शुक्रवार, ७ मार्च, २०२५

आंतरराष्ट्रीय महिला दिन: इतिहास आणि महत्त्व | International Women's Day

 

आंतरराष्ट्रीय महिला दिन: इतिहास आणि महत्त्व

एकदा राजू आणि त्याचे वडील आनंदराव गाडी चालवायला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर गेले होते. राजू नुकताच गाडी शिकलेला होता आणि त्याला वेगाची खूपच हौस होती. वडील वारंवार सूचना करत होते – "राजू, वेग जरा कमी कर! हायवेवर स्पीड लिमिट पाळली पाहिजे!"

पण उत्साही राजूने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. एका वळणावर त्याचा ताबा सुटला आणि गाडी जोरात दरीच्या कडेवर आदळली. मोठा आवाज झाला. धूर आणि चिखलाच्या ढगात सगळं हरवलं.

      गाडीच्या आघाडीच्या सीटवर असलेले आनंदराव जागीच संपले. पण राजू रक्ताच्या थारोळ्यात जिवंत होता. आजूबाजूच्या लोकांनी ताबडतोब मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. त्याच्या आईला आणि नातेवाईकांना कळवण्यात आले.

दवाखान्यात धावपळ सुरू होती. डॉक्टरांनी तत्काळ ऑपरेशनची तयारी केली. राजूला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरवर टाकण्यात आले. त्याचवेळी त्याच्या डॉक्टर पालकांना कळवण्यात आले. थोड्याच वेळात एक डॉक्टर आत धावत आले. त्यांचा चेहरा काळजीने भरलेला होता. त्यांनी पेशंटकडे पाहिलं आणि त्यांच्या तोंडून सहज उद्गार निघाले –

"हे तर माझं मुलं आहे!"

आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. कोणी काहीच समजू शकत नव्हतं.

"पण... डॉक्टर पालक कसे असू शकतात? वडील तर अपघातात गेले ना?"

क्षणभर शांतता पसरली. मग कुणीतरी हळूच म्हणालं –

"कारण ही डॉक्टर त्याची आई आहे."

सगळ्यांचे चेहरे बदलले. त्यांना वाटलं होतं की 'पालक' म्हटलं की फक्त वडीलच असतात! पण त्याची आई देखील डॉक्टर होती – आणि तिनेच आता आपल्या मुलाच्या जीवाची जबाबदारी घेतली होती.

लिंगभेदाच्या रूढीसमोर हा एक नवा आरसा होता. पालकत्व केवळ एका लिंगापुरतं मर्यादित नसतं. समाज अजूनही किती गोष्टी गृहीत धरतो, हे उघड झालं होतं.

राजूच्या आईने थरथरत्या हातांनी ऑपरेशन सुरू केलं. तिच्या प्रत्येक टाक्यात फक्त डॉक्टरची निपुणता नव्हती, तर एका आईचं प्रेम आणि जिद्द होती.

हा असा लिंगभेद होऊ नये, महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळवेत आणि  एकसारख्या कामासाठी महिलांना आणि पुरुषांना समान वेतन मिळावे. यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच लिंगसमभावासाठी सुरू असलेल्या चळवळींना पाठिंबा देण्यासाठी साजरा केला जातो (United Nations, 2024). महिला दिनाची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीस झाली, जेव्हा महिलांनी समान वेतन, चांगली कामकाजाची परिस्थिती आणि मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी लढा दिला. आजही, या दिवसाच्या निमित्ताने महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, आणि जनजागृती मोहीम राबविल्या जातात.

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 या वर्षी "अ‍ॅक्सिलरेट अ‍ॅक्शन" या थीम अंतर्गत जागतिक स्तरावर साजरा केला जाणार आहे. ही थीम लैंगिक समानता साध्य करण्यासाठी, प्रगतीच्या मंद गतीला संबोधित करण्यासाठी आणि जगभरातील महिला आणि मुलींना सक्षम करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो.

महिला दिनाचा सविस्तर इतिहास

सुरुवात (1908 - 1910): महिला दिनाच्या इतिहासाची सुरुवात 1908 मध्ये झाली. त्या वर्षी 15,000 महिला मजुरांनी न्यूयॉर्क शहरात निदर्शने केली. या महिलांनी वेतनवाढ, कामाच्या तासांमध्ये सुधारणा आणि मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष केला. औद्योगिक क्षेत्रातील महिलांना त्या काळात अत्यंत खडतर परिस्थितीत काम करावे लागत होते. त्यांच्या मेहनतीचा उचित मोबदला मिळत नव्हता आणि त्यांचे कार्यस्थळ सुरक्षित नव्हते. या पार्श्वभूमीवर महिलांनी संघटितपणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला (Kirk & Okazawa-Rey, 2004).

या आंदोलनाच्या परिणामस्वरूप, 1909 मध्ये अमेरिकेतील समाजवादी पक्षाने 28 फेब्रुवारी रोजी पहिला 'राष्ट्रीय महिला दिन' जाहीर केला. हा दिवस अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये साजरा करण्यात आला आणि महिलांच्या हक्कांसाठी जनजागृती करण्यात आली (Ghodsee, 2014).

यानंतर, 1910 मध्ये डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात 'महिला समाजवादी परिषद' आयोजित करण्यात आली. या परिषदेत जर्मन समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन (Clara Zetkin) यांनी महिलांचा संघर्ष जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' (International Women’s Day) साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या या प्रस्तावाला 17 देशांतील 100 हून अधिक महिला प्रतिनिधींनी पाठिंबा दिला (Stromquist, 1998). हा निर्णय जागतिक स्तरावर महिलांच्या हक्कांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरला.

पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजरा (1911): क्लारा झेटकिन यांच्या प्रस्तावानंतर 1911 मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय महिला दिन जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. 19 मार्च 1911 रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला हक्कांविषयी कार्यक्रम आणि मोर्चे आयोजित करण्यात आले. यामध्ये लाखो महिलांनी भाग घेतला आणि त्यांनी समान कामासाठी समान वेतन, कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि मतदानाचा हक्क यांसारख्या मागण्या मांडल्या (Evans, 1977).

1911 मध्ये झालेल्या या मोठ्या चळवळीमुळे आंतरराष्ट्रीय महिला दिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तथापि, याच वर्षी 25 मार्च रोजी न्यूयॉर्कमध्ये 'ट्रायँगल शर्टवेस्ट फॅक्टरी'ला आग लागून 146 महिला कामगारांचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रसंग महिला मजुरांच्या दयनीय स्थितीचे प्रतिक बनला आणि त्यानंतर महिला हक्कांसाठी अधिक तीव्र संघर्ष सुरू झाला (Von Drehle, 2003).

महिला दिनामुळे मोठा सामाजिक बदल: फेब्रुवारी 1917 मध्ये, रशियन महिलांनी 'अन्न आणि शांततेसाठी' मोठे आंदोलन सुरू केले. हा काळ पहिल्या महायुद्धाचा होता आणि युद्धामुळे अन्नटंचाई आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर वाढले होते. 23 फेब्रुवारी 1917 रोजी (ज्याला ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे 8 मार्च होता) रशियातील पेट्रोग्राड शहरात हजारो महिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्यांनी 'भाकरी आणि शांतता' (Bread and Peace) ही प्रमुख मागणी मांडली (Goldman, 1993).

हे आंदोलन इतके तीव्र झाले की, चार दिवसांतच रशियन सम्राट (झार) निकोलस दुसरा याने गादी सोडली आणि नवीन अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा हक्क बहाल केला. यामुळे महिला सशक्तीकरणाच्या इतिहासात मोठा टप्पा गाठला गेला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ सोव्हिएत युनियनने 1922 मध्ये 8 मार्चला अधिकृत सुट्टी जाहीर केली, आणि पुढे हा दिवस संपूर्ण युरोपमध्ये आणि इतर देशांमध्येही लोकप्रिय झाला (Holt, 1980).

संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) मान्यता (1975): दुसऱ्या महायुद्धानंतर महिलांच्या हक्कांसाठी विविध देशांमध्ये अनेक संस्था आणि चळवळी सक्रिय झाल्या. 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून घोषित केले. त्याच वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) 8 मार्चला अधिकृतपणे 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून मान्यता दिली. हा निर्णय महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांच्या दीर्घकालीन प्रयत्नांचे फलित होता (United Nations, 1975).

यानंतर 1977 मध्ये UN ने सर्व देशांना 8 मार्च हा दिवस अधिकृतरित्या साजरा करण्याचे आवाहन केले. या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अधिकारांची जाणीव करून देणे आणि समानतेसाठी प्रयत्न करणे (True, 2013). आज जगभरात हा दिवस विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांद्वारे साजरा केला जातो.

महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महत्त्वाच्या स्त्रिया

इतिहासात महिलांच्या हक्कांसाठी अनेक नेत्यांनी संघर्ष केला आहे. त्यांनी समाजसुधारणा, राजकीय हक्क, शिक्षण आणि कामगार चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संदर्भात खालील स्त्रिया विशेष महत्त्वाच्या आहेत.

1. क्लारा झेटकिन (Clara Zetkin)आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना मांडणारी समाजवादी नेत्या

क्लारा झेटकिन (1857–1933) या जर्मनीतील समाजवादी विचारवंत, स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि पत्रकार होत्या. त्या महिला मजूर चळवळींमध्ये सक्रिय होत्या आणि त्यांनी महिलांच्या समान हक्कांसाठी जगभर लढा दिला. 1910 मध्ये कोपनहेगन (डेन्मार्क) येथे झालेल्या सोशलिस्ट इंटरनॅशनलच्या दुसऱ्या महिला परिषदे दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली (Zetkin, 1910).

क्लारा झेटकिन यांनी स्त्रियांनी केवळ मताधिकार मिळवण्यावर भर न देता व्यापक सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी संघर्ष करावा, असा विचार मांडला. त्यांनी स्त्रिया आणि कामगार वर्गाच्या शोषणाविरोधात अनेक लेख लिहिले आणि "Die Gleichheit" (समानता) या जर्मन समाजवादी नियतकालिकाचे संपादन केले. त्यांचे कार्य फक्त महिला सशक्तीकरणापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी फॅसिझमविरोधातही संघर्ष केला.

2. सुसान बी. अँथनी (Susan B. Anthony) – अमेरिकन महिलांच्या मतदान हक्कासाठी लढणारी प्रमुख नेत्या

सुसान बी. अँथनी (1820–1906) या अमेरिकेतील स्त्रीवादी कार्यकर्त्या होत्या. त्या अमेरिकेतील महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रमुख नेत्या होत्या. त्यांनी एलिझाबेथ कॅडी स्टॅंटन यांच्यासोबत मिळून National Woman Suffrage Association (NWSA) ची स्थापना केली (Anthony & Stanton, 1869).

त्यांनी मतदानाचा हक्क नसताना 1872 साली राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांना अटक झाली आणि न्यायालयात शिक्षा झाली. त्यांच्या अथक संघर्षानंतर 1920 मध्ये अमेरिकेत 19वी घटना दुरुस्ती (19th Amendment) झाली आणि महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. "The Revolution" नावाच्या पत्रकाद्वारे महिलांच्या हक्कांसाठी प्रचार आणि प्रसार केला.

3. एम्मेलिन पॅंकरस्ट (Emmeline Pankhurst) – ब्रिटनमध्ये "सफ्रॅजेट" चळवळीच्या नेत्या

एम्मेलिन पॅंकरस्ट (1858–1928) या ब्रिटनमधील स्त्रियांच्या मताधिकार चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. त्यांनी 1903 मध्ये "Women's Social and Political Union" (WSPU) ची स्थापना केली (Pankhurst, 1903). त्यांच्या चळवळीतील महिलांना "सफ्रॅजेट्स" (Suffragettes) म्हटले जात असे.

पॅंकरस्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अहिंसक मार्ग सोडून अधिक तीव्र आंदोलन सुरू केले. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी निदर्शने केली, सरकारी इमारतींवर दगडफेक केली आणि अनेक वेळा तुरुंगवास भोगला. ब्रिटिश संसदेत महिलांच्या मताधिकारासाठी कायदा मंजूर होण्यासाठी दबाव आणला. शेवटी 1918 मध्ये ब्रिटिश महिलांना मर्यादित मतदानाचा हक्क मिळाला, तर 1928 मध्ये पूर्ण मतदानाचा अधिकार मिळाला

4. सावित्रीबाई फुले – भारतातील पहिल्या शिक्षिका, ज्या मुलींच्या शिक्षणासाठी लढल्या

सावित्रीबाई फुले (1831–1897) या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी पहिली मुलींची शाळा (1848) पुण्यात सुरू केली. त्या बालविवाह, अस्पृश्यता, विधवांचे शोषण आणि महिलांच्या शिक्षणाच्या अभावाविरोधात लढल्या (Gokhale, S. D. (1993)).

त्यांनी स्त्री-शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी कविता आणि लेखन केले. त्यांनी विधवांसाठी बालहत्याविरोधी गृह सुरू केले आणि सतीप्रथेविरोधात लढा दिला. त्यांनी शेवटपर्यंत महिलांना सामाजिक आणि शैक्षणिक अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांचे कार्य भारतातील स्त्री-सशक्तीकरणाच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जाते.

5. रोजा लक्झेम्बुर्ग (Rosa Luxemburg) – महिलांच्या हक्कांसाठी आणि समाजवादी चळवळींसाठी काम करणारी क्रांतिकारी नेत्या

रोजा लक्झेम्बुर्ग (1871–1919) या पोलंड-जर्मनीतील क्रांतिकारी समाजवादी नेत्या आणि स्त्रीवादी विचारवंत होत्या. त्या स्त्रियांवरील भांडवलशाहीच्या शोषणाविरोधात लढल्या आणि समाजवादी विचारसरणीचा प्रचार केला. त्या जर्मनीतील "स्पार्टाकिस्ट लीग" (Spartacist League) च्या सहसंस्थापक होत्या. स्पार्टाकिस्ट लीग म्हणजे 1914 शेवटी पासून 1918 च्या अखेरपर्यंत जर्मनीमध्ये सक्रिय असलेला क्रांतिकारी समाजवादी गट. त्यांनी प्रथम महायुद्धाला विरोध केला आणि शोषित वर्गासाठी क्रांती करण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांमुळे त्यांची जर्मनीत 1919 मध्ये हत्या करण्यात आली.

या सर्व स्त्रिया आपल्या कार्याने महिला सशक्तीकरणाच्या जागतिक लढ्यात महत्त्वाच्या ठरल्या. त्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानतेसाठी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या योगदानामुळेच आज जगभरातील महिलांना अधिकाधिक हक्क मिळू शकले.

"स्त्री सशक्तीकरण ही फक्त कल्पना नाही, तर तो एका मोठ्या चळवळीचा भाग आहे!"

महिला दिन: आजची प्रासंगिकता

आजही जगभरातील अनेक ठिकाणी महिलांना समानता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्तरांवर महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. जागतिक स्तरावर पाहता, लिंगभेद (Gender Discrimination), समान वेतन (Equal Pay), सुरक्षितता (Safety), शिक्षण (Education), आणि आरोग्यसेवा (Healthcare) यासारख्या मुद्द्यांवर अजूनही मोठ्या प्रमाणावर आवाज उठवावे लागते. संयुक्त राष्ट्रसंघ (UN) आणि विविध आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक संस्था महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत आहेत.

1. लिंगभेद आणि समानता: महिलांना अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये समान संधी मिळत नाहीत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार (UN Women, 2023), महिलांना पुरुषांच्या तुलनेत 20% कमी वेतन दिले जाते, विशेषतः असंघटित क्षेत्रामध्ये. महिलांना उच्च पदांवर संधी मिळण्याच्या संख्येतही तफावत आहे. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट (World Economic Forum, 2023) नुसार, जगभरातील अनेक देशांमध्ये महिलांना सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर अजूनही समान हक्क मिळालेले नाहीत.

2. समान वेतनाचा प्रश्न: समान कार्यासाठी समान वेतन ही संकल्पना अजूनही संपूर्णतः अमलात आलेली नाही. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार (2023), महिला सरासरी पुरुषांच्या तुलनेत 82 सेंट कमावतात, म्हणजेच प्रत्येक डॉलरच्या तुलनेत महिलांना कमी वेतन मिळते. हा फरक उच्च शिक्षण, व्यवसाय आणि विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक जाणवतो. भारतातही हा प्रश्न गंभीर आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी समान वेतन महत्त्वाचे आहे.

3. महिलांची सुरक्षितता आणि हिंसाचार: महिला अजूनही अनेक ठिकाणी असुरक्षित आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, 2022 मध्ये जवळपास 35% महिलांनी त्यांच्या जीवनकाळात कधी ना कधी लैंगिक हिंसाचार किंवा कौटुंबिक हिंसाचाराचा अनुभव घेतलेला आहे. भारतात निर्भया प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे लागू करण्यात आले असले, तरी महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण अजूनही चिंताजनक आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB, 2023) अहवालानुसार, महिलांविरुद्ध गुन्ह्यांचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे (पुण्यातील स्वारगेट स्टेशन वरील अत्याचार). सुरक्षित आणि निर्भय समाज निर्मितीसाठी महिला दिनाच्या निमित्ताने व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे.

4. शिक्षण आणि महिला सशक्तीकरण: महिलांच्या शिक्षणाचा स्तर वाढवणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे. सावित्रीबाई फुले यांचे योगदान या क्षेत्रात उल्लेखनीय आहे. युनिसेफच्या (UNICEF, 2023) अहवालानुसार, प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर मुलींची उपस्थिती वाढली असली, तरी उच्च शिक्षण आणि व्यवसायिक शिक्षणाच्या संधी कमी आहेत. महिला उच्च शिक्षणाकडे वळतील, तर त्यांना स्वतंत्र आणि सक्षम बनता येईल.

5. महिलांचे आरोग्य आणि सुलभ सेवा: महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, विशेषतः मातृत्व आरोग्य (Maternal Health), कुपोषण, आणि मानसिक आरोग्य, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जागतिक बँकेच्या (World Bank, 2023) अहवालानुसार, भारतासह अनेक विकसनशील देशांमध्ये अजूनही ग्रामीण भागातील महिलांना आरोग्यसेवांसाठी संघर्ष करावा लागतो. योग्य वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि मासिक पाळीसंदर्भातील शिक्षण या क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहे.

महिला दिन साजरा करण्याचे मार्ग

1. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता वाढवणे: महिला दिनाच्या निमित्ताने विविध चर्चासत्रे, कार्यशाळा आणि प्रचार माध्यमांच्या साहाय्याने लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'HeForShe' अभियानासारखे, पुरुषांनीही महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे गरजेचे आहे.

2. महिलांचे योगदान ओळखून त्यांचा सन्मान करणे: संशोधन, कला, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत महिलांचे योगदान मोठे आहे. मैरी क्युरी, कल्पना चावला, इंदिरा गांधी, किरण बेदी यांसारख्या महिलांनी विविध क्षेत्रात उत्कृष्टता मिळवली आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महिलांना पुरस्कृत करणे आवश्यक आहे.

3. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे: महिलांना उच्च शिक्षण आणि उत्तम रोजगार मिळावा यासाठी सरकारने आणि खासगी संस्थांनी विशेष धोरणे राबवावीत. UNESCO (2023) च्या अहवालानुसार, डिजिटल तंत्रज्ञानातील कौशल्ये आत्मसात केल्याने महिलांना अधिक चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात.

4. महिलांसाठी सुरक्षित आणि समान वातावरण तयार करणे: कौटुंबिक, सामाजिक आणि व्यवसायिक स्तरांवर महिलांना सुरक्षितता आणि समानता मिळावी यासाठी कायदेशीर आणि सामाजिक सुधारणांची आवश्यकता आहे. ICRW (International Center for Research on Women, 2023) च्या अहवालानुसार, महिलांसाठी अनुकूल धोरणे राबवल्यास जागतिक GDP मध्ये 28 ट्रिलियन डॉलर्सची भर पडू शकते.

समारोप:

महिला दिन हा केवळ उत्सव नसून, तो महिलांच्या संघर्षाची आठवण करून देणारा आणि सामाजिक बदल घडवणारा महत्त्वाचा दिवस आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकार, समाज आणि व्यक्तीगत स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्त्री शिक्षित झाली की संपूर्ण कुटुंब सक्षम होते, ही