गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

लुसिफर इफेक्ट: चांगले लोक वाईट कृत्ये का करतात

 

लुसिफर इफेक्ट: चांगले लोक वाईट कृत्ये का करतात

अलीकडच्या काळात भारतात सोशल मीडियावर अफवा पसरवल्यामुळे अनेक ठिकाणी निर्दोष लोकांना जमावाने ठार मारले आहे. यामध्ये प्रमुख भूमिका WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची राहिली आहे. या घटनांमध्ये भीती, असुरक्षितता, जातीय आणि धार्मिक मतभेद तसेच कायद्यावरील अविश्वास यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

झारखंड मॉब लिंचिंग (2018) – बालचोरीच्या अफवांमुळे निर्दोषांची हत्या

मे 2018 मध्ये झारखंडच्या ग्रामीण भागात WhatsApp वर एक अफवा मोठ्या प्रमाणावर पसरली. या अफवेनुसार, काही लोक गावातील लहान मुलांचे अपहरण करून त्यांची तस्करी करत होते. अनेक गावांमध्ये ही अफवा पसरत असताना लोकांमध्ये भीती निर्माण झाली. 17 मे 2018 रोजी, झारखंडच्या खरसावन आणि सरायकेला जिल्ह्यात, चार स्थानिक युवक एका गाडीने प्रवास करत होते. गावकऱ्यांनी त्यांना बालचोरी करणारे समजून थांबवले आणि त्यांना मारहाण सुरू केली. कोणताही पुरावा नसताना, अफवेच्या आधारावर हजारोंच्या जमावाने त्यांना बेदम मारहाण केली आणि जागीच ठार मारले.

धुळे, महाराष्ट्र मॉब लिंचिंग (2018) – संशयित साधूंना ठार मारले

1 जुलै 2018 रोजी, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात पाच साधू भिक्षा मागण्यासाठी आले होते. त्यांनी एका मुलाला काहीतरी विचारले, आणि गावकऱ्यांनी त्यांना बालचोर समजले. या साधूंच्या संशयास्पद हालचालींबाबत (जे प्रत्यक्षात संशयास्पद नव्हते) एका व्यक्तीने WhatsApp ग्रुपमध्ये मेसेज टाकला. काही मिनिटांतच गावकऱ्यांचा जमाव तयार झाला आणि कोणतीही चौकशी न करता त्यांनी त्या पाचही साधूंना बेदम मारहाण केली. पोलिस आले तेव्हा खूप उशीर झाला होता, आणि जमावाने त्यांना ठार मारले होते.

लुसिफर इफेक्ट:

चांगले लोक वाईट कृत्ये का करतात हा प्रश्न शतकानुशतके मानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि गुन्हेगार शास्त्रज्ञांसाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. फिलीप झिंबार्डो यांच्या द लुसिफर इफेक्ट: अंडरस्टँडिंग हाऊ गुड पीपल टर्न इव्हिल या पुस्तकात याच विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी प्रसिद्ध स्टॅनफोर्ड तुरुंग प्रयोग आणि अन्य मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारे हे विश्लेषण केले आहे. हे पुस्तक परिस्थितीजन्य शक्ती मानवी वर्तनावर कसा प्रभाव टाकतात याचे भक्कम पुरावा आणि स्पष्टीकरण देते आणि फक्त 'वाईट' लोकच अत्याचार करतात या संकल्पनेला आव्हान देते.

मानवी स्वभाव आणि नैतिकतेचे आकलन

मानव नैसर्गिकरित्या चांगला आहे की वाईट, यावरून ऐतिहासिकदृष्ट्या वाद सुरू आहेत. जो-जॅक रूसो यांनी लोक नैसर्गिकरित्या निष्पाप असतात आणि समाजाने त्यांना भ्रष्ट केले, असे मत मांडले. तर थॉमस हॉब्स यांचा विश्वास होता की मानवी स्वभाव हा मूलत: स्वार्थी असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन आवश्यक आहे. आधुनिक मानसशास्त्र या संकल्पनेला अधिक सखोलतेने पाहते आणि पर्यावरण, सामाजिक आणि बोधनिक घटक मानवी वर्तनावर कसा प्रभाव टाकतात याचा अभ्यास करते.

