दु:खाचे पाच
टप्पे: On Death and Dying
एलिझाबेथ कुबलर-रॉस या एक स्विस-अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ, ज्या निकटवर्ती यांचा मृत्यू या विषयातील अभ्यासाच्या अग्रणी आणि 1969
मध्ये प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ‘On Death and
Dying’ या पुस्तकाच्या लेखिका आहेत. या पुस्तकात त्यांनी प्रथम
दु:खाच्या पाच टप्प्यांचे, ज्याला "कुबलर-रॉस
मॉडेल" म्हणूनही ओळखले जाते, वर्णन केलेले आहे. कुबलर-रॉस
यांना 2007 मध्ये नॅशनल विमेन्स हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आणि टाइम
मासिकाने त्यांना 20 व्या शतकातील "100 सर्वात महत्त्वाचे विचारवंत"
म्हणून सन्मानित केलेले आहे. त्यांना वीस मानद पदव्या प्राप्त झालेल्या आहेत. जुलै
1982 पर्यंत, कुबलर-रॉस यांनी महाविद्यालये, धर्मशाळा, वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये, आणि सामाजिक कार्य संस्था यांमधील मृत्यू
आणि शोक या विषयावरील अभ्यासक्रमांतर्गत जवळपास 1.25 लाख विद्यार्थ्यांना शिकवलेले
आहे. 1970 मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात On Death and Dying या विषयावर इंगरसोल व्याख्यान दिले (इंगरसोल लेक्चर्स ही हार्वर्ड
विद्यापीठात अमरत्व या विषयावर दरवर्षी सादर होणाऱ्या व्याख्यानांची मालिका आहे). न्यू यॉर्क पब्लिक लायब्ररीने ‘On Death and
Dying’ या पुस्तकाला "शतकातील महत्त्वाची पुस्तके" यादीत
स्थान दिलेले आहे.
दु:ख आणि शोक ह्या माणसाच्या जीवनातील
अपरिहार्य अनुभूती आहेत. प्रत्येक व्यक्ती दु:खाचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारे घेतो.
1969 साली प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एलिझाबेथ कुबलर-रॉस यांनी "On
Death and Dying" या पुस्तकात दु:खाच्या पाच टप्प्यांची मांडणी केली आहे. हे टप्पे
दु:खाच्या प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात. एलिझाबेथ कुबलर-रॉस
आणि त्यांच्या कल्पना आता आघाताच्या (Trauma) भावनिक प्रतिक्रियेबाबत, तसेच दुःख
व्यवस्थापन आणि समुपदेशनाशी संबंधित झालेल्या आहेत, जशा कि मॅस्लो
प्रामुख्याने प्रेरणा सिद्धांताशी, कोल्ब अध्ययन
शैलींशी, आणि गार्डनर बहुविध बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. इतर अनेक उत्तम
पायोनियरिंग कार्यांसारखेच, कुबलर-रॉस मॉडेल (Grief Model- त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांनी मृत्यू हा शब्द टाळला आणि शोक
या शब्दावर जोर दिलेला आहे) उत्कृष्ट आहे. या मॉडेल मधील पाच टप्पे म्हणजे नकार, राग, सौदेबाजी, अवसाद, आणि स्वीकार.
या लेखात आपण या पाच टप्प्यांची सखोल चर्चा करणार आहोत.
नकार (Denial)
दु:खाच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा
म्हणजे नकार. या टप्प्यात व्यक्ती आपल्याला झालेल्या दु:खाची, गमावलेल्यांची
किंवा बदलाची वास्तविकता स्वीकारू शकत नाही. नकार हा मानसिक संरक्षण यंत्रणा
म्हणून काम करतो, ज्यामुळे व्यक्तीला परिस्थितीशी
तात्पुरती लढा देण्याची ताकद मिळते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती
एखाद्या जवळच्या माणसाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर ती गोष्ट खरी मानण्यास नकार
देते. हा टप्पा थोड्या काळासाठी असतो, परंतु त्यातून
पुढे जाणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्या व्यक्तीस अवास्तव प्रसंगांना सामोरे हवे
लागते. आपल्या प्रत्येकामध्ये कल्पनेपलीकडील चांगुलपणाची क्षमता आहे; अशा देणगीची ती
कोणतीही प्रतिफळ अपेक्षित करत नाही; कोणत्याही
निर्णयाशिवाय ऐकण्याची क्षमता; आणि निरपेक्ष प्रेम करण्याची क्षमता.
राग (Anger)
दु:खाच्या दुसऱ्या टप्प्यात व्यक्ती
राग व्यक्त करते. हा राग स्वतःवर, इतरांवर किंवा दैवावर असू शकतो.
"हे माझ्याबरोबरच का झाले?" असे विचार यावेळी मनात येतात. राग हा
भावनांच्या अभिव्यक्तीचा भाग आहे, जो व्यक्तीच्या दु:खाची तीव्रता
दाखवतो. या टप्प्यात व्यक्ती स्वतःला एकटे किंवा अस्तित्वहीन समजू लागते. राग हा दुःखाची
प्रक्रिया पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण तो
व्यक्तीला आपल्या भावनांची जाणीव करून देतो. स्वतःच्या आतल्या शांततेशी संपर्क
साधायला शिका आणि जाणून घ्या की या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश आहे.
सौदेबाजी (Bargaining)
सौदेबाजी हा टप्पा दु:खातून सुटका
मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आहे. या टप्प्यात व्यक्ती आपल्या परिस्थितीला
बदलण्यासाठी दैवाशी किंवा निसर्गाशी चर्चा करू शकते. "जर मी चांगली वागणूक
ठेवली, तर काय माझे दु:ख संपेल?" किंवा
"काही बदलले असते तर काय झाले असते?" असे विचार
यावेळी मनात येतात. सौदेबाजीच्या टप्प्यात व्यक्तीला आपला कमकुवतपणा आणि
परिस्थितीवरील नियंत्रण नसल्याची जाणीव होते. शांतता शोधण्यासाठी हिमालयात किंवा
कुठेही जायची गरज नाही. तुम्हाला ती खोल शांतता तुमच्या खोलीत, बागेत किंवा
अगदी तुमच्या बाथटबमध्येही सापडेल, शोध घेण गरजेच
आहे.
अवसाद (Depression)
दु:खाचा चौथा टप्पा अवसादाचा असतो.
या टप्प्यात व्यक्तीला दु:खाची जाणीव तीव्रतेने होते. हे दु:ख व्यक्तीला मानसिक
आणि शारीरिकदृष्ट्या थकवते. "माझे आयुष्य आता कसे असेल?"
किंवा “पुढे माझे कसे होईल” असे विचार सतत मनात येतात. या
टप्प्यात व्यक्ती स्वतःला एकटे वाटते आणि तिची जीवनाची उर्मी कमी होते. मात्र, हा टप्पा
प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण तो
व्यक्तीला स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहण्यास मदत करतो. कुठलीही चूक नाही, कुठलाही अपघात
नाही म्हणजे तुम्ही कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. आपल्याला शिकण्यासाठी दिलेली
प्रत्येक घटना ही एक आशीर्वाद आहे.
स्वीकार (Acceptance)
दु:खाचा अंतिम टप्पा म्हणजे स्वीकार.
या टप्प्यात व्यक्ती परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करते. दु:ख पूर्णपणे संपत
नाही, परंतु त्याच्याशी सामंजस्य साधण्याची प्रक्रिया सुरू होते. "हे
दु:ख माझ्या जीवनाचा एक भाग आहे, आणि मला त्याच्यासोबत पुढे जायचे
आहे" असा दृष्टिकोन या टप्प्यात विकसित होतो. स्वीकार हा टप्पा व्यक्तीला
नवीन जीवन सुरू करण्यास मदत करतो. आपल्याला पृथ्वीवर मर्यादित वेळ आहे आणि आपला
वेळ कधी संपेल हे आपल्याला माहीत नाही, हे जेव्हा
आपल्याला खऱ्या अर्थाने समजेल, तेव्हा आपल्या प्रत्येक दिवसाच्या जगण्यात जिवंतपणा असेल, जणू तोच
आपल्यासाठी शेवटचा दिवस आहे.
दु:खाच्या पाच टप्प्यांची महत्त्व
कुबलर-रॉस यांच्या पद्धतीने दु:खाचे
पाच टप्पे समजून घेणे हे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर महत्त्वाचे आहे. हे टप्पे
व्यक्तीला स्वतःच्या भावनांशी आणि इतरांच्या भावनांशी अधिक संवेदनशीलतेने वागण्यास
मदत करतात. या टप्प्यांच्या माध्यमातून दु:खाची प्रक्रिया एक नैसर्गिक प्रवास
म्हणून समजली जाऊ शकते. आपण कधी कधी विचार करतो की आपण चांगल्याकडे आकर्षित होतो, पण प्रत्यक्षात
आपण प्रामाणिकपणाकडे आकर्षित होतो. आपण खरे असलेल्या लोकांना अधिक आवडतो, जे त्यांच्या
कृत्रिम वैभवाखाली लपून बसत नाहीत.
समारोप
दु:खाच्या पाच टप्प्यांची मांडणी
केल्यामुळे एलिझाबेथ कुबलर-रॉस यांनी मानवाच्या भावनिक प्रवासाचा एक महत्वाचा पैलू
उलगडला आहे. हे टप्पे समजून घेणे म्हणजे दु:खाशी सामना करण्याची आणि त्यातून उभारी
घेण्याची एक प्रक्रिया आहे. व्यक्तीचे जीवन अधिक समृद्ध आणि संवेदनशील करण्यासाठी
हे टप्पे समजून घेणे आणि त्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे. एलिझाबेथ कुबलर-रॉस
म्हणतात की, फक्त दोनच भावना आहेत; प्रेम आणि
भीती. सर्व सकारात्मक भावना प्रेमातून येतात, सर्व नकारात्मक
भावना भीतीतून येतात. प्रेमातून आनंद, समाधान, शांतता, आणि उत्साह
प्रवाहित होतो, तर भीतीतून राग, द्वेष, चिंता आणि
अपराधीभाव निर्माण होतो. खरं तर, फक्त दोन मूलभूत भावना आहेत, प्रेम आणि
भीती. पण असं म्हणणं अधिक योग्य ठरेल की फक्त प्रेम किंवा भीती असते, कारण आपण या
दोन भावना एकाच वेळी अनुभवू शकत नाही. त्या एकमेकांच्या विरोधी आहेत. आपण भीतीत
असताना, आपण प्रेमाच्या स्थितीत नसतो. आणि जेव्हा आपण प्रेमाच्या स्थितीत असतो, तेव्हा आपण
भीतीच्या स्थितीत नसतो.
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions