सुख, दुःख आणि आनंद: वेळेच्या अनुभूतीचे अंतरंग
वेळ
ही सापेक्ष संकल्पना आहे. तिची अनुभूती प्रत्येकाच्या मानसिक व भावनिक अवस्थेनुसार
बदलते. "सुखात वेळ लवकर निघून जातो, दुःखात वेळ लवकर जात नाही, पण आनंदात वेळ शून्य होऊन
जाते." या वाक्यात वेळेच्या अनुभूतीच्या विविध छटा दिसतात. वेळेचा वेग हा
आपली मानसिकता, भावनात्मक परिस्थिती आणि अनुभूतींवर अवलंबून
असतो. मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि न्यूरोसायन्सच्या
अभ्यासांमधून वेळेच्या अनुभूतीसंबंधी अनेक महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले गेले आहेत.
अ. सुखात वेळ लवकर निघून जातो: वेळेची
सापेक्ष अनुभूती
वेळ ही मानवी अनुभूतीसाठी अत्यंत
सापेक्ष संकल्पना आहे. तिची अनुभूती मनाच्या स्थितीनुसार बदलते. सुख ही आपल्या
आयुष्यातली सहजसाध्य अवस्था असते. जेव्हा जीवन सुरळीत चालू असते, तेव्हा वेळ कसा
निघून जातो हे आपल्याला कळतही नाही.
1. सुख म्हणजे नेमकं काय?: सुख म्हणजे एक प्रकारची समाधानाची
भावना, जी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असते. त्यामुळे सुखाचा काळ वेगाने पुढे
सरकत राहतो. म्हणजेच, एखादी व्यक्ती
जेव्हा स्थिर, समाधानी आणि तणावमुक्त जीवन जगत असते, तेव्हा ती सुखी
असते. मानसशास्त्रातील हेडोनिक अडॅप्टेशन (Hedonic
Adaptation) संकल्पनेनुसार, मानवी मन सकारात्मक अनुभवांसोबत सहज
जुळवून घेतो आणि ते जीवनाचा नेहमीचा भाग वाटू लागतात (Brickman
& Campbell, 1971). म्हणूनच, जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ सुखी
असते, तेव्हा तिला जाणवतही नाही की वेळ किती वेगाने पुढे सरकतो आहे.
2. सुख आणि वेळेची सापेक्ष अनुभूती: वेळेच्या
अनुभूतीवर मानसशास्त्रीय संशोधनानुसार, सुखकारक
अनुभवांच्या वेळी व्यक्ती अधिक गुंतलेली (engaged) असते आणि
त्यामुळे तिला वेळ वेगाने सरतो असे वाटते. डॅनियल काह्नेमन (Daniel
Kahneman) आणि अॅमोस टव्हर्स्की (Amos Tversky) यांनी
त्यांच्या Prospect Theory मध्ये नमूद केले आहे की मानवी निर्णय
प्रक्रिया सापेक्षतेवर (relativity) आधारित असते. म्हणजेच, व्यक्ती
एखाद्या विशिष्ट परिस्थितीशी तुलना करून वेळेचा वेग ठरवते (Kahneman
& Tversky, 1979).
उदाहरणार्थ, एखाद्या सुटीवर
असलेल्या व्यक्तीला आठवडाभराचा कालावधी खूप लवकर संपल्यासारखा वाटतो. पण त्याच
आठवड्यात एखादा विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी तासन् तास अभ्यास करत असेल, तर त्याला
प्रत्येक दिवस खूप लांबलेला वाटतो.
3. न्यूरोसायन्स आणि सुखद अनुभवातील
वेळेची अनुभूती: सुखाच्या अनुभवात वेळ वेगाने जाण्यामागे न्यूरोसायन्स देखील
महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधनानुसार, आनंददायी
अनुभवांदरम्यान मेंदूमध्ये डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरचे स्त्रावण वाढते (Schultz,
1998).
डोपामाइन हे मेंदूच्या reward system ला सक्रिय करते, ज्यामुळे सुखकारक
क्षण अधिक वेगवान वाटतात. याउलट, तणाव आणि दुःखाच्या काळात अमिग्डाला
(Amygdala) सक्रिय होते आणि वेळेची अनुभूती मंदावते (Droit-Volet
& Meck, 2007). म्हणूनच, सुखद अनुभवांमध्ये वेळ लवकर जातो, तर दुःखद काळ
अधिक लांबलेला वाटतो.
4. तत्त्वज्ञानिक दृष्टिकोन आणि
निष्कर्ष: पाश्चात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानात वेळेच्या अनुभूतीबाबत अनेक
दृष्टिकोन आहेत. ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटीस आणि प्लेटो यांनी असा उल्लेख केला आहे
की, सुखी जीवन जगणाऱ्या व्यक्तीला वेळेची जाणीव होत नाही, कारण काळाच्या
पुढची अनुभुइति घेत असतो. तसेच, भारतीय तत्त्वज्ञानातील योग आणि
ध्यान यामध्येही असे म्हटले आहे की जेव्हा मन शांत असते आणि समाधानी असते, तेव्हा कालबोध
कमी होतो. सुखात वेळ वेगाने जातो याचे कारण वैज्ञानिक, मानसशास्त्रीय
आणि तत्त्वज्ञानिक पातळीवर स्पष्ट करता येते. सुखाची सवय होण्यामुळे (hedonic
adaptation), मेंदूमधील डोपामाइन स्त्रावामुळे आणि flow state मध्ये असतानाच्या
तल्लीनतेमुळे आपल्याला वेळेचा वेग जास्त वाटतो.
सुखाची अनुभूती असताना वेळ लवकर जातो
कारण आपले मन तेव्हा एकतर वर्तमानात रमलेले असते किंवा ते त्या अनुभवाशी इतके
जुळवून घेतलेले असते की त्याला कालबोध राहत नाही. वैज्ञानिक संशोधन, न्यूरोसायन्स
आणि तत्त्वज्ञान या सर्वच पातळ्यांवर या संकल्पनेला पुष्टी मिळते. म्हणूनच, जेव्हा आपण
सुखी असतो, तेव्हा आपण वेगाने पुढे जातो आणि वेळेचा मागोवा
ठेवणं कठीण होऊन जातं.
ब. दुःख आणि
वेळेची संथता
बुद्ध म्हणतात की दुःख ही मानवी
जीवनातील अविभाज्य अनुभूती आहे, ज्याचा वेळेच्या जाणिवेवर खोल परिणाम
होतो. वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, दुःखाच्या
काळात व्यक्तीच्या मेंदूतील जैवरासायनिक बदल तसेच मानसिकतेतील घडामोडी वेळेच्या
अनुभूतीला प्रभावित करतात.
1. न्यूरोबायोलॉजिकल परिणाम आणि
वेळेची अनुभूती: दुःख आणि तणाव यांचा मेंदूतील विशिष्ट भागांवर प्रभाव पडतो. विशेषतः, अॅमिग्डाला (Amygdala)
आणि
हायपोथॅलॅमस (Hypothalamus) या मेंदूच्या भागांचा संबंध भावनांचे
नियमन आणि तणाव प्रतिसादाशी आहे. संशोधनानुसार, दुःखाच्या
काळात अॅमिग्डालाची क्रियाशीलता वाढते, ज्यामुळे
नकारात्मक भावना अधिक तीव्रतेने अनुभवल्या जातात (LeDoux, 2000).
तसेच, हायपोथॅलॅमस-पीट्युटरी-अॅड्रिनल
(HPA) अॅक्सिस सक्रिय होतो आणि शरीरात कॉर्टिसोल (Cortisol)
या
तणाव-संबंधित संप्रेरकाची पातळी वाढते (Sapolsky, 2004). उच्च
कॉर्टिसोल पातळीमुळे हिप्पोकॅम्पस (Hippocampus), जो स्मरणशक्ती आणि वेळेच्या अनुभूतीशी संबंधित आहे, याच्या
कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो (McEwen, 1998). परिणामी, व्यक्तीला
वाटते की वेळ संथपणे पुढे सरकत आहे, कारण मेंदू
तणावग्रस्त अवस्थेत असतो आणि बाह्य परिस्थितींचे आकलन अधिक तीव्रतेने करतो.
2. भावनिक वेदना आणि वेळेची संथता: दुःखाच्या वेळी
मेंदूतील वेदनांवर प्रक्रिया करण्याऱ्या भागांचा सक्रिय होण्याचा प्रभाव वेळेच्या
अनुभूतीवर पडतो. संशोधन दर्शवते की शारीरिक वेदना आणि भावनिक वेदना प्रक्रिया
करण्यासाठी काही समान न्यूरल नेटवर्क्स कार्यरत असतात, विशेषतः
अॅन्टिरीअर सिंग्युलेट कॉर्टेक्स (Anterior
Cingulate Cortex) आणि इन्सुला (Insula) (Eisenberger &
Lieberman, 2004). त्यामुळे भावनिक वेदना अनुभवल्यास, व्यक्तीला
प्रत्येक क्षण अधिक तीव्र आणि दीर्घ भासतो.
याशिवाय, दुःखाच्या वेळी
व्यक्ती सतत भूतकाळाच्या आठवणीत रमते किंवा भविष्याची चिंता करते. या मानसिक
प्रक्रियेमुळे "टाईम परसेप्शन बायस" (Time Perception
Bias) निर्माण
होतो, जिथे व्यक्तीला वेळ अधिक लांब वाटते (Wittmann, 2009).
त्यामुळे, दुःखाच्या काळात व्यक्ती वर्तमान काळाशी तुटलेली असते, आणि तिचे
संपूर्ण मानसिक चक्र वेदनादायक आठवणी आणि भविष्यकाळातील अनिश्चिततेभोवती फिरत
राहते.
3. मानसिक आरोग्यावर परिणाम आणि
वेळेची जाणीव: दीर्घकालीन दुःख किंवा अवसाद (Depression) असल्यास, व्यक्तीला
"स्लो टाईम एक्सपिरियन्स" (Slow Time
Experience) होतो, जिथे सामान्य वेळी वेगाने जाणारा वेळ
अधिक संथ भासतो. नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या न्यूरोसायन्स संशोधनात असे आढळले आहे
की, त्यांच्या ब्रेन नेटवर्कमध्ये डिसकनेक्शन वाढते, विशेषतः
डिफॉल्ट मोड नेटवर्क (Default Mode Network) मध्ये, जे
आत्मचिंतनाशी संबंधित असते (Andrews-Hanna et al., 2014). परिणामी, ते भूतकाळातील
दु:खद घटना आठवण्यात अधिक वेळ घालवतात, त्यामुळे वेळ
अधिक लांब आणि असह्य वाटतो.
दुःख आणि मानसिक वेदनांचा वेळेच्या
अनुभूतीवर खोल परिणाम होतो. न्यूरोबायोलॉजिकल पातळीवर, वाढलेला
कॉर्टिसोल स्तर, अॅमिग्डालाची वाढलेली संवेदनशीलता आणि
हिप्पोकॅम्पसच्या कार्यक्षमतेंत झालेली घट, या सगळ्यांमुळे
व्यक्तीला वेळ संथ वाटतो. तसेच, मानसिक त्रासामुळे सतत भूतकाळातील
दु:खद घटना आठवणे किंवा भविष्याची चिंता करणे या प्रक्रियांमुळे व्यक्तीला
प्रत्येक क्षण अधिक लांब आणि जड वाटतो.
क. आनंद आणि
वेळेचा शून्यभाव
आनंद ही मानवी अनुभवाची एक अनोखी
अवस्था आहे जी व्यक्तीला पूर्णतः वर्तमानात रमवते. या अवस्थेत असताना वेळेचे भान
हरवते आणि व्यक्ती फक्त त्या क्षणात जगते. ही संकल्पना मानसशास्त्र, न्यूरोसायन्स
आणि ध्यानधारणा या क्षेत्रांमध्ये विविध प्रकारे स्पष्ट केली गेली आहे.
1. Flow
Theory आणि वेळेचा विसर: मिहायी चिकसेंटमिहायी (Mihaly
Csikszentmihalyi) यांनी Flow: The Psychology of Optimal
Experience (1990) या ग्रंथात "Flow
Theory" विषद केली आहे. या संकल्पनेनुसार, जेव्हा एखादी
व्यक्ती संपूर्ण तल्लीनतेने कोणत्याही क्रियेत मग्न होते, तेव्हा तिच्या
मेंदूमध्ये ऑप्टिमल एक्सपिरियन्स (Optimal
Experience) तयार होतो आणि तिला वेळेची जाणीव राहत नाही.
फ्लो ही अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती
एका समतोल स्थितीत असते, ती क्रिया तिच्या क्षमतांपेक्षा न काहीशी अवघड आणि न
काहीशी सोपी असते. उदाहरणार्थ, एक कलाकार चित्र रंगवत असताना, एखादा लेखक
लिखाणात तल्लीन झालेला असताना किंवा एक वैज्ञानिक प्रयोगामध्ये पूर्णपणे मग्न
झालेला असताना त्याला बाह्य जगाचे भान राहत नाही.
चिकसेंटमिहायी यांनी त्यांच्या
अभ्यासांमधून दाखवले की, जेव्हा व्यक्ती फ्लो अवस्थेत असते, तेव्हा मेंदू
आनंदनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या न्यूरोट्रांसमीटरसारखे डोपामाइन (Dopamine)
मोठ्या
प्रमाणात स्रवतो, ज्यामुळे आनंदाची अनुभूती अधिक तीव्र
होते (Csikszentmihalyi, 1990).
2. सजगता, ध्यानधारणा आणि वेळेचा
विसर: फ्लो अवस्थेप्रमाणेच सजगता (Mindfulness) ध्यानधारणेच्या (Meditation)
प्रक्रियेमध्येही
व्यक्ती वर्तमान क्षणात पूर्णतः विलीन होते. ध्यानधारणा करताना, मानसिक
सक्रियता एका विशिष्ट पातळीवर स्थिरावते आणि व्यक्तीला काळाचा विसर पडतो.
झेन ध्यान (Zen
Meditation) आणि सजगता (Vipassana) यासारख्या तंत्रांमध्ये व्यक्ती केवळ
श्वास किंवा एका मंत्रावर लक्ष केंद्रित करते, आणि अशा
अवस्थेत वेळेची संकल्पना विरघळते. न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून, ध्यानधारणेमुळे
प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा (Prefrontal Cortex) काहीसा
कार्यक्षमतेत बदल होतो आणि मस्तिष्क अधिक शांत होते (Tang
et al., 2015).
3. न्यूरोसायन्स आणि Transient
Hypofrontality Theory: वेळेच्या जाणिवेच्या या बदलासंबंधी
न्यूरोसायन्समध्ये Transient Hypofrontality (Dietrich, 2004) ही
संकल्पना मांडली गेली आहे. या संकल्पनेनुसार, जेव्हा व्यक्ती
पूर्णपणे एखाद्या आनंददायी किंवा तल्लीनतेच्या अनुभवात असते, तेव्हा
मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (Prefrontal Cortex) काही काळासाठी
कमी सक्रिय होतो.
प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा मेंदूचा तो
भाग आहे जो स्व-जाणीव (self-awareness), विचारमंथन (reflection)
आणि वेळेची
जाणीव यांसाठी जबाबदार आहे. जेव्हा हा भाग काहीसा निष्क्रिय होतो, तेव्हा
व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव अल्प प्रमाणात होते आणि ती
"टाइमलेसनेस" (timelessness) अनुभवते (Dietrich,
2004).
उदाहरणार्थ, खेळाडू (Athletes)
जेव्हा उच्च
पातळीवरील खेळात संपूर्णपणे गुंतलेले असतात, तेव्हा त्यांना
स्वतःचे शरीर, वेळ आणि भोवतालची जाणीव कमी होते, त्यामुळे
त्यांची कामगिरी अधिक उत्कृष्ट होते. हीच प्रक्रिया संगीतकार, नर्तक आणि
वैज्ञानिक यांच्यासाठीही लागू होते.
आनंद आणि वेळेच्या शून्यतेचा अनुभव
हा फ्लो, ध्यानधारणा आणि न्यूरोसायन्सच्या विविध सिद्धांतांमध्ये स्पष्ट केला
गेला आहे. याचा अर्थ असा की, आनंद म्हणजे फक्त एक भावनिक अनुभव
नसून तो संपूर्ण मेंदूच्या कार्यप्रणालीला प्रभावित करणारी अवस्था आहे. जेव्हा आपण
आनंदात पूर्णपणे रमतो, तेव्हा भूतकाळ आणि भविष्याचा विचार
संपतो आणि फक्त त्या क्षणाचे अस्तित्व राहते—आणि त्यामुळेच आनंद हा "शाश्वत
वर्तमान" (Eternal Present) अनुभवासारखा
वाटतो.
समारोप:
सुख, दुःख आणि आनंद या
संकल्पना आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक प्रकारे लागू होतात. उदाहरणार्थ, जर एखादी
व्यक्ती आपल्या कामात आनंद घेत असेल, तर तिला दिवस
कसा संपला हे समजत नाही. परंतु, जर एखादा विद्यार्थी परीक्षेच्या
खोलीत बसला असेल आणि पेपर कठीण जात असेल, तर तोच वेळ
त्याला खूप लांब वाटतो. याच कारणाने, मानसिक स्थिती
सुधारण्याकरिता "Mindfulness" आणि "Positive
Psychology" यांसारख्या पद्धतींचा उपयोग केला जातो, जेणेकरून
व्यक्ती आनंददायी जीवन जगू शकेल.
या तिन्ही भावनांच्या माध्यमातून
वेळेच्या अनुभूतीचे विविध पैलू उलगडले जातात. सुखात वेळ वेगाने निघून जातो कारण तो
आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो. दुःखात मात्र वेळ अधिक लांबट वाटतो कारण मेंदू
त्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. पण आनंद ही अशी अवस्था आहे जी सर्व मानसिक आणि
तात्त्विक मर्यादा ओलांडते आणि व्यक्तीला वेळेच्या पलीकडे घेऊन जाते. या
तत्त्वांचा विचार करून आपण अधिक आनंदी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
संदर्भ:
Andrews-Hanna,
J. R., Smallwood, J., & Spreng, R. N. (2014). The
Default Network and Self-Generated Thought: Component Processes, Dynamic
Control, and Clinical Relevance. Annals of the New York Academy of Sciences, 1316(1), 29-52.
Brickman,
P., & Campbell, D. T. (1971). Hedonic relativism and
planning the good society. Adaptation-level theory: A symposium, 287-302.
Csikszentmihalyi,
M. (1990). Flow: The psychology of optimal experience.
Harper & Row.
Dietrich,
A. (2004). "Transient Hypofrontality and the
Neurobiology of Optimal Performance". Consciousness and Cognition, 12(2), 231-256.
Droit-Volet,
S., & Meck, W. H. (2007). How emotions colour our
perception of time. Trends in Cognitive Sciences, 11(12), 504-513.
Eisenberger,
N. I., & Lieberman, M. D. (2004). Why Rejection Hurts:
A Common Neural Alarm System for Physical and Social Pain. Trends in Cognitive
Sciences, 8(7), 294-300.
Kahneman,
D., & Tversky, A. (1979). Prospect theory: An analysis
of decision under risk. Econometrica, 47(2), 263-291.
LeDoux,
J. (2000). Emotion Circuits in the Brain. Annual Review of
Neuroscience, 23(1), 155-184.
McEwen,
B. S. (1998). Protective and Damaging Effects of Stress
Mediators. New England Journal of Medicine, 338(3), 171-179.
Sapolsky,
R. M. (2004). Why Zebras Don't Get Ulcers: The Acclaimed
Guide to Stress, Stress-Related Diseases, and Coping. Henry Holt and Company.
Schultz,
W. (1998). Predictive reward signal of dopamine neurons.
Journal of Neurophysiology, 80(1), 1-27.
Tang,
Y. Y., Hölzel, B. K., & Posner, M. I. (2015). "The
Neuroscience of Mindfulness Meditation". Nature Reviews Neuroscience, 16(4), 213-225.
Wittmann,
M. (2009). The Inner Experience of Time. Philosophical
Transactions of the Royal Society B: Biological Sciences, 364(1525),
1955-1967.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions