald Miller यांची पुस्तके आपणास ब्रँड निर्माण करण्यास उपयुक्त ठरतील.

4. नेटवर्किंगची ताकद ओळखा:

यशस्वी लोक प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध ठेवतात. चांगले नेटवर्क त्यांना नवीन संधी, व्यवसाय सहयोग, आणि माहिती मिळवून देण्यास मदत करते. ओप्रा विन्फ्रेने (टीव्ही शोची निवेदिका) तिच्या प्रभावशाली व्यक्तींसोबतच्या नेटवर्कमुळे अनेक उद्योजक आणि मनोरंजन प्रकल्पांना चालना दिली. बायोकॉनच्या किरण मजूमदार-शॉ यांनी उद्योगजगतातील अनेक महत्त्वाच्या लोकांशी संबंध प्रस्थापित करून बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात प्रचंड यश मिळवले. यासाठी Never Eat Alone by Keith Ferrazzi आणि How to Win Friends and Influence People by Dale Carnegie यांची पुस्तके आपणास नेटवर्क निर्माण करण्यास उपयुक्त ठरतील

5. वेळेचे व्यवस्थापन करा:

वेळेचे महत्त्व यशस्वी लोक खूप चांगल्या प्रकारे जाणतात. ते प्रत्येक मिनिटाचा योग्य उपयोग करतात. कमी वेळेत अधिक उत्पादक कसे राहायचे, याचा अभ्यास ते सतत करत असतात. बिल गेट्स आपले वेळापत्रक मिनिटांनुसार आखतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ राखून ठेवतो, ज्यामुळे तो अधिक उत्पादक ठरतो. त्यांनी आपल्या वेळापत्रकात पुस्तक वाचनालाही स्थान दिलेले आहे, ते वर्षाला जवळपास 50 पुस्तके वाचतात. तसेच धीरूभाई अंबानी यांनी त्यांच्या व्यवसायात वेळेचा प्रभावी वापर केला. त्यांनी नेहमी वेळेचे योग्य नियोजन करून आपल्या कल्पना योग्य वेळी अंमलात आणल्या. यासाठी The 7 Habits of Highly Effective People by Stephen R. Covey आणि Deep Work by Cal Newport यांची पुस्तके आपणास वेळेचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरतील

6. सतत शिकत रहा:

यशस्वी लोक कधीही शिकणे थांबवत नाहीत. ते सतत नवीन कौशल्ये आत्मसात करतात, पुस्तके वाचतात, आणि नवनवीन कोर्सेसमध्ये सहभागी होतात. सतत स्वतःला अद्ययावत ठेवणे यशस्वी लोकांची महत्त्वाची सवय असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि ते त्यांच्या काळातील सर्वाधिक शिक्षित व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी अर्थशास्त्र, कायदा, आणि राजकारणात उच्च शिक्षण घेतले होते. ते कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांसारख्या जगातील प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमधून शिकले होते. शिक्षणाचा वापर त्यांनी केवळ स्वतःच्या उन्नतीसाठीच नाही, तर महिला, कामगार, वंचित आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केला. तसेच डॉ. अब्दुल कलाम यांनी कायम शिकण्याची प्रवृत्ती ठेवली. त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, आणि नेतृत्व यामध्ये प्राविण्य मिळवून भारताला जागतिक स्तरावर नेले. यासाठी Mindset: The New Psychology of Success by Carol S. Dweck आणि The Power of Now by Eckhart Tolle यांची पुस्तके आपणास सतत शिकत राहण्यास प्रेरणा देत राहतील.

7. जोखीम घेण्याची तयारी ठेवा:

यशस्वी लोक योग्य अभ्यास आणि नियोजन करून जोखीम स्वीकारायला घाबरत नाहीत. ते नेहमी नव्या संधींचा विचार करतात आणि त्यातून चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेवतात. जेफ बेझोसने अमेझॉनची सुरुवात करताना नोकरी सोडून मोठा आर्थिक धोका पत्करला, पण त्यानी आज एक यशस्वी उद्योग साम्राज्य उभे केलेले आपणास दिसत आहे. गौतम अदानी यांनी बंदर व्यवस्थापन, ग्रीन एनर्जी, आणि अनेक नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश करत मोठ्या प्रमाणावर जोखीम घेतली, ज्यामुळे अदानी ग्रुप झपाट्याने वाढत आहे (जोखीम त्यांनी घेतली की शेअर होल्डरांनी यांचे उत्तर येत्या काळात मिळेल). यासाठी Daring Greatly by Brené Brown आणि Start With Why by Simon Sinek यांची पुस्तके आपणास संतुलित जोखीम घेण्यास मार्गदर्शन करतील.

8. अनावश्यक खर्चाला नाही म्हणा:

यशस्वी लोक फाजील खर्च टाळतात. ते त्यांच्या पैशाचा योग्य नियोजन करून त्याचा उपयोग करतात. श्रीमंती म्हणजे फक्त उधळपट्टी नाही, तर पैशाचा शहाणपणाने वापर करण्याची कला आहे. मार्क झुकरबर्ग नेहमी साधे कपडे घालतो आणि उधळपट्टी टाळतो, ज्यामुळे त्याला वेळ आणि ऊर्जा वाचवता येते. तसेच विप्रोचे आजीम प्रेमजी यांची साधी जीवनशैली प्रसिद्ध आहे. त्यांनी फाजील खर्च टाळून कंपनीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. यासाठी The Millionaire Next Door - Thomas J. Stanley & William D. Danko आणि Your Money or Your Life by Vicki Robin यांची पुस्तके आपणास अनावश्यक खर्च टाळण्यास मार्गदर्शन मिळेल.

9. मनःशांतीला महत्त्व द्या:

यशस्वी लोक त्यांच्या मानसिक आरोग्याचे चांगले व्यवस्थापन करतात. ते ध्यान, योग, किंवा मानसिक ताण कमी करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करतात, कारण शांत मन यशस्वी निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. अभिनेता अक्षय कुमार आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी ध्यान आणि योगाचा नियमित सराव करतो, ज्यामुळे तो नेहमी ऊर्जावान राहतो. तसेच सचिन तेंडुलकरने करिअरच्या ताण-तणावातही मनःशांती टिकवून ठेवली. ध्यान आणि फोकस यांच्या सहाय्याने त्यांनी सतत उत्कृष्टता मिळवली. यासाठी The Miracle Morning by Hal Elrod आणि The Art of Happiness by Dalai Lama यांची पुस्तके आपणास मनशांती शोधण्यास मदत करतील.

10. स्पष्ट ध्येये-उद्दिष्टे ठेवा:

यशस्वी लोक नेहमी त्यांच्या ध्येयांबद्दल स्पष्ट असतात. त्यांनी त्यांच्या योजनेचा रोडमॅप तयार केलेला असतो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या यशाचा मार्ग ठरवायला सोपे जाते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याच्या उद्दिष्टासाठी स्वतःला समर्पित केले आणि त्यांच्या कृती स्पष्ट आणि लक्षवेधी होत्या. ते कधीही आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत आणि इतरांनाही विचलित करू दिले नाही. तसेच विरेंद्र सेहवागने क्रिकेटमध्ये नेहमी स्पष्ट उद्दिष्टे ठेवले होते. त्याच्या धडाकेबाज शैलीने खेळ बदलला, आणि तो आज यशस्वी उद्योजकही आहे. यासाठी Atomic Habits by James Clear आणि Goals! by Brian Tracy ही पुस्तके आपणास आपल्या जीवनाविषयी स्पष्ट ध्येय धोरणे आखण्यास मदत करतील.

11. मूल्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित करा:

यशस्वी लोक त्यांच्या ग्राहकांसाठी अधिकाधिक मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन किंवा सेवा खूप लोकप्रिय ठरते, आणि लोक त्यांच्या ब्रँडवर विश्वास ठेवतात. स्टीव्ह जॉब्सने ग्राहकांसाठी आयफोनसारखे उत्पादन निर्माण केले, ज्यामुळे संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्र बदलून गेले. तसेच अमूल ब्रँड हे भारतीय ग्राहकांसाठी उच्च प्रतीची आणि किफायतशीर उत्पादनं तयार करून ग्राहकांना मूल्य दिले. यासाठी Blue Ocean Strategy by W. Chan Kim & Renée Mauborgne आणि The Lean Startup by Eric Ries यांची पुस्तके आपणास जीवनातील मूल्ये आणि नैतिकता कशी विकसित करता येईल हे सांगतात.

12. स्वतःला नेहमी प्रेरित करत रहा:

यशस्वी लोक स्वतःला नेहमी प्रेरित ठेवतात. ते अपयशाने खचून जात नाहीत, उलट त्यातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोनच त्यांना नेहमी पुढे नेत राहतो. क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी अपयशानंतरही शांत राहतो आणि पुढील सामन्यासाठी स्वतःला तयार ठेवतो. हीच त्याची वृत्ती कठीण प्रसंगातही संयमी राहण्यास आणि आशावादी राहून यशस्वी होण्यास मदतगार ठरली. तसेच "पय्योली एक्सप्रेस" म्हणून ओळखली जाणारी पी. टी. उषा अपयशातूनही पुढे जाण्यासाठी नेहमी प्रेरित राहिली आणि भारताला क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. यासाठी Can't Hurt Me by David Goggins आणि Awaken the Giant Within by Tony Robbins ही पुस्तके आपणास सतत प्रेरित राहण्यास मदत करतील.

समारोप:

या 12 रहस्यांमधून एक गोष्ट लक्षात येते की यशस्वी होणे म्हणजे केवळ आर्थिक संपत्तीचा विचार नाही, तर विचारसरणी, सवयी, आणि कौशल्यांचा योग्य समतोल आहे. हे गुण आत्मसात केल्यास कोणत्याही व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी मदत होऊ शकते आणि या गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणल्यास आपणही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. पुढील वर्षी आपण प्रत्येक महिन्यास किमान एक सवय अंगिकारल्यास आपणही यशस्वी व्हाल यात तीळमात्र शंका नाही, आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!  

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

1 टिप्पणी:

Thank you for your comments and suggestions

न्यूरोप्लास्टिसिटी: रोज बदलणारा मेंदू | Neuroplasticity: Experience Changes in the Brain

  न्यूरोप्लास्टिसिटी: रोज बदलणारा मेंदू न्यूरोप्लास्टिसिटी , ज्याला मेंदूची लवचिकता किंवा पुनर्रचना क्षमता देखील म्हणतात , मेंदूची शिकण्या...