मानसशास्त्रज्ञांनी नैतिकतेचा अभ्यास करून नैतिक विकास (कोलबर्गच्या नैतिक विवेकाच्या टप्प्यांद्वारे), सामाजिक प्रभाव आणि निर्णय घेण्यावर परिणाम करणारे बोधनिक पूर्वग्रह यांसारख्या घटकांवर भर दिला आहे. संशोधन असे दर्शवते की विशिष्ट परिस्थितींमध्ये, सद्भाव असणारी व्यक्तीही त्यांच्या नैतिक मूल्यांच्या विरुद्ध वागू शकतात.

स्टॅनफोर्ड तुरुंग प्रयोग: एक केस स्टडी

सामाजिक मानसशास्त्रातील सर्वात प्रभावी प्रयोगांपैकी एक म्हणजे स्टॅनफोर्ड तुरुंग प्रयोग, जो 1971 मध्ये फिलीप झिंबार्डो यांनी केला होता. या प्रयोगाने परिस्थितीजन्य शक्ती मानवी वर्तनावर कसा परिणाम करू शकतात हे स्पष्ट केले. या प्रयोगात 24 मानसिकदृष्ट्या स्थिर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यादृच्छिकपणे गार्ड आणि कैदी या भूमिकांमध्ये ठेवण्यात आले. काही दिवसांतच, ‘गार्ड’ अत्याचारी बनले आणि ‘कैदी’ अधीन झाले व मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले. वाढत्या हिंसाचारामुळे हा प्रयोग निश्चित वेळेपूर्वीच थांबवावा लागला. या प्रयोगाची निष्पत्ति खालीलप्रमाणे:

 1. विभक्तिकरण (Deindividuation):

विभक्तिकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक ओळखीचा लोप होणे, त्यामुळे त्याच्या वर्तनावर सामाजिक बंधने शिथिल होतात. स्टॅनफोर्ड तुरुंग प्रयोगात, गार्ड्सना समान गणवेश (खाकी पोशाख), गडद गॉगल्स घालण्यास सांगितले गेले, ज्यामुळे त्यांची व्यक्तीगत ओळख नष्ट झाली. व्यक्ती जेव्हा समूहाचा भाग बनते, तेव्हा वैयक्तिक जबाबदारी कमी वाटते, आणि ते अधिक आक्रमक किंवा अनैतिक वर्तन सहज स्वीकारतात. परिणामतः, गार्ड्स अधिक क्रूर झाले आणि त्यांनी बंदींना अमानवीय पद्धतीने वागवायला सुरुवात केली.

2. अधिकार्‍यांचे आज्ञापालन (Obedience to Authority):

प्रयोगाचे संचालक फिलिप झिम्बार्डो स्वतः 'तुरुंग अधीक्षक' बनले आणि गार्ड्सना अधिक कडक भूमिका निभावण्यास सूचित केले. गार्ड्सनीही आदेशांचे पालन करत बंदींवर मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. हा प्रयोग दर्शवितो की जेव्हा एखाद्याला अधिकार दिला जातो आणि त्याला आज्ञापालनाची अपेक्षा असते, तेव्हा तो किती लवकर अनैतिक वर्तन स्वीकारतो. हीच गोष्ट नाझी सैनिकांवर झालेल्या प्रयोगांमध्येही दिसून आली होती, जिथे त्यांनी 'मी फक्त आदेशांचे पालन करत होतो' अशी भूमिका घेतली होती.

3. भूमिकांमध्ये समरसता (Role Assimilation):

या प्रयोगातील सहभागी हे सर्वसामान्य महाविद्यालयीन विद्यार्थी होते, पण त्यांनी त्यांना दिलेल्या गार्ड आणि कैदी या भूमिका अपेक्षेपेक्षा जास्त तीव्रतेने आत्मसात केल्या. काही दिवसांतच गार्ड्स निर्दय बनले, आणि बंदी अत्यंत दुबळे व असहाय्य वाटू लागले. परिस्थितीजन्य ओळख (Situational Identity) किती प्रभावी असते, हे यातून स्पष्ट होते—व्यक्तीची मूलभूत नैतिकता किंवा वैयक्तिक मूल्ये कधी कधी परिस्थितीच्या प्रभावाखाली बदलू शकतात. यथे भूमिकांमध्ये अति-समरस झाल्यामुळे, हा प्रयोग नियोजित दोन आठवड्यांपूर्वीच सहा दिवसांत थांबवावा लागला.

हा प्रयोग सामाजिक प्रभाव, अधिकार, समूह मानसशास्त्र आणि नैतिकता यांसारख्या संकल्पनांवर मोठा प्रभाव टाकणारा ठरला. तो आजही मानसशास्त्रात एक महत्त्वाचा संदर्भ मानला जातो, विशेषतः विभक्तिकरण, आज्ञापालन आणि भूमिका समरसता याबाबत.

वाईट वर्तनाचा मानसशास्त्रीय पाया

1. सामाजिक अध्ययन सिद्धांत (Bandura, 1961) अल्बर्ट बंडुराच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार, लोक निरीक्षण आणि अनुकरणाद्वारे वर्तन शिकतात. जर मुलांनी किंवा मोठ्यांनी हिंसक किंवा अनैतिक वर्तन पाहिले, विशेषतः प्रभावशाली किंवा अधिकार असलेल्या व्यक्तीकडून, तर ते वर्तन आत्मसात करू शकतात. Bobo Doll Experiment या प्रयोगात बंडुराने दाखवले की मुलांनी प्रौढांकडून शिकलेल्या आक्रमक वर्तनाची पुनरावृत्ती केली.

2. बोधनिक विसंगती सिद्धांत (Festinger, 1957) लिओन फेस्टिंजरच्या या सिद्धांतानुसार, लोक त्यांच्या स्वतःच्या नैतिक प्रतिमेशी विसंगत असलेल्या वर्तनाचे समर्थन करतात किंवा स्वतःच्या वर्तनाला न्याय्य ठरवण्यासाठी त्यांच्या समजूती बदलतात. उदाहरणार्थ, एक व्यक्ती भ्रष्टाचारात सहभागी असेल, तर ती स्वतःला समजावते की "हे सर्वच करतात," किंवा "माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता," यामुळे नैतिकतेशी विसंगती राहात नाही.

3. अमानवीकरण (Dehumanization) अमानवीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला पूर्णपणे माणुसकीपासून वंचित समजणे. हे वाईट वर्तन करण्यास लोकांना प्रवृत्त करू शकते. इतिहासात अनेक हत्याकांड आणि नरसंहार (Holocaust, Rwandan Genocide) हे अमानवीकरणामुळेच घडले. जेव्हा एक गट दुसऱ्या गटाला कमी मूल्यवान किंवा अनावश्यक समजतो, तेव्हा त्यांच्या विरुद्ध हिंसा करणे त्यांना सहज वाटते.

परिस्थितीजन्य शक्तींची भूमिका

मानवी वर्तन हे केवळ जन्मजात व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांवर अवलंबून नसते, तर मोठ्या प्रमाणावर बाह्य परिस्थितींनी प्रभावित होते. काही प्रसंगी, अगदी सामान्य व्यक्तीदेखील विशिष्ट परिस्थितींमध्ये नैतिकतेविरोधी किंवा अनपेक्षित कृती करू शकतात. इतिहास आणि मानसशास्त्रीय प्रयोग यातून हे सिद्ध झाले आहे.

1. अज्ञातता (Anonymity) आणि नैतिकता:

जेव्हा एखादी व्यक्ती अनामिक (गुप्त) राहते, तेव्हा तिच्या नैतिक जबाबदारीची जाणीव कमी होऊ शकते. या संकल्पनेचे उत्तम उदाहरण म्हणजे "डिह्युमनायझेशन" (Dehumanization) - जिथे विरोधकाला "अमानवी" समजले जाते. यामुळे व्यक्ती क्रूर वर्तन करायला प्रवृत्त होऊ शकते. उदाहरणार्थ, इंटरनेटवरील ट्रोलिंगमध्येही अनामिकता मोठी भूमिका बजावते. लोक ओळख गुप्त ठेवल्यामुळे दुसऱ्यांना दुखवणाऱ्या किंवा अयोग्य टिप्पणी देण्याची शक्यता वाढते.

2. समूह विचारसरणी (Groupthink):

समूह विचारसरणी म्हणजे जेव्हा लोक समूहाच्या विचारांशी जुळवून घेतात, जरी ते त्यांच्या वैयक्तिक नैतिकतेशी किंवा विवेकबुद्धीशी विसंगत असले तरी. यामध्ये विशिष्ट घटक समाविष्ट असतात, जसे सहकारी दबाव, गटातील एकसंधता, विरोधी दृष्टिकोन नाकारला जाणे. उदाहरणार्थ, अनेकदा मोठ्या कंपन्यांमध्ये समूह विचारसरणीमुळे गैरव्यवहार होतात. कर्मचारी चुकीच्या गोष्टींना आव्हान देण्याऐवजी गटाच्या विचारधारेप्रमाणे चालतात.

3. अधिकार व्यक्ती (Authority) आणि आज्ञाधारकता (Obedience):

जेव्हा व्यक्तीला एखाद्या अधिकारप्राप्त व्यक्तीकडून आदेश दिले जातात, तेव्हा त्या व्यक्तीच्या नैतिकतेपेक्षा आज्ञाधारकता प्रबळ ठरते. मिल्ग्रामचा आज्ञाधारकतेचा प्रयोग (1961) यामध्ये सहभागींना असे सांगण्यात आले की ते दुसऱ्या व्यक्तीला (वास्तविक व्यक्ती नसून, प्रयोगाचा भाग असलेल्या अभिनेत्याला) विजेचे धक्के देत आहेत. अधिकार असलेल्या व्यक्तीने (शास्त्रज्ञाने) धक्के वाढवण्याचा आदेश दिला, आणि ६५% सहभागींनी अंतिम, धोकादायक पातळीपर्यंत धक्के दिले, जरी दुसऱ्या व्यक्तीच्या वेदना जाणवत नव्हत्या. यातून सिद्ध होते की अनेक लोक अंध आज्ञाधारकता बाळगतात आणि नैतिक विचार बाजूला ठेवतात.

4. दर्शक परिणाम आणि जबाबदारीचे विभाजन:

दर्शक प्रभाव म्हणजे जेव्हा एखाद्या संकटात लोक मदत करण्याऐवजी समजतात की कोणी तरी दुसरा पुढे येईल. किट्टी जेनोव्हिसच्या प्रकरणाने हे स्पष्ट केले आहे. मानसशास्त्रीय संशोधनाने हे सुचवले आहे की वैयक्तिक जबाबदारीची जाणीव वाढवल्यास निष्क्रियता टाळता येऊ शकते.

5. संपूर्ण प्रणालीच वाईट: संस्था जेव्हा अत्याचारांना प्रोत्साहन देतात

वाईट फक्त व्यक्तींपुरते मर्यादित नसून, संपूर्ण व्यवस्था देखील समाविष्ट असते. भ्रष्ट सरकारे, अनैतिक कंपन्या आणि दडपशाही करणाऱ्या व्यवस्था या क्रूरता सामान्य मानतात. जसे अबू घ्रैब तुरुंग कांड, यामध्ये अमेरिकन सैनिकांनी संस्थात्मक प्रभावाखाली अत्याचार केले. वर पाहिलेले हॉलोकॉस्ट म्हणजे नाझी नेत्यांनी प्रचार आणि अमानवीकरणाच्या साहाय्याने नरसंहार घडवला.

लुसिफर इफेक्ट आणि उपाय:

फिलीप झिंबार्डो यांच्या लुसिफर इफेक्ट या संकल्पनेनुसार, चांगले लोकदेखील विशिष्ट परिस्थितींमध्ये वाईट कृत्ये करू शकतात. भारतातील मॉब लिंचिंगच्या घटनांमध्येही हेच दिसून येते. सोशल मीडियावर अफवा पसरल्यामुळे सामान्य लोकही भावनिक होऊन हिंसक कृती करतात. परिस्थितीजन्य शक्ती, समूह मानसशास्त्र, आज्ञाधारकता आणि नैतिक जबाबदारीतील गोंधळ यामुळे हा हिंसाचार घडतो. यावर प्रभावी उपाय काय असू शकतात?

1. परिस्थितीजन्य शक्तींवर नियंत्रण

  • सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांनी अफवांवर त्वरित कारवाई करण्यासाठी फॅक्ट-चेकिंग यंत्रणा बळकट करावी.
  • WhatsApp, Facebook यांसारख्या प्लॅटफॉर्मवर फॉरवर्ड मेसेज लिमिट आणि अलर्ट सिस्टीम अलिकडे आलेली आहे.
  • शिक्षण व्यवस्थेत डिजिटल साक्षरता आणि क्रिटिकल थिंकिंग शिकवले पाहिजे, जेणेकरून लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत.
  • मोठ्या संकटांच्या वेळी प्रसारमाध्यमांनी उत्तरदायित्वाने बातम्या द्याव्यात आणि समाजात तणाव वाढेल अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये.
  • धार्मिक व जातीय विद्वेष वाढेल असे वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी (राजकारणी ?).

2. विभक्तिकरण आणि समूह मानसिकता टाळणे

  • "माझ्या गावात मी जबाबदार" अशी मोहीम राबवून लोकांना समूहाच्या आंधळ्या आज्ञाधारकतेपासून दूर ठेवता येईल.
  • प्रत्येक गावात आणि शहरात ग्रामसंवाद किंवा सोशल अँबेसडर नेटवर्क असावे, जे अफवा आणि हिंसाचार रोखण्यासाठी काम करतील.
  • संशयास्पद व्यक्तींना अमानवीय ठरवण्याऐवजी कायदेशीर प्रक्रियेद्वारे योग्य तपास केला जाईल, याची खात्री सरकार आणि पोलीस यंत्रणांनी द्यावी.
  • मुलांना आणि तरुणांना विविध समाजगटांबद्दल सहिष्णुता आणि आदर शिकवण्यासाठी आंतर-समूह संवाद आणि सांस्कृतिक एक्स्चेंज प्रोग्रॅम राबवले जावेत.

3. आज्ञाधारकतेच्या वाईट परिणामांवर उपाय

  • प्रत्येक गावात मॉब लिंचिंगसाठी हॉटलाइन क्रमांक सुरू करून नागरिकांना तत्काळ मदत मिळेल अशी व्यवस्था करावी.
  • मॉब लिंचिंगमध्ये सामील झालेल्या लोकांना कठोर शिक्षेचा बडगा दाखवून हे गुन्हे रोखता येतील.
  • प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व अंगीकारले पाहिजे—"माझ्या कृतींची जबाबदारी माझी" ही भावना निर्माण करणे आवश्यक आहे.

4. संस्थात्मक पातळीवर सुधारणा

  • राजकीय नेते, समाजसेवी संस्था आणि धार्मिक नेत्यांनी सहिष्णुतेचा प्रचार करावा आणि द्वेष पसरवणाऱ्यांवर बंदी घालावी.
  • शिक्षणव्यवस्थेत नैतिकता आणि समुपदेशनाचा अंतर्भाव करून लहान वयापासूनच मूल्यशिक्षण दिले पाहिजे.
  • पोलिस आणि न्यायसंस्थेने जलद गतीने दोषींवर कारवाई करावी, जेणेकरून लोक कायद्यावर विश्वास ठेवतील आणि जमाव न्याय घेण्याचा प्रयत्न करणार नाही.

समारोप:

वाईट कसे कार्य करते हे समजून घेतल्याने नैतिक भ्रष्टता टाळता येते. द लुसिफर इफेक्ट सावधान राहण्याचा इशारा देतो आणि परिस्थितीजन्य शक्तींना सामोरे जाण्याच्या महत्त्वावर भर देतो. नैतिक जागरूकता, वैयक्तिक जबाबदारी आणि प्रणालीगत उत्तरदायित्व जोपासल्यास समाज नैतिकतेकडे वाटचाल करू शकतो. डिजिटल साक्षरता, सामाजिक सहिष्णुता, कठोर कायदे, जलद न्याय, आणि जबाबदारीची भावना या पाच गोष्टींवर भर दिल्यास अशा घटनांना आळा घालता येईल.


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Simply Psychology. (n.d.). Stanford Prison Experiment: Zimbardo’s Famous Study. https://www.simplypsychology.org/zimbardo.html​

TED. (n.d.). Philip Zimbardo: The psychology of evil. https://www.ted.com/talks/philip_zimbardo_the_psychology_of_evil​

Zimbardo, P. G. (2007). The Lucifer Effect: Understanding How Good People Turn Evil. Random House.​

लोकमत. (2025, 8 जानेवारी). एचएमपीव्ही विषाणू नवीन आहे, सोशल मीडिया अधिक धोकादायक आहे! अफवा पसरवू नका असे आवाहन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल | Holistic Teacher Appraisal Norms

  उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे मूल्यमापन हा शिक्षण गुणवत्ता ...