शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

गर्दीतील मृत्यूचे पथक: अविवेकाकडे वाटचाल

गर्दीतील मृत्यूचे पथक: अविवेकाकडे वाटचाल

तिरुपती मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ 9 जानेवारी 2025 रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाल्यानं गर्दी व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शन यांनी (IJDRR) प्रकाशित केलेल्या 2013 च्या अभ्यासात असं दिसून आलं की, भारतातील 79 टक्के चेंगराचेंगरीचे ठिकाणे हे धार्मिक मेळावे आणि तीर्थयात्रेची ठिकाणे आहेत. तर विकसित देशांमध्ये बहुतेक चेंगराचेंगरी स्टेडियम, संगीत मैफिली आणि नाईट क्लबच्या ठिकाणी होतात. परंतु भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये गर्दीच्या आणि चेंगराचेंगरीच्या बहुतेक दुर्घटना धार्मिक स्थळांवर होतात. यासाठी महाराष्ट्रातील काही ठळक घटना पाहूया.

सन 2003 मध्ये नाशिक कुंभमेळ्यातील 27 ऑगस्टला झालेल्या चेंगराचेंगरीस कुणीही दोषी नाही असा रमणी आयोगाचा निष्कर्ष. या दुर्दैवी घटनेत 26 महिला आणि 3 पुरुष असे 29 भाविक ठार, तर 118 भाविक जखमी झाले होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने 24 ऑक्टोबर 2003 ला विशेष न्यायदंडाधिकारी म्हणून व्ही. रमणी यांची नियुक्ती केली होती.

मंगळवार, 25 जानेवारी 2005 रोजी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाईजवळील मांढरदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. जवळपास 3 लाख लोक उपस्थित होते मंदिराकडे जाणाऱ्या उंच आणि अरुंद टेकडी मार्गावर चिरडून मृत्यूमुखी पडले आणि इतर अनेक जण आजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याने जळून गेले. काही दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी अराजकता निर्माण केल्याचा आरोप होता, ज्याचा उल्लेख मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (निवृत्त) राजन कोचर यांनी त्यांच्या अहवालात केला आहे. चेंगराचेंगरीत 291 यात्रेकरूंचा मृत्यू झाला.

आषाढी एकादशीच्या दिवशी (2014) वारकरी जल्लोषामध्ये झेंडे फडकवत असताना झेंड्यामध्ये विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का शिरल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ उडाला. यात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविकाला जीव गमवावा लागला. यात 3 वारकरी गंभीर जखमी झाले आणि 12 वारकरी किरकोळ जखमी झाले होते.

तिरुपती आणि महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांवर झालेल्या या घटनांनी धार्मिक यात्रा आणि तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर विचार करण्याची गरज निर्माण केली आहे. अपघातांची प्रमुख कारणे म्हणजे नियोजनाचा अभाव, गर्दीचे योग्य व्यवस्थापन न होणे, आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अपयश. या घटनांमुळे प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था मजबूत केली असली तरी श्रद्धाळूंमध्ये सहभागी असलेले काही समाज कंटक आणि समाज विघातक वृत्तीच्या लोकांचाही विचार होणे गरजेचे आहे.

अलिकडे जत्रा, उरूस, आणि तीर्थक्षेत्रांमध्ये समाजविघातक प्रवृत्तीचे लोक जाणूनबुजून गर्दीचा फायदा घेतात आणि त्यांच्या कृत्यांमुळे परिस्थिती बिघडते. अशा लोकांची मानसिकता सहसा स्वार्थी, उद्दाम, किंवा हेतुपुरस्सर गोंधळ घालण्याची असते. चोरी, पाकिटमारी, आणि महिलांना त्रास देणे यांसारखे अनुचित प्रकार गर्दीच्या ठिकाणी सहज लपून राहतात, याचा गैरफायदा ते घेतात. काही जण धार्मिक किंवा सामाजिक वाद भडकवण्यासाठी मुद्दाम अफवा पसरवतात, ज्यामुळे चेंगराचेंगरी किंवा गोंधळ निर्माण होतो. या कारणांमुळे श्रद्धाळू लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो, आणि आयोजकांवर अनावश्यक ताण येतो. गर्दीचे व्यवस्थापन बिघडल्याने सगळ्या कार्यक्रमाचा गाभा प्रभावित होतो, आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते.

सांस्कृतिक, धार्मिक, आणि सामुदायिक एकात्मतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या जत्रा, उरूस, आणि तीर्थक्षेत्रांमध्ये अलिकडच्या काळात समाजविघातक प्रवृत्ती वाढताना दिसत आहेत. या व्यक्तींच्या मानसिकतेचे मूल्यमापन करताना त्यांच्या उद्दिष्टांमध्ये स्वार्थ, अराजकता, आणि विध्वंसक हेतू असल्याचे स्पष्ट होते. हे लोक आपल्या व्यक्तिगत किंवा गटांच्या फायद्यासाठी अशा शांततापूर्ण ठिकाणी सामाजिक अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करतात. याचा गर्दीवर, सुरक्षिततेवर, आणि संपूर्ण आयोजनावर मोठा नकारात्मक परिणाम होतो.

समाजविघातक लोकांची मानसिकता ही काही विशिष्ट वैशिष्ट्यांवर आधारित असते. स्वार्थी हेतूने प्रेरित, जसे की आर्थिक लाभ मिळवणे, राजकीय फायद्यासाठी गोंधळ उडवणे, किंवा धार्मिक ध्रुवीकरण साधणे. गर्दीचा फायदा घेत गोंधळ उडवणे, चोरी करणे, किंवा महिलांवर अत्याचार करणे यांसारख्या घडामोडी समाजविघातक प्रवृत्ती दर्शवतात. यामध्ये साहित्य, दागिने चोरणारे टोळके सक्रिय असतात. जत्रा आणि उरूस यांसारख्या शांततापूर्ण ठिकाणी धार्मिक भावना भडकवून अराजकता निर्माण करणे हा काही समाज कंटकांचा उद्देश असतो. उदा., काही ठिकाणी भव्य कार्यक्रमांच्या नावाखाली समाजामध्ये धार्मिक तेढ पसरवण्यासाठी भडक भाषण केले जाते.

अशा कृतीमुळे गर्दीवर वाईट परिणाम होतो, घाबराट आणि असुरक्षितता पसरते. समाजविघातक व्यक्तींच्या कारवायांमुळे गर्दीत गोंधळ उडतो, ज्यामुळे लोक भयभीत होतात. अशा परिस्थितीत चेंगराचेंगरी होऊन लोक जखमी होण्याच्या घटना घडतात. अशा घटनांमुळे जत्रा, उरूस यांचा मूळ उद्देश नष्ट होतो, आणि लोकांच्या मनात अशा ठिकाणांसाठी नकारात्मक भावना निर्माण होते. याचा सगळ्यात जास्त फटका लहान मुले आणि महिला बसतो. गर्दीत महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि मुलांचे अपहरण ही मोठी समस्या बनत आहे.

वरील सर्व विदारक चित्र पाहिल्यावर मन सुन्न होते आणि मनातून आपसूक खालील ओळी आर्त सद घालतात.

मरण जर ठरले, तर होवो देशासाठी,

तिरंग्याखाली झुकतील मस्तके यासाठी।

पण देवळाच्या रांगेत का चेंगरून मरावे,

जगण्याच्या हक्काला का असे हरवावे?

 

कधी मंदिर, कधी मशीद, कधी गर्दीचा मेळा,

चेंगराचेंगरीत जीव गमवतो, का नाही याला कळा?

गंगा घाटावर असे, यमुनाही साक्षी राहते,

माणसांचे मृत्युपत्र, देवळासमोरच लिहिले जाते।

 

पंढरपूरच्या वारीत चंद्रभागा दिसली रडताना,

साबरमतीच्या काठावर लोक मरणाला भिडताना।

तिरुपतीच्या गाभाऱ्यात कित्येक स्वप्ने हरवली,

कुंभमेळ्यात श्रद्धा देखील रक्तात न्हाली।

 

हे थांबले पाहिजे, हे बदलले पाहिजे,

जीवन समाजासाठी, देशासाठी दिले पाहिजे।

चेंगराचेंगरीत मरून कर्तव्याचे मूल्य हरते,

सार्थक जीवन तेच, जे स्वतःला झिजवत रहाते।

 

सांगा, कुठे हरवले आपले विवेकाचे ज्ञान?

चेंगराचेंगरीत झगडते का आपलीच मान?

देव तिथेच आहे, तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात,

शोधू नका त्याला, अविवेकाच्या अंधारात।

 

तर ठरवा आज, देऊ बलिदान देशासाठी,

गर्दीतील मृत्यू नको, समाजाच्या उन्नतीसाठी।

रचू नवी भारतभूमी, जिथे जीवाची किंमत असेल,

मरण इथे देवळासाठी नव्हे, तर देशासाठी असेल।

      शेवटी मला एव्हढेच म्हणायचे आहे की, अविवेकाची कास सोडून विवेकाचा ध्यास घेऊ या आणि समृद्ध नवी पिढी घडवू म्हणजे निरोगी समाज आणि बलशाली देश घडेल. 

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

वास्तव स्वीकारा आणि त्याचा सामना करा | Embrace Reality and Deal with It

  वास्तव स्वीकारा आणि त्याचा सामना करा दोन मित्र प्रवास करत होते. वाटेत काही कारणावरून त्यांचे भांडण झाले आणि एकाने दुसऱ्याच्या गालावर एक ...