तर्कदोष
(Logical Fallacies) आणि त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण
तर्कदोष
म्हणजे तर्कशास्त्रातील अशा चुका ज्या युक्तिवादाच्या सुसंगतीवर परिणाम करतात. या
चुका दैनंदिन संभाषणांमध्ये, शैक्षणिक चर्चांमध्ये
आणि मानसशास्त्रासारख्या व्यावसायिक क्षेत्रांतही दिसू शकतात. हे तर्कदोष अनेकदा बोधनिक
पूर्वग्रह (cognitive biases), भावनिक प्रभाव (emotional
influences), सामाजिक दबाव (social pressures)
सामाजिक परिस्थिती (social conditioning) किंवा सारासार विचार कौशल्यांचा अभाव (lack of critical thinking skills)
यामुळे उद्भवतात, ज्यामुळे लोक चुकीच्या दृष्टिकोनांचा स्वीकार करतात. तर्कदोष समजून घेणे चिकित्सक
विचार करण्याच्या क्षमतेसाठी, मानसशास्त्रीय संशोधन
सुधारण्यासाठी आणि मानसिक आरोग्याविषयी सूक्ष्म निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचे आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात तर्कदोष
ओळखण्याचा आणि विश्लेषण करण्याचा मोठा वारसा आहे. न्यायशास्त्राचे जनक मानले
जाणारे महर्षी गौतम यांनी "न्यायसूत्र" या ग्रंथात युक्तिवाद, तर्क, आणि प्रमाणांचा (Means of Knowledge) सखोल अभ्यास
केला. त्यांनी "हेत्वाभास" (हेतु + आभास) म्हणजेच भ्रामक तर्क किंवा
भ्रांती यांचे विश्लेषण केले. मध्यमक शून्यवादाचे प्रवर्तक नागार्जुन (बौद्ध
तत्त्वज्ञान) यांनी तर्काच्या मर्यादा स्पष्ट करताना अनेक भ्रांती दाखवून दिल्या.
त्यांनी "चतुष्कोटी" (Tetralemma) या
तर्कशास्त्राच्या माध्यमातून तर्कशुद्ध विचारांचे आणि त्यांच्या विसंगतींचे
विश्लेषण केले. जैन न्यायशास्त्रात सापेक्ष दृष्टिकोन (Anekāntavāda) मांडला आहे,
ज्यात तर्काच्या मर्यादा आणि संभाव्य भ्रांती स्पष्ट केल्या आहेत.
त्यांनी "स्याद्वाद" आणि "नयवाद" या संकल्पनांच्या मदतीने
वस्तुस्थितीचे विविध पैलू दाखवून दिलेले आहेत.
तर्कदोष
याचा अभ्यास प्राचीन ग्रीसमध्ये सुरू झाला, जिथे अॅरिस्टॉटल आणि सॉक्रेटीस
यांसारख्या तत्त्वज्ञांनी योग्य आणि अयोग्य युक्तिवाद यामधील फरक ओळखण्यासाठी
तर्कनियमांचे विश्लेषण केले. अरिस्टॉटलच्या "सोफिस्टिकल रेफ्युटेशन्स"
या ग्रंथात विविध भ्रामक युक्तिवादांचे विवरण आहे, जे आजही
महत्त्वाचे मानले जातात. मध्ययुगात, थॉमस अक्विनास
यांसारख्या विद्वानांनी आणि नंतर जॉन लॉक व बर्ट्रांड रसेल यांसारख्या
तत्त्वज्ञांनी या संकल्पनांचा अधिक विकास केला. आधुनिक काळात, मानसशास्त्रातील
बोधनिक पूर्वग्रहांच्या (cognitive Bias) अभ्यासामुळे लोक तर्कदोष का करतात याविषयी अधिक सखोल माहिती मिळाली आहे.
तर्कदोष
ओळखण्याचे महत्त्व
तर्कदोष
ओळखणे हे तर्कसंगत चर्चा घडवून आणण्यासाठी, दिशाभूल
टाळण्यासाठी आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी अत्यंत
आवश्यक आहे. रोजच्या संभाषणांमध्ये, माध्यमांमध्ये, जाहिरातींमध्ये, राजकारणात आणि
शैक्षणिक क्षेत्रात असे तर्कदोष आढळू शकतात. असे तर्कदोष समजल्यास
व्यक्तींना माहितीचे सारासार मूल्यमापन करण्यास, अर्थपूर्ण
चर्चांमध्ये सहभागी होण्यास आणि समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यास मदत होते.
मानसशास्त्राचे
क्षेत्र हे मानवी विचारसरणी आणि वर्तन समजून घेण्याचा प्रयत्न करते. परंतु, जरी प्रशिक्षित व्यावसायिक समुपदेशक असले तरी पुरावे काळजीपूर्वक न
तपासल्यास तेही तर्कदोषाच्या जाळ्यात अडकू शकतात. या लेखात 16 प्रमुख तर्कदोष आणि
त्यांच्या मानसशास्त्रीय उदाहरणांचे स्पष्टीकरण दिले आहे, जे
विचारसरणी आणि निर्णय प्रक्रियेवर त्यांचा प्रभाव समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
1. अॅड होमिनेम (व्यक्तिगत हल्ला):
"अॅड होमिनेम" हा लॅटिन शब्द आहे, ज्याचा अर्थ
"व्यक्तीवर" असा होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या तर्काचा प्रतिवाद
करण्याऐवजी थेट त्या व्यक्तीच्या स्वभावावर किंवा चारित्र्यावर हल्ला केला जातो.
उदाहरणार्थ, एका मानसशास्त्रज्ञाने चिंतेवर उपाय म्हणून 'माइंडफुलनेस'
(mindfulness) सराव करण्याचा सल्ला दिला. यावर तो उपचारार्थी म्हणतो,
"तुम्ही हे केवळ वरवरचे म्हणून सांगताय, कारण
तुम्हाला कधीही खरी चिंता वाटली नाही!"
हे असे
का घडते? तर यांचे पहिले कारण भावनिक तर्क (Emotional
reasoning) असे लोक तार्किक विचार करण्याऐवजी भावनिक प्रतिक्रिया
देतात. दुसरे म्हणजे संरक्षण यंत्रणा (Defense mechanisms)
यामध्ये स्वतःच्या समस्यांचा सामना करण्याऐवजी लोक इतरांवर व्यक्तिगत हल्ला करतात.
यावर उपाय काय?
- व्यक्तीऐवजी प्रत्यक्ष तर्कावर लक्ष केंद्रित करा.
- प्रत्यक्ष विधानाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात पुरावे मागा.
- आपल्या भावनांचा वस्तुनिष्ठ
मूल्यमापनात हस्तक्षेप होत आहे का, हे ओळखा.
2. स्ट्रॉ मॅन (चुकीचे प्रतिमान तयार
करणे):
स्ट्रॉ
मॅन तर्कदोष म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष तर्काचा विपर्यास करून तो
दुर्बल किंवा हास्यास्पद वाटेल असा बनवणे. उदाहरणार्थ, एका व्याख्यानात एक मानसशास्त्रज्ञ
म्हणतो, "बालपणीचा मानसिक आघात प्रौढांच्या
नातेसंबंधांवर परिणाम करू शकतो." यावर कोणी तरी उत्तर देतो, "म्हणजे तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक नातेसंबंधातील समस्या बालपणीच्या
आघातामुळेच असते? हे हास्यास्पद आहे!"
हे असे
का घडते? तर यांचे पहिले कारण साधारणीकरण (Cognitive
simplification) यामध्ये लोक जटिल संकल्पना सोप्या पण चुकीच्या
पद्धतीने समजावतात. तसेच दुसरे म्हणजे पुष्टिकरण पूर्वग्रह (Confirmation
bias) यामध्ये लोक स्वतःच्या विश्वासानुसार इतरांच्या तर्काचा
विपर्यास करतात.
यावर उपाय काय?:
- मूळ तर्क स्पष्ट करा, त्याचा सारासार विचार करा.
- प्रतिवादीला खऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यास प्रवृत्त करा.
- विरोधी दृष्टिकोनांचा विपर्यास करू नका.
3. खोटा पर्याय (False
Dilemma, काळ्या-पांढऱ्या विचारसरणीचा तर्कदोष):
जेव्हा एखाद्या
परिस्थितीत फक्त दोन टोकाचे पर्याय दिले जातात, जेव्हा प्रत्यक्षात अनेक पर्याय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, "तुम्ही मानसिक आरोग्यासाठी औषधांचे पूर्ण समर्थन करताय किंवा तुम्हाला
वाटतं की सर्व औषधे हानिकारक आहेत."
हे
का घडते? यांचे एक कारण म्हणजे होय-नाही विचारसरणी (Binary
thinking) यामध्ये मानवी मेंदूला सोपे, स्पष्ट
उत्तर हवे असते. तर दुसरे कारण म्हणजे अनिश्चिततेची भीती (Anxiety
reduction) येथे लोकांना स्पष्ट पर्याय हवेत, त्यामुळे
ते अन्य संधींवर विचार करत नाहीत.
यावर उपाय काय?
- इतर पर्याय शोधा, आणि रेडीमेड उत्तर शोधण्यापेक्षा परिस्थितीजन्य घटकही लक्षात घ्या.
- टोकाच्या विचारांऐवजी संतुलित दृष्टिकोन ठेवा.
- मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक चर्चांमध्ये जटिलतेची कबुली द्या.
4. स्लिपरी स्लोप (अत्यंत वाईट
संभाव्यता गृहीत धरणे):
स्लिपरी
स्लोप तर्कदोष म्हणजे एखादा छोटा निर्णय किंवा कृती अपरिहार्यपणे भयानक
परिणामांकडे नेईल असे गृहीत धरले जाते. उदाहरणार्थ, "जर लोक गुगलचा आधारे स्वतःचे निदान करायला लागले, तर
लवकरच कोणीही व्यावसायिक मदत घेणार नाही आणि संपूर्ण मानसिक आरोग्य यंत्रणा
कोसळेल."
हे असे
का घडते? यामध्ये पहिले कारण भीतीवर आधारित विचारसरणी (Fear-based
thinking) असे लोक सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करतात. आणि दुसरे
म्हणजे नियमितता शोधण्याची प्रवृत्ती (Pattern recognition)
यामध्ये मेंदू कृतींमधील काल्पनिक कारणसंबंध शोधतो.
यावर उपाय का?
- प्रत्येक टप्प्याचे तार्किक विश्लेषण करा.
- भाकिताच्या संभाव्यता तपासा आणि स्वतंत्र विचारसरणीचा अवलंब करा.
- अशा उदाहरणांचा शोध घ्या, जिथे लहान कृतींमुळे मोठे दुष्परिणाम झाले नाहीत.
5. वर्तुळाकार तर्क (Circular
Reasoning):
यामध्ये
निष्कर्ष आधीच गृहीत धरला जातो आणि तोच तर्क म्हणून मांडला जातो. उदाहरणार्थ, "मला चिंता आहे कारण मी नेहमीच चिंतेत असतो." याचे आणखीन एक उदाहरण
म्हणजे “माझ्याच बाबतीत नेहमी असे का घडते.”
हे असे
का घडते? यांचे पहिले कारण बोधनिक शॉर्टकट (Cognitive
shortcuts) यामध्ये मेंदू स्वतःच्याच विश्वासांना पुष्टी देत राहतो.
आणि दुसरे कारण हे तार्किक मूल्यमापनाचा अभाव (Lack of Critical Evaluation) म्हणजे लोक
बाह्य पुराव्यांचा विचार करत नाहीत.
यावर उपाय काय?
- स्वतंत्र पुरावे शोधा, आपण जे पाहतो ते दुसर्यांच्या नजरेतून कसे दिसते ते पहा.
- गृहितकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करा.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे तर्कशुद्ध पद्धतीने विचार करा.
6. पोस्ट हॉक एर्गो प्रॉप्टर हॉक (चुकीचा कारण-संबंध):
या तर्कदोषामध्ये
असा समज करून घेतला
जातो की एक घटना दुसऱ्यानंतर घडली म्हणून पहिलीच दुसऱ्याला कारणीभूत असली पाहिजे.
उदाहरणार्थ, "मी थेरपी सुरू केली, आणि पुढच्या
आठवड्यात माझा नैराश्य अधिक वाढला—म्हणून थेरपी हानिकारक असली पाहिजे."
हे असे का घडते? याचे एक कारण म्हणजे भ्रमात्मक संबंध (Illusory
correlations) यामध्ये, जरी प्रत्यक्षात कोणताही संबंध नसला
तरीही मेंदू विशिष्ट पॅटर्न शोधतो. आणि दुसरे कारण म्हणजे भावनिक तर्क (Emotional
reasoning) यामध्ये तीव्र भावनिक अनुभव तार्किक विचारांना विकृत करू
शकतात.
यावर उपाय काय?
- इतर संभाव्य कारणे ओळखा.
- वैज्ञानिक पुराव्यांच्या मदतीने कारण-संबंध पडताळून पहा.
- संबंध (correlation) आणि कारणसंबंध (causation) यातील फरक समजून घ्या.
7. युक्तिवादासाठी भावना वापरणे (Appeal to
Emotion):
युक्तिवादाचा ग्राह्यपणा सिद्ध करण्यासाठी
तर्काच्या ऐवजी भावनांचा वापर करणे. उदाहरणार्थ, "तुम्हाला नैराश्य असलेल्या
लोकांची काळजी असेल, तर तुम्ही हे मान्य कराल की औषधोपचार
हाच एकमेव उपाय आहे."
हे असे का घडते? यांचे एक कारण म्हणजे भावनिक हाताळणी (Emotional
manipulation) यामध्ये भावना तर्कशक्तीवर प्रभाव टाकतात.
आणि दुसरे कारणम्हणजे पुष्टिकरण पूर्वग्रह (Confirmation
bias) यामध्ये लोक त्यांच्या भावनांना अनुसरून युक्तिवाद
शोधतात.
यावर उपाय का?
- भावनांपासून पुराव्याला वेगळे ठेवा.
- दाव्यांचे मूल्यमापन तर्क आणि डेटावर करा.
- कोणते भावनिक ट्रिगर तुमच्या निर्णयांवर परिणाम करत आहेत हे ओळखा.
8. बहुसंख्यांचा युक्तिवाद (Bandwagon/Appeal
to Popularity):
केवळ अनेक लोक त्यावर विश्वास ठेवतात
म्हणून, एखादी गोष्ट खरी आहे असे म्हणणे म्हणजे बहुसंख्यांचा युक्तिवाद होय. उदाहरणार्थ,
"सोशल मीडियावर सर्वजण ADHD च्या लक्षणांबद्दल बोलत आहेत, म्हणजे मलाही ADHD
असला
पाहिजे." कारण त्यातील काही गोष्टी मला लागू होतात.
हे असे का घडते? याचे एक कारण म्हणजे सामाजिक प्रभाव (Social
influence) यामध्ये लोक गटाच्या विश्वासांशी जुळवून घेतात आणि
स्वतंत्र विचार करत नाहीत. दुसरे म्हणजे सांगोपांग विचाराचा अभाव (Cognitive
ease) यामध्ये लोकप्रिय मत स्वीकारणे मानसिकदृष्ट्या सोपे
वाटते.
यावर उपाय काय?
- लोकप्रियतेच्या आधारावर नव्हे, तर पुराव्याच्या आधारे गोष्टी तपासा.
- मोठ्या संख्येने लोकांचा विश्वास असणे म्हणजेच सत्य असे नाही हे लक्षात ठेवा.
- सामाजिक सहमतीपेक्षा पुनरावलोकन केलेल्या संशोधनावर भर द्या.
9. घाईगडबडीचा सार्वत्रिकीकरणाचा भ्रम (Hasty
Generalization):
मर्यादित पुराव्याच्या आधारावर निष्कर्षाचे
सामान्यीकरण करणे. उदाहरणार्थ, "माझ्या जीवनात एक उद्धट मानसोपचारतज्ञाला
(थेरपिस्ट) भेटला, म्हणजे सर्व थेरपिस्ट वाईट असतात"
असा ग्रह करून घेणे.
हे असे का घडते? याचे पहिले कारण म्हणजे स्टीरिओटायपिंग (Stereotyping) यामध्ये मेंदू आलेले अनुभव लवकरात लवकर एका विशिष्ट
गटांमध्ये वर्गीकृत करतो. तसेच अपुऱ्या डेटेचा अभाव (Lack
of sufficient data) हे एक कारण असू शकते ज्यामध्ये लोक अल्प
अनुभवांवरून गृहीतके तयार करतात.
यावर उपाय काय?
- मोठ्या आणि अधिक प्रतिनिधीक नमुन्यांचा विचार करा.
- मर्यादित डेटाच्या आधारे तत्काळ निष्कर्ष काढू नका.
- निर्णय घेण्यापूर्वी विविध दृष्टिकोनांचा विचार करा.
10. अधिकाराला साद (Appeal to Authority):
हा
तर्कदोष (fallacy) तेव्हा होतो जेव्हा एखादा दावा पुराव्याऐवजी केवळ
या आधारावर सत्य मानला जातो की तो एखाद्या प्रतिष्ठित व्यक्ती किंवा संस्थेने
सांगितला आहे. उदाहरणार्थ, "डॉ. स्मिथ, एक प्रसिद्ध
मानसोपचारतज्ज्ञ, म्हणतात की ध्यान सर्व मानसिक आजार
बरे करते, त्यामुळे ते खरेच असले पाहिजे."
हे असे का घडते? याचे एक कारण म्हणजे तज्ज्ञांवर विश्वास (Trust Expertise) असणे
यामध्ये लोक गृहीत धरतात की अधिकार असलेल्या व्यक्तींना सर्व उत्तरं माहित असतात.
तसेच आणखीन एक कारण म्हणजे बोधनिक आळशीपणा (Cognitive Laziness) यामध्ये पुराव्यांचे विश्लेषण करण्याऐवजी तज्ज्ञांवर अवलंबून राहणे सोपे
वाटते.
यावर उपाय काय?
- अधिकार असलेल्या व्यक्तीची संबंधित क्षेत्रातील पार्श्वभूमी तपासा.
- दाव्याच्या समर्थनार्थ वैज्ञानिक पुरावे आहेत का ते शोधा.
- तज्ज्ञ देखील पक्षपाती किंवा चुकीचे असू शकतात हे ओळखा.
11. नो ट्रू स्कॉट्समन (No True
Scotsman):
हा तर्कदोष तेव्हा होतो जेव्हा एखादा सामान्य
दावा विरोधाभासी उदाहरणे टाळण्यासाठी बदलला जातो, ज्यामुळे मूळ
विधान टिकवून ठेवले जाते. उदाहरणार्थ, "खरा मानसशास्त्रज्ञ कधीच
थेरपीच्या फायद्यांवर प्रश्न विचारणार नाही."
हे असे का घडते? याचे एका कारण म्हणजे ओळख संरक्षण (Identity defense) यामध्ये लोक
त्यांच्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी गटांची व्याख्या बदलतात. तसेच दुसरे कारण
म्हणजे प्रेरित तर्क (Motivated Reasoning)
यामध्ये विरोधी पुरावे नाकारण्यासाठी व्याख्या बदलल्या जातात.
यावर उपाय काय?
- संकल्पनांची स्पष्ट आणि सुसंगत व्याख्या मागा.
- वादात सातत्याने बदलले जाणारे निकष (moving goalposts) ओळखा.
- विरोधाभासी पुरावे नाकारले जात आहेत का हे लक्षात घ्या.
12. निसर्गाला साद (Appeal to Nature):
हा तर्कदोष तेव्हा होतो जेव्हा केवळ
"नैसर्गिक" असल्यामुळे एखादी गोष्ट चांगली किंवा वैध मानली जाते. उदाहरणार्थ,
"नैसर्गिक उपचार नेहमीच (‘च’ वर जोर असतो) फार्मास्युटिकल औषधांपेक्षा चांगले
असतात."
हे असे का घडते? यांचे एक कारण म्हणजे नैसर्गिकतेचे आदर्शीकरण (Romanticization of nature) असे लोक निसर्गाला शुद्धता आणि आरोग्याशी जोडतात. आणि दुसरे म्हणजे कृत्रिम
हस्तक्षेपाचा धोका (Fear of artificial intervention)
यामध्ये काही लोक वैज्ञानिक प्रगतीवर अविश्वास दाखवतात.
यावर उपायकाय?
- "नैसर्गिक" असले म्हणजे ते आपोआपच चांगले किंवा सुरक्षित असते का? यावर प्रश्न विचारा.
- वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित दावे तपासा.
- नैसर्गिक पदार्थ देखील हानिकारक असू शकतात (उदा. विषारी वनस्पती).
13. रेड हेरिंग (Red Herring):
हा तर्कदोष तेव्हा होतो जेव्हा
एखाद्या मुख्य मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी असंबंधित मुद्दा आणला जातो. उदाहरणार्थ,
थेरपिस्ट: "तुम्ही तुमच्या तणावासाठी जर्नलिंगचा प्रयत्न केला पाहिजे." क्लायंट:
"पण ज्यांना थेरपी उपलब्ध नाही त्यांचे काय? आपण त्यावर
लक्ष केंद्रित करायला नको का?"
हे असे का घडते? यांचे एक प्रमुख कारण म्हणजे टाळाटाळ (Avoidance) असे लोक
अस्वस्थ करणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. तसेच दुसरे एके कारण म्हणजे
बोधनिक गोंधळ (Cognitive overload) यामध्ये असंबंधित मुद्दे
चर्चेला आणून गोंधळात टाकतात.
यावर उपाय काय?
- संभाषण मुख्य मुद्याकडे परत आणा.
- नवीन विषयाचा मूळ चर्चेशी संबंध आहे का, हे विचारा.
- चर्चेतील मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा.
14. खोटी समानता (False Equivalence):
हा तर्कदोष तेव्हा होतो जेव्हा दोन पूर्णपणे
वेगळ्या किंवा असंबंधित गोष्टींना सारखीच मानले जाते. उदाहरणार्थ, "अँटी-डिप्रेसंट
औषधे घेणे बेकायदेशीर ड्रग्ज घेण्याइतकेच वाईट आहे कारण दोन्ही मेंदूच्या
रसायनशास्त्रावर परिणाम करतात."
हे असे का घडते? याचे एक कारण म्हणजे अतिसुलभीकरण (Oversimplification), असे लोक
गुंतागुंतीच्या विषयांना सरळसरळ तुलना करतात. तसेच दुसरे कारण म्हणजे सूक्ष्म फरक
न समजणे (Misunderstanding of nuances)यामध्ये दोन
गोष्टींमधील महत्त्वाचे फरक दिसत नाहीत.
यावर उपाय की?
- तुलना केल्या जाणाऱ्या गोष्टींतील मूलभूत फरक ओळखा.
- संदर्भ स्पष्ट करून मुद्द्यांचे स्पष्टीकरण द्या.
- मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात बारकावे महत्त्वाचे असतात, हे अधोरेखित करा.
15. निवडक पुरावे (Cherry Picking):
हा तर्कदोष तेव्हा होतो जेव्हा एखाद्या
व्यक्तीला अनुकूल असे पुरावे निवडले जातात आणि विरोधी पुरावे दुर्लक्षित केले
जातात. उदाहरणार्थ, "अभ्यास दर्शवतात की सकारात्मक विचारसरणी नैराश्य बरे
करते!" पण थेरपी किंवा औषधोपचार गरजेचे असतात हे दाखवणारे अभ्यास दुर्लक्षित
केले जातात.
हे असे का घडते? याचे एक प्रमुक कारण म्हणजे पुष्टीकरण पूर्वग्रह (Confirmation
Bias) असे लोक त्यांच्या विश्वासाशी सुसंगत माहितीच
स्वीकारतात. आणि दुसरे म्हणजे निवडक अवधान (Selective Attention), यामध्ये मेंदू
विरोधी पुरावे गाळून टाकतो.
यावर उपाय काय?
- एखाद्या विषयावर व्यापक संशोधन पाहा, एकाच अभ्यासावर अवलंबून राहू नका.
- संपूर्ण पुरावे मागा, फक्त निवडक नाहीत.
- विरोधी पुरावे दुर्लक्षित केले जात आहेत का, हे ओळखा.
16. तू क्वोक्वे (Tu Quoque) (You Too Fallacy):
हा तर्कदोष तेव्हा होतो जेव्हा एखादी व्यक्ती
टीका नाकारण्यासाठी, टीका करणाऱ्यानेही तोच दोष केला आहे
असे सांगते. उदाहरणार्थ, "तुम्ही म्हणता की मला माझ्या रागावर नियंत्रण
ठेवायला हवे, पण तुम्हालाही कधी कधी राग
येतो!"
हे असे का घडते? यांचे एक प्रमुख कारण म्हणजे संरक्षणात्मक प्रतिक्रिया (Defensiveness), असे लोक दोष
झटकून टाकण्यासाठी हा तर्क वापरतात. दुसरे कारण म्हणजे स्वतःच्या चुका न मानण्याची
प्रवृत्ती (Avoidance
of self-reflection), यामध्ये स्वतःच्या कमतरतांची कबुली देणे अवघड
वाटते.
यावर उपाय काय?
- मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा, व्यक्तीच्या वागणुकीवर नाही.
- कोणीतरी ढोंगी आहे याचा अर्थ त्यांचा मुद्दा चुकीचा आहे असे होत नाही.
- एखाद्या मुद्द्याची चर्चा त्याला मांडणाऱ्या व्यक्तीपासून वेगळी ठेवा.
समारोप:
तर्कदोष (Logical Fallacies) हे
केवळ वादविवाद किंवा शैक्षणिक चर्चांपुरते मर्यादित नसून, ते
आपल्या विचारसरणीवर आणि निर्णयप्रक्रियांवर खोलवर प्रभाव टाकतात. मानसशास्त्राच्या
दृष्टिकोनातून पाहता, तर्कदोष हे बोधनिक पूर्वग्रह, भावनिक प्रभाव, सामाजिक दबाव आणि तार्किक
कौशल्यांच्या अभावामुळे उद्भवतात. योग्य निर्णय घेण्यासाठी आणि सुजाण नागरिक
होण्यासाठी हे तर्कदोष ओळखणे आणि त्यांचा निष्पक्षपणे विचार करणे आवश्यक आहे.
तर्कदोष ओळखण्याची क्षमता म्हणजे
केवळ तर्कशास्त्रीय सराव नसून, ती आत्मपरीक्षणाची आणि बौद्धिक प्रामाणिकपणाची
प्रक्रिया आहे. विविध समाज माध्यमांमधून, राजकीय
प्रचारांमधून आणि वैयक्तिक चर्चांमधून मिळणाऱ्या माहितीकडे चिकित्सक दृष्टिकोनातून
पाहण्याची सवय लावल्यास गोंधळ, दिशाभूल आणि चुकीच्या
निर्णयांपासून बचाव करता येतो. तसेच, मानसशास्त्र आणि
तर्कशास्त्राच्या साहाय्याने आपण आपल्या विचारसरणीत अधिक सुसंगती आणि स्पष्टता आणू
शकतो. तर्कदोष समजून घेणे म्हणजे केवळ इतरांच्या चुकांची चिकित्सा करणे नव्हे,
तर स्वतःच्या विचारांमधील संभाव्य पूर्वग्रह ओळखून अधिक तर्कशुद्ध
आणि समतोल विचार करण्याची संधी शोधता येते.
संदर्भ:
Kahneman,
D. (2011). Thinking, fast and slow. UK: Penguin.
Nisbett,
R. E. (2015). Mindware: Tools for Smart Thinking. Farrar,
Straus and Giroux.
Tversky,
A., & Kahneman, D. (1974). Heuristics and biases: Judgement under
uncertainty. Science, 185, 1124-1130.
Walton,
D. (2008). Informal Logic: A Pragmatic Approach (2nd ed.). Cambridge University Press.
Wason,
P. C., & Johnson-Laird, P. N. (1972). Psychology of
Reasoning: Structure and Content. Harvard University Press.
Zarefsky,
D. (2005). Argumentation: The Study of Effective
Reasoning. The Teaching Company.
कंगले, र. पं. (1985). श्रीमन्माधवाचार्यप्रणीत
सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ
जोशी, गजानन (1994). भारतीय तत्त्वज्ञानाचा
बृहद इतिहास (1 ते 12 खंड),
मराठी
तत्त्वज्ञान महाकोश मंडळ
दीक्षित, श्रीनिवास (2009).
भारतीय तत्त्वज्ञान - नववी आवृत्ती, फडके प्रकाशन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions