शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

अत्यंत मोकळ्या मनाने विचार | Radical Open-Mindedness


अत्यंत मोकळ्या मनाने विचार करण्याचा सराव

एका विद्वान प्राध्यापकाला प्राचीन तत्त्वज्ञान शिकायचे होते. त्यामुळे तो एका महान गुरुंकडे गेला. गुरुंचे ज्ञान सर्वदूर प्रसिद्ध होते, आणि प्राध्यापक अत्यंत उत्सुकतेने त्यांच्याकडे ज्ञान मिळवायला गेले. "गुरुजी, मला तुमच्या तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आहे. मी आधी खूप ग्रंथ वाचले आहेत आणि मी बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या आहेत. मला वाटतं की मी आधीच बरंच काही जाणतो, पण मला तुमच्या दृष्टिकोनातून अधिक शिकायचं आहे." प्राध्यापक उत्साहाने म्हणाला.

गुरुंनी मंदस्मित केले आणि त्यांनी प्राध्यापकाला चहा घेण्याची विनंती केली. त्यांनी कप घेतला आणि त्यात ते गुरु चहा ओतू लागले. कप भरला, पण गुरु अजूनही चहा ओततच राहिले. चहा कपातून बाहेर वाहू लागला आणि खाली सांडू लागला. तसा प्राध्यापक चकित झाला आणि म्हणाला, "गुरुजी, थांबा! कप आधीच भरला आहे, त्यात आणखी चहा मावत नाही!"

गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, "बरोबर सांगितलंस. जसा हा कप आधीच भरलेला आहे, तसंच तुझं मनही आहे. तू आधीच सर्व काही जाणतोस असं मानतोस, त्यामुळे मी तुला नवीन काही शिकवू शकत नाही. जर तुला खरंच शिकायचं असेल, तर तुझ्या मनाचा कप रिकामा करावा लागेल." खरं ज्ञान मिळवायचं असेल, तर आधीच्या पूर्वग्रहांना बाजूला ठेवून मन मोकळं आणि खुले ठेवलं पाहिजे. आपलं मन आधीच भरलेलं असेल, तर नवीन गोष्टी शिकण्यासाठी जागा उरणार नाही. रॅडिकल ओपन-माइंडेडनेस म्हणजे आपल्या मनाचा कप रिकामा ठेवणं आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची तयारी ठेवणं.

अत्यंत मोकळ्या मनाने विचार (Radical Open-Mindedness) हा रे डालियो यांनी त्यांच्या प्रिन्सिपल्स फॉर सक्सेस या पुस्तकात दिलेला एक मुख्य सिद्धांत आहे. हा असा दृष्टिकोन आहे जो व्यक्तींना नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यास, स्वतःच्या समजुतींना आव्हान देण्यास आणि कोणत्याही स्रोताकडून सर्वोत्तम कल्पना स्वीकारण्यास सक्षम करतो. आजच्या वेगवान जगात, जिथे माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि निर्णय अधिकाधिक गुंतागुंतीचे होत आहेत, तेथे रॅडिकल ओपन-माइंडेडनेसचा सराव करणे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

अत्यंत मोकळ्या मनाने विचार म्हणजे काय?

अत्यंत मोकळ्या मनाने विचार म्हणजे विचार करण्याची अशी प्रक्रिया, जिथे आपण आपल्या विद्यमान समजुती, विश्वास, आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यास तयार असतो. यामध्ये केवळ नवीन माहिती मिळवणे महत्त्वाचे नसून, आपल्या जुन्या विचारसरणीला तपासून त्या बदलण्यासाठी सक्षम बनणेदेखील आवश्यक असते.

अत्यंत मोकळ्या मनाने विचार करणाऱ्यांची वैशिष्ट्ये:

  • आपण चुकीचे असू शकतो आणि त्यावर पुनर्विचार करायला हवे, ही भावना स्वीकारतात.
  • आपल्या विचारांशी अहंकार (ego) न जोडता त्यांना सतत तपासण्याची तयारी ठेवतात.
  • वेगवेगळ्या लोकांच्या मतांकडे खुलेपणाने पाहणे आणि त्यांचा गांभीर्याने विचार करतात.
  • इतरांच्या कल्पना ऐकून घेणे, त्यावर चर्चा करणे आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात.
  • परिस्थितीनुसार आपल्या मतांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची तयारी ठेवतात.

रॅडिकल ओपन-माइंडेडनेस का गरजेचे आहे?

हे सिद्ध झाले आहे की मोकळ्या मनाने विचार स्वीकारणाऱ्या लोकांचे निर्णय अधिक सुज्ञ आणि प्रभावी असतात त्यामुळे उत्कृष्ट निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी रॅडिकल ओपन-माइंडेडनेस आवश्यक आहे.

  • संशोधनातून असे आढळून आलेले आहे की जेव्हा आपण नवीन कल्पना स्वीकारतो, तेव्हा नवनिर्मिती आणि नावीन्यपूर्णता वाढते.
  • वेगवेगळ्या दृष्टिकोनांना स्वीकारल्यामुळे आपले विचार विस्तृत होतात आणि आपली समज वाढते यामुळे मानसिक लवचिकता आणि शिकण्याची प्रक्रिया वृद्धिंगत होते.
  • खुलेपणाने चर्चा केल्याने परस्पर समज वाढतो आणि मतभेद सुटण्यास मदत होते आणि नातेसंबंध सुधारतात.
  • चुकीच्या समजुतींना चिकटून राहण्याऐवजी नवीन विचार स्वीकारल्याने मनःशांती मिळते आणि त्यामुळे भावनिक समतोल राखता येतो.

रॅडिकल ओपन-माइंडेडनेस केवळ एक वैयक्तिक गुणधर्म नसून, हा व्यवसाय, शिक्षण, संशोधन आणि वैयक्तिक विकास या सर्व क्षेत्रांसाठी आवश्यक आहे.

रॅडिकल ओपन-माइंडेडनेससाठी मानसशास्त्रीय अडथळे

रॅडिकल ओपन-माइंडेडनेसच्या फायद्यांबद्दल स्पष्टता असली तरीही, अनेक वेळा ते प्रत्यक्षात आणणे कठीण ठरते, कारण विविध मानसिक पूर्वग्रह आणि भावनिक बंधने अडथळा ठरतात. काही प्रमुख मानसिक अडथळे म्हणजे:

1. बोधनिक पूर्वग्रह (Cognitive Biases)

पुष्टीकरण पूर्वग्रह (Confirmation Bias): आपण फक्त आपल्या विद्यमान विश्वासांना पूरक असलेली माहिती स्वीकारतो आणि विरोधी माहिती नाकारतो. एखादा जर विशिष्ट राजकारणाबाबत ठाम मतं बाळगतो. तो फक्त त्याच न्यूज चॅनेल्स आणि सोशल मीडिया पोस्ट्स बघतो ज्या त्याच्या मतांशी सहमत असतात. जेव्हा कोणी त्याला विरोधी दृष्टिकोन सांगतो, तेव्हा तो ते फेक न्यूज म्हणून नाकारतो.

बॅकफायर प्रभाव (Backfire Effect): जेव्हा आपला विश्वास आव्हान केला जातो, तेव्हा आपण तो अधिक दृढ करतो. एखाद्याला वाटतं की ती घेत असलेली औषधं अत्यंत प्रभावी असतात. जेव्हा वैज्ञानिक संशोधन तिला त्याविरुद्ध पुरावे दाखवतं, तेव्हा ती त्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्या  अधिऔषधाविषयी चांगली उदाहरणं शोधायला लागते.

स्व-भाकीत संकेत (Self-Fulfilling Prophecy): आपण काहीतरी खरे मानल्यामुळे तसा अनुभव घेण्याची शक्यता वाढते. आकाशला वाटतं की तो गणितात कमजोर आहे. त्यामुळे तो सराव करत नाही, वर्गात लक्ष देत नाही, आणि परीक्षेत वाईट गुण मिळवतो आणि तो त्याच्या स्वतःच्या विश्वासाला खरे ठरवतो.

2. ओळख आणि अहंकार (Identity & Ego)

अनेकदा आपले विचार आणि श्रद्धा आपल्या ओळखीचा भाग बनतात. जेव्हा कोणी त्यांना आव्हान देतो, तेव्हा आपण ते व्यक्तिगत हल्ला समजतो. रवी शाकाहारी आहे आणि त्याचा त्यावर खूप अभिमान आहे. जेव्हा कोणी त्याला मांसाहाराच्या पोषणात्मक फायद्यांबद्दल सांगतो, तेव्हा तो वैयक्तिक हल्ला समजून चिडतो आणि कोणतीही चर्चा नाकारतो.

अहंकार संरक्षण यंत्रणा (Ego Defense Mechanisms) जसे की तर्कटपणा (Rationalization) आणि नकार (Denial) आपल्याला खुलेपणाने विचार करण्यापासून परावृत्त करतात. लीना आपल्या कंपनीत चांगल्या पदावर आहे. जेव्हा नवीन संशोधन दाखवतं की तिच्या जुन्या कामाच्या पद्धती अप्रभावी आहेत, तेव्हा ती तर्क देते की “मी इतके वर्ष यशस्वी झाले आहे, मग ते कसे चुकीचे असू शकते?”

3. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव (Social & Cultural Influences)

आपल्या समुहातील लोक जे विचार करतात, त्याच विचारांशी आपण सहमत राहण्याची प्रवृत्ती असते (Groupthink). स्नेहा तिच्या मित्रमंडळींसोबत एका राजकीय पक्षाला समर्थन देते. तिला त्या पक्षाच्या काही धोरणांबद्दल शंका असते, पण जर ती काही विचारले तर मित्रांनी तिची टर उडवली जाईल या भीतीने ती गप्प राहते आणि त्याच विचारधारेचा स्वीकार करते.

सांस्कृतिक विश्वास आणि परंपरा अनेकदा नवीन किंवा वेगळ्या दृष्टिकोनांसाठी अडथळा ठरतात. मोहनच्या घरात स्त्रियांना घरगुती जबाबदाऱ्या पार पाडायला शिकवलं जातं. जेव्हा तो एका मित्राकडून ऐकतो की काही देशांमध्ये पुरुष स्वयंपाक करतात आणि घर चालवतात, तेव्हा त्याला ते “अयोग्य” वाटतं कारण त्याच्या संस्कृतीत तसं पाहिलं जात नाही.

4. भावनिक प्रतिक्रिया (Emotional Reactions)

अनिश्चिततेचा (Uncertainty) सामना करताना अस्वस्थता वाटते, म्हणून लोक परिचित गोष्टींना धरून राहतात. शीतल एका ठराविक प्रकारच्या धार्मिक प्रथा पाळत आली आहे. जेव्हा ती नवीन तत्त्वज्ञान शिकते, तेव्हा तिला गोंधळल्यासारखे वाटते आणि त्यापेक्षा तिची पारंपरिक विचारसरणी बरी असं वाटतं, त्यामुळे ती नवीन माहिती नाकारते.

भीती आणि असुरक्षितता यामुळे लोक नवीन कल्पनांना विरोध करू शकतात. आनंद सध्या एका जुन्या कंपनीत नोकरी करत आहे. नवीन तंत्रज्ञान शिकणे कठीण वाटत असल्याने, त्याला नव्या संधींसाठी अर्ज करायला भीती वाटते. त्यापेक्षा तो सध्याच्या असुरक्षित पण परिचित परिस्थितीत राहणं पसंत करतो.

5. ज्ञानाचा भ्रम (Illusion of Knowledge)

लोकांना वाटते की त्यांना विशिष्ट विषयाची पुरेशी माहिती आहे, त्यामुळे ते नवीन माहिती स्वीकारायला तयार नसतात. रमेशला वाटतं की तो गुंतवणुकीच्या बाबतीत तज्ज्ञ आहे कारण त्याने काही यशस्वी व्यवहार केले आहेत. जेव्हा कोणी त्याला नवीन गुंतवणुकीच्या धोरणांबद्दल सांगतो, तेव्हा तो म्हणतो, “माझं ज्ञान पुरेसं आहे, मला नवीन शिकायची गरज नाही.”

डन्निंग-क्रूगर प्रभाव (Dunning-Kruger Effect) अज्ञानामुळे आत्मविश्वास वाढतो आणि खरोखरच ज्ञानी लोक स्वतःच्या ज्ञानाबद्दल साशंक असतात. एक नवखा फोटोग्राफर दोन महिन्यांचा अनुभव घेतल्यावर समजतो की तो आता मास्टर फोटोग्राफर आहे. तो अनुभवी फोटोग्राफर्सच्या सल्ल्याला किंमत देत नाही, कारण त्याला वाटतं की तो आधीच सर्व काही जाणतो. असेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले समुपदेशक जागोजागी भेटतील.

हे अडथळे समजून घेणे म्हणजे त्यांच्यावर मात करण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे.

व्यवसायात रॅडिकल ओपन-माइंडेडनेसचा प्रयोग

डालियो यांनी ब्रिजवॉटर असोसिएट्स येथे रॅडिकल ट्रान्सपरन्सी (पूर्णपणे पारदर्शकता) आणि ओपन-माइंडेडनेसचा अंगीकार केला. त्यामुळे:

  • कर्मचाऱ्यांना मुक्तपणे चर्चेत भाग घेण्याची संधी मिळाली, ज्यामुळे उत्तम निर्णय प्रक्रिया झाली त्यामुळे चांगले निर्णय घेता आले.
  • विविध दृष्टिकोन स्वीकारल्याने सर्जनशीलता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळाले त्यामुळे नवकल्पनांना चालना मिळाली.
  • कर्मचाऱ्यांनी चुका लपवण्याऐवजी त्यांच्याकडून शिकण्यास प्राधान्य दिले त्यामुळे सतत सुधारणा करणारी संस्कृती विकसित झाली.

समारोप

रॅडिकल ओपन-माइंडेडनेस हा फक्त एक वैयक्तिक गुणधर्म नसून यशस्वी होण्याचे प्रभावी साधन आहे. व्यवसाय, नाती आणि वैयक्तिक विकास या सर्व बाबतीत, नवीन कल्पना व दृष्टिकोन स्वीकारल्याने वाढ आणि नवसंशोधनास चालना मिळते. वरील धोरणे अंमलात आणून व्यक्ती आणि संस्था एक सतत शिकण्याची आणि चांगले निर्णय घेण्याची संस्कृती विकसित करू शकतात.


(सर्व चित्रे आणि इमाजेस google वरून साभार)

संदर्भ:

Dalio, R. (2017). Principles: Life and work. Simon & Schuster.

Dalio, R. (2018). Principles for navigating big debt crises. Bridgewater.

Dalio, R. (2018). Principles for success. Simon & Schuster.

Dalio, R. (2021). Principles for dealing with the changing world order: Why nations succeed and fail. Simon & Schuster.

Dalio, R. (2021). The changing world order: Why nations succeed and fail. Simon & Schuster.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल | Holistic Teacher Appraisal Norms

  उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे मूल्यमापन हा शिक्षण गुणवत्ता ...