स्टॉईसिझम:
जीवनाचे कठीण क्षण शांतपणे आणि विवेकबुद्धीने जिंकण्याचे तत्त्वज्ञान
जीवन जगणं सोपं
नसतं, ते सोपं करावं लागतं.
थोडं संयम
ठेवून,
थोडं सहन करून,
खूप काही
दुर्लक्ष करून,
बरचस कठोर
परिश्रम करून,
आणि योग्य वेळी
योग्य निर्णय घेऊन.
स्टॉईसिझम
ही एक प्राचीन ग्रीक-रोमन तत्त्वज्ञान प्रणाली आहे, जी मुख्यतः जीवनातील प्रतिकूल परिस्थितींचा सामना शांतपणे आणि
विवेकबुद्धीने करण्याचे महत्त्व शिकवते. या प्रणालीत अंतर्गत, एक व्यक्ती त्याच्या भावना आणि बाह्य परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्याऐवजी,
आपल्या अंतर्गत विचारांवर आणि क्रियांवर लक्ष केंद्रित करायला शिकविते.
स्टॉईस
तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट म्हणजे "यूडेमोनिया" (सुख आणि समाधान) मिळवणे
होय. हे व्यक्तीच्या आंतरिक सद्गुणांवर, नीतिमूल्यांवर आणि विवेकबुद्धीवर आधारित असते.
स्टॉईसिझमची उत्पत्ती
स्टॉईसिझम या तत्त्वज्ञानाची
उत्पत्ती इ.स.पू. 300 च्या सुमारास ग्रीस देशात झाली. या तत्त्वज्ञानाची सुरुवात
ग्रीक तत्त्वज्ञ झेनो ऑफ सिटीअम (Zeno of Citium)
यांनी केली. ते
आपले जहाज बुडाल्याने सर्वस्व गमावून अथेन्समध्ये पोहोचले होते. तेथे त्यांनी
सॉक्रेटिस, प्लेटो, आणि डिओजिनीस
या महान तत्त्वज्ञांचे विचार अभ्यासले. अथेन्समधील स्टोआ पोइकीले (Stoa
Poikile), म्हणजेच रंगीत स्तंभांच्या गॅलरीत, त्यांनी आपल्या
विचारांची शिकवण दिली. त्यामुळे या तत्त्वज्ञानाला "स्टॉईसिझम" असे नाव
प्राप्त झाले (स्टोआ म्हणजे स्तंभ).
स्टॉईसिझमला तत्कालीन ग्रीक आणि नंतर
रोमन समाजात विशेष लोकप्रियता मिळाली. जीवनाच्या नैतिक, मानसिक, आणि भावनिक
पैलूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या तत्त्वज्ञानाने अनेक लोकांना त्यांचे जीवन शांत, धैर्यशील, आणि विवेकपूर्ण
करण्यासाठी प्रेरित केले.
स्टॉईसिझमचे मुख्य प्रवर्तक
स्टॉईस तत्त्वज्ञानाच्या विकासात
अनेक तत्त्वज्ञांचे योगदान आहे, त्यापैकी मुख्य प्रवर्तक
पुढीलप्रमाणे आहेत:
- झेनो ऑफ सिटीअम (Zeno of Citium) : स्टॉईसिझमचे संस्थापक झेनो यांनी बाह्य परिस्थितींवर नियंत्रण नसल्यामुळे आपल्या अंतर्गत विचारांवर लक्ष केंद्रित करणे हे मुख्य ध्येय सांगितले. त्यांनी तर्क, नीतिमूल्ये, आणि सद्गुण यांना प्राधान्य दिले.
- क्लीनथिस (Cleanthes): झेनो यांचे शिष्य क्लीनथिस यांनी स्टॉईस विचारांचे संकलन केले आणि त्यात अधिक सुसंगती आणली. त्यांच्या लेखनातून त्यांनी नैतिकता आणि निसर्गाशी सुसंगत जीवनाचे तत्त्व समजावून सांगितले.
- क्रिसीपस (Chrysippus): स्टॉईसिझमचा खरा बळकट पाया घालणारे क्रिसीपस हे आहेत. त्यांनी या तत्त्वज्ञानाला एक सुसंस्कृत तात्त्विक रचना दिली. त्यांच्या योगदानामुळे स्टॉईसिझम एक मजबूत बौद्धिक परंपरा बनली.
- सेनेका (Seneca): रोमन काळातील प्रमुख तत्त्वज्ञ, सेनेका, हे स्टॉईस विचारांचे उत्तम व्यावहारिक उदाहरण आहेत. त्यांनी "On the Shortness of Life" आणि "Letters to Lucilius" यांसारखी प्रसिद्ध पुस्तके लिहिली, ज्यांतून तत्त्वज्ञानाचा व्यवहारातील उपयोग कसा करावा हे स्पष्ट केले.
- एपिक्टेटस (Epictetus): पूर्वी गुलाम असलेले एपिक्टेटस यांनी स्वातंत्र्याचे खरे महत्त्व शिकवले आणि आपली विचारसरणी "Enchiridion" या पुस्तकाद्वारे मांडली. त्यांच्या शिकवणीने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
- मार्कस ऑरेलियस (Marcus Aurelius): रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी स्टॉईस विचारांचे अनुसरण करून "Meditations" हे पुस्तक लिहिले. हे तत्त्वज्ञानावर आधारित स्व-मूल्यांकनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी नेतृत्व करताना शांतपणे आणि संयमाने कसे वागावे हे दाखवून दिले.
थोडक्यात स्टॉईसिझमच्या प्रवर्तकांनी
जीवनातील कठीण परिस्थितीत स्थैर्य, तर्क, आणि
नैतिकतेच्या सहाय्याने कसे जगायचे, हे शिकवले.
झेनोपासून मार्कस ऑरेलियसपर्यंत, या तत्त्वज्ञानाने व्यक्तीला
आत्म-शांती, आत्मनियंत्रण, आणि निसर्गाशी
सुसंगत जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. या परंपरेतील विचारवंतांचा विचार केल्यास
राजापासून रंकापर्यंत सर्वांचा समावेश आढळून येतो.
स्टॉईसिझमची मूलतत्त्वे
1. नियंत्रण व अस्थिरता (Control
and Acceptance)
स्टॉईसिझममध्ये जीवनातील घटना दोन प्रकारात विभागल्या आहेत:
आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी: आपले विचार, भावना, कृती, आणि निवडी.
आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी: इतर लोकांची मते, घटनांची परिणती, आणि निसर्गातील
बदल.
स्टॉईस तत्त्वज्ञानानुसार, आपल्याला केवळ
आपल्या नियंत्रणातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे आणि बाकी गोष्टी स्वाभाविकपणे
स्वीकाराव्या. असे केल्याने मन:शांती टिकते. उदाहरण: जर
एखादी योजना अयशस्वी झाली, तर त्याबद्दल हळहळ न करता, आपण त्यात काय
चांगले करू शकलो, यावर विचार करावा.
2. सद्गुणांचा अभ्यास (Virtue
as the Highest Good)
स्टॉईस तत्त्वज्ञानाने सद्गुणाला सर्वोच्च
महत्त्व दिले आहे. सद्गुण म्हणजे योग्य वर्तन, प्रामाणिकपणा, न्याय, विवेकबुद्धी, धैर्य आणि
नम्रता. बाह्य संपत्ती, प्रसिद्धी, किंवा आनंद
यापेक्षा सद्गुणांचे पालन अधिक महत्त्वाचे मानले जाते.
स्टॉईस तत्त्वज्ञ असे सांगतात की
जीवनातील प्रत्येक कृती नैतिक मूल्यांच्या आधारे व्हायला हवी. जर व्यक्तीने योग्य
निर्णय घेतला असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरीही
ती सुखी होऊ शकते. उदाहरण: एखाद्या कठीण प्रसंगी प्रामाणिक राहणे म्हणजे
सद्गुणांचा आदर करणे.
3. भावनांवर ताबा (Mastery Over
Emotions)
स्टॉईस तत्त्वज्ञान शिकवते की भावना
आपल्या विचारांवर अवलंबून असतात. जर आपल्याला एखादी गोष्ट त्रासदायक वाटत असेल, तर समस्या त्या
गोष्टीत नसून आपण तिच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असते. यामुळे स्टॉईस
तत्त्वज्ञांनी भावनांवर ताबा ठेवण्यावर भर दिला आहे. त्यांनी भावना दोन गटांमध्ये
विभागल्या:
युक्रोपॅथिया (Positive Emotions): आनंद, शांती, आणि समाधान.
पॅथोस (Negative Emotions): राग, चिंता, दुःख, आणि ईर्षा.
जर एखादी नकारात्मक भावना येत असेल, तर त्याचे मूळ
कारण शोधावे आणि त्यावर विवेकाने उपाय शोधावा.
4. निसर्गाशी सुसंगत जीवन (Living
According to Nature)
स्टॉईस तत्त्वज्ञांचा विश्वास आहे की
माणूस निसर्गाचा भाग आहे आणि त्याने निसर्गाच्या नियमांशी सुसंगत जीवन जगावे. याचा
अर्थ असा आहे की आपण आपल्या नैसर्गिक जबाबदाऱ्या ओळखून, त्यानुसार कृती
करायला हवी.
निसर्गाने प्रत्येकाला बुद्धी दिली
आहे; म्हणूनच जीवनातील निर्णय तर्कसंगत आणि नैतिक मूल्यांवर आधारित असावेत.
उदाहरण: निसर्गाच्या नियमांप्रमाणे मरण अटळ आहे. त्यामुळे मृत्यूची भीती
बाळगण्याऐवजी तो स्वीकारण्याची तयारी करावी.
5. मृत्यूचे ध्यान (Memento Mori)
स्टॉईस तत्त्वज्ञानात मृत्यू हा
महत्त्वाचा घटक आहे. "मृत्यू लक्षात ठेवा" म्हणजेच Memento
Mori. हे
तत्त्व आपल्याला आठवण करून देते की जीवन क्षणभंगुर आहे. त्यामुळे आपले प्रत्येक
क्षण महत्त्वाचा आहे.
मृत्यूच्या आठवणीने व्यक्तीला आपले
निर्णय चांगले घेता येतात, कारण यामुळे ती व्यक्ती तात्कालिक
भावनांच्या आहारी न जाता, दीर्घकालीन विचार करते. उदाहरण:
दिवसाची सुरुवात करताना स्वतःला आठवण करून द्यावी की हा आपला शेवटचा दिवस असू शकतो, आणि त्या
दृष्टिकोनातून जीवन जगावे.
6. स्वत:च्या विचारांवर लक्ष (Focus
on Internal Reality)
बाह्य जगातील घटना आपल्या आयुष्याचे
स्वरूप ठरवत नाहीत; आपल्या विचारांमुळेच आपण त्या
घटनांना महत्त्व देतो. त्यामुळे आपल्या विचारांवर काम करणे अत्यावश्यक आहे. उदाहरण:
एखाद्या व्यक्तीने आपल्यावर टीका केली, तर ती टीका खरी
आहे की नाही, हे ठरवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
स्टॉईसिझमची मूलतत्त्वे आजच्या
आधुनिक जीवनासाठीही तितकीच उपयुक्त आहेत. आपल्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींवर
वेळ न घालवता, आपल्या सद्गुणांवर आणि विवेकबुद्धीवर लक्ष
केंद्रित केल्यास अधिक शांततामय आणि समाधानकारक जीवन जगता येते.
आजच्या जीवनात स्टॉईसिझमचे उपयोजन
- स्टॉईस तत्त्वज्ञान आपल्याला नकारात्मक भावनांवर विजय मिळवण्यास मदत करते. हे लोकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्यांना शांतपणे सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करते.
- मार्कस ऑरेलियस
यांचे Meditations हे पुस्तक आपल्यासाठी प्रेरणादायक आहे.
त्यांनी शांतपणे कठीण परिस्थिती हाताळण्याचे धडे मिळतात.
- स्टॉईसिझम आत्मसंयम आणि आत्मनिरीक्षण
यावर भर देते, ज्यामुळे व्यक्तीचे आत्मविश्वास
वाढते.
- आजच्या वेगवान जीवनशैलीत स्टॉईस तत्त्वज्ञानाने मानसिक स्वास्थ्य राखणे सोपे होते.
- स्टॉईस विचारांनी व्यक्तीला इतरांशी सहानुभूतीने वागण्याचे आणि चांगले संबंध राखण्याचे शिक्षण मिळते.
- स्टॉईस विचारधारा संपत्तीवर अवलंबून न
राहता, जीवनाचे खरे सुख सद्गुणांमध्ये शोधते.
- प्रत्येक व्यक्तीला जीवनातील प्रतिकूलतेचा सामना करून एक तत्त्वज्ञ बनण्याचा सल्ला देते.
समारोप:
स्टॉईसिझम
ही केवळ तत्त्वज्ञान प्रणाली नसून एक जीवनशैली आहे. हे तत्त्वज्ञान आपल्याला बाह्य
परिस्थितींना शांतपणे सामोरे जाण्यास शिकवते. आजच्या ताणतणावपूर्ण जीवनात, स्टॉईसिझमचे तत्त्वज्ञान खूप उपयुक्त ठरते. "आपण काय नियंत्रित करू
शकतो" यावर लक्ष केंद्रित केल्याने अधिक आनंदी, स्वस्थ,
आणि संतुलित जीवन शक्य होते.
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
संदर्भ:
Aurelius,
M., Seneca, & Epictetus. (2023). Stoic Foundations:
The Cornerstone Works of Stoicism. Hachette GO.
Epictetus.
(2015). The Enchiridion. Dover Publications.
Irvine,
W. B. (2009). A guide to the good life: The ancient art of
Stoic joy. Oxford University Press.
Marcus
Aurelius. (2006). Meditations (M. Hays, Trans.). Modern
Library.
Ryan,
J. (2023, June 15). The relevance of
Stoicism in modern life. Philosophy Today.
Seneca,
L. A. (2004). Letters from a Stoic (R. Campbell, Trans.).
Penguin Classics.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions