मानसिक आरोग्य आणि अप्रमाणित चाचण्यांचे संकट
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात वैज्ञानिकतेचे
महत्त्व प्रचंड आहे. परंतु काही ठिकाणी अयोग्य व्यक्ती आणि अप्रमाणित चाचण्यांचा
आधार घेऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. एका वडिलांच्या अनुभवातून याचे गांभीर्य
स्पष्ट होते. या प्रकरणात,
एका संस्थेकडून पालकांना फसविण्याचा
प्रयत्न झाला, आणि त्यात गैरवापराचा एक नमुना समोर
आला. (माझ्या बाबतीतही दोन वर्षापूर्वी असेच घडून गेलेले आहे.)
एका दिवशी एका समुपदेशन संस्थेतून फोन आला.
त्यांनी सांगितले की, आपल्या
मुलाने शाळेतील स्पर्धेत चांगली
कामगिरी केली आहे. पालकांचे अभिनंदन केले गेले आणि एक आकर्षक प्रस्ताव मांडण्यात
आला:
आपल्या मुलाचे मानसशास्त्रीय परीक्षण केले जाईल
आणि त्याद्वारे त्याच्या बहुविध बुद्धिमत्तेचे (Multiple Intelligences) विश्लेषण केले जाईल. तसेच त्याची अध्ययन शैली, अभ्यास सवयी, आणि व्यक्तिमत्व प्रकारानुसार विश्लेषण केले जाईल आणि या सर्वांचे एक
विस्तृत, 60-पानी अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर संस्थेचे
समुपदेशक सदर अहवालाच्या आधारे आपल्या मुलाचे समुपदेशन करणार असल्याचे सांगण्यात
आले. ऐकायला हा प्रस्ताव आकर्षक वाटला. परंतु संशयाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा
संस्थेकडे संबंधित अधिकृत नोंदणी आणि पात्रतेबद्दल विचारणा केली गेली.
पालकांनी
संस्थेशी अधिक तपशीलवार संवाद साधला. त्यांनी विचारले:
1. आपल्या
संस्थेची नोंदणी केलेली आहे का?
संस्थेने स्पष्टपणे सांगितले की त्यांना कोणत्याही कायद्यांतर्गत
नोंदणीची आवश्यकता नाही. हे उत्तर गंभीर होते.
2. आपल्या
समुपदेशकांची पात्रता काय आहे?
मुलांच्या मानसशास्त्रीय परीक्षणासाठी
समुपदेशकाची योग्य शैक्षणिक पार्श्वभूमी आणि पात्रता असावी लागते. पण त्यांनी सांगितले
की, त्यांचा समुपदेशकाने इंजिनिअरिंग केले
आहे. मानसशास्त्रात कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. हे ऐकून पालक अधिक सावध
झाले.
3. वापरण्यात
येणाऱ्या चाचण्या कोणत्या आहेत?
मुलाच्या परीक्षणासाठी कोणत्या चाचण्या वापरणार याची विचारणा केली
गेली. तेंव्हा उत्तर मिळाले की, DMIT (Dermatoglyphics Multiple Intelligence Test) वापरण्यात येणार आहे. यामध्ये मुलाच्या बोटांचे
ठसे घेतले जातात आणि त्याआधारे अहवाल तयार केला जातो. पण Indian Psychiatric Society (IPS) ने आधीच DMIT ला अवैज्ञानिक घोषित केलेले आहे. यास मानसशास्त्रीय
किंवा वैज्ञानिक आधार नाही.
पालकांचा या उत्तरांवर विश्वास बसेना. त्यांनी
स्पष्ट विचारले की, आज मानसशास्त्राच्या क्षेत्रात अनेक
प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या उपलब्ध असताना, अशा
अवैज्ञानिक पद्धतींचा उपयोग का केला जातो? यावर
संस्थेने समाधानकारक उत्तर देण्याचे टाळले.
ही
घटना समाजातील दोन गंभीर समस्या उघड करते:
1. अवैज्ञानिक
चाचण्या आणि दिशाभूल करणारे अहवाल:
DMIT सारख्या चाचण्या बायोमेट्रिक डेटा आणि
बुद्धिमत्तेच्या परस्परसंबंधावर आधारित आहेत असे सांगितले जाते. परंतु यासाठी
कोणताही शास्त्रीय आधार नाही. तरीही, या
चाचण्यांच्या नावाखाली हजारो रुपये आकारले जातात. DMIT सारख्या चाचण्यांच्या नावाखाली बिजिनेस सुरु आहे, जो प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्व आशियात आधुलून येतो. जगाच्या इतर प्रांतात याचा ठावठिकाणा नाही.
2. लोकांची
जागरूकतेचा अभाव:
अलिकडे मानसशास्त्रीय चाचण्यांचे आणि
समुपदेशनाचे महत्त्व वाढले आहे. परंतु लोकांना प्रमाणित आणि अप्रमाणित
चाचण्यांमधील फरक समजत नाही. त्यामुळे ते सहज फसवले जात आहेत. कारण हे लोक बोलण्यात
पटाईत असतात आणि मार्केटिंग तंत्राचा आधार घेऊन शिक्षित लोकांनाही फसवत आहेत.
या
प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना:
1. कठोर
कायदेशीर नियम:
भारतात मानसिक आरोग्य सेवा देणाऱ्या प्रत्येक
संस्थेने Mental Healthcare act 2017 किंवा तत्सम संस्थेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
अवैज्ञानिक चाचण्या वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जावी. IPS आणि RCI सारख्या
संस्थांनी ज्या चाचण्या अवैज्ञानिक म्हणून घोषित केल्या आहेत, त्यांचा उपयोग पूर्णपणे थांबवावा. यासाठी कठोर
अंमलबजावणी यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे.
2. जनजागृती:
पालक आणि सामान्य लोकांमध्ये मानसिक आरोग्य सेवा आणि मानसशास्त्रीय
चाचण्यांविषयी योग्य माहिती पसरवणे गरजेचे आहे. अप्रमाणित चाचण्यांचे तोटे आणि
प्रमाणित चाचण्यांचे फायदे याची माहिती दिली पाहिजे.
माझ्याबाबतीत आणखीन एक घटना घडली होती, ती म्हणजे असे काही स्वंय घोषित शिक्षणतज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक यांनी विचारले होते की मानसशास्त्रीय तयार करण्याचे तंत्र सांगा म्हणजे आम्ही त्या तयार करून वापरायला सुरुवात करू. मला हे कळत नाही की अशा लोकांना सगळ्या गोष्टीत इतका रस का आहे? ठीक आहे उत्सुकता असणे स्वाभाविक आहे मात्र जो आपला प्रांत नाही त्यात अनावश्यक प्रवेश करून का बिघडवतात. एक प्रमाणित मानसशास्त्रीय चाचणी तयार करण्यासाठी अनेक Ph.D. चा अनुभव एकत्र करावा लागतो आणि त्या वापरण्यासाठी रीतसर मानसशास्त्राची पदवी असावी लागते.
मानसशास्त्रीय
परीक्षण म्हणजे काय?
मानसशास्त्रीय परीक्षण ही मानसशास्त्र अभ्यासातील महत्त्वपूर्ण प्रक्रिया
आहे. यामध्ये मानसिक, भावनिक, वर्तन आणि बोधनिक प्रक्रियांचे मापन केले जाते. याचा उपयोग केवळ
व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठीच नव्हे तर विविध शास्त्रीय, शैक्षणिक, व्यावसायिक
आणि न्यायवैद्यकीय क्षेत्रांमध्ये देखील होतो. ही प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतींचा
वापर करून तयार केलेल्या चाचण्यांवर आधारित असते. यात विशिष्ट उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी डेटा गोळा केला जातो आणि त्याचे विश्लेषण केले जाते.
मानसशास्त्रीय चाचण्या ह्या मानके (Norms), विश्वसनियतता (Reliability), यथार्थता (Validity), आणि संवेदनिक योग्यता (Sensitivity) या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर आधारित असतात.
आजच्या युगात, संगणक व कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग
करून चाचण्यांची अचूकता आणि कार्यक्षमता अधिक वाढवली गेलेली आहे. माहिती
तंत्रज्ञानाच्या पूर्वी दहा बारा वर्षे काम करून एखादी चाचणी तयार केली जात होती.
मानसशास्त्रीय
चाचण्यांचा इतिहास:
मानसशास्त्रीय चाचण्यांचा इतिहास प्राचीन
काळातील तत्त्वज्ञान आणि संशोधनावर आधारित आहे. परंतु, आधुनिक मानसशास्त्रीय चाचण्यांचा उगम 19 व्या शतकाच्या सुरुवातीला झाला आणि मानसशास्त्रीय
परीक्षण हे मानसशास्त्रीय वैज्ञानिक पद्धती म्हणून उदयास आले.
अल्फ्रेड बिने (Alfred Binet) आणि थियोडोर सायमन यांनी 1905
मध्ये पहिली औपचारिक बुद्धिमत्ता चाचणी (Binet-Simon Scale) तयार केली. फ्रान्सिस गॉल्टन यांनी (Francis Galton) मानसशास्त्रीय मापनाची तत्त्वे मांडली. हर्मन रोर्शा (Hermann Rorschach) यांनी 1921 मध्ये रोर्शाची शाईच्या डागाची चाचणी (Inkblot test) चाचणी विकसित केली. मानसशास्त्रीय चाचण्यांनी वैद्यकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत महत्त्वाची
भूमिका बजावत आहे.
मानसशास्त्रीय चाचण्यामध्ये काही वैयक्तिक
चाचण्या आहेत जिथे चाचणी सोडवून घेणाऱ्याचे प्रत्यक्ष नियंत्रण असते. तसेच काही
समूह चाचण्या असतात त्यांना प्रामुख्याने पेपर-पेन्सिल चाचण्या म्हणतात येथे कमी
नियंत्रण असते. या चाचण्यांचे गुणांकन शास्त्रीय पद्धतीने करण्याचे निर्देश
चाचणीच्या माहिती पुस्तिकेत दिलेले असते आणि चाचणी गुणाकांचे विश्लेषण देखील
दिलेले असते. प्रत्येक चाचणीचा एक विशिष्ट हेतू असतो आणि ते विशिष्ट गटासाठी तयार केलेले
असते. त्यामुळे कोणतीही चाचणी कोणासाठी आणि कोठेही वापरता येत नाही.
समारोप:
मानसशास्त्रीय चाचण्या वैयक्तिक समस्या आणि निदान
करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या अचूकतेमुळे वैयक्तिक व संस्थात्मक
विकासात मदत होते. मात्र,
चाचण्यांचा वापर नैतिकतेच्या चौकटीत
राहूनच केला पाहिजे. योग्य प्रक्रिया आणि सुस्पष्ट उद्दिष्टे यांच्या मदतीने
मानसशास्त्रीय चाचण्या अधिक प्रभावी ठरतात. संगणकीय चाचण्या आणि कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या प्रगतीमुळे या क्षेत्रात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे भविष्यातील संशोधनासाठी नवीन दारं
उघडली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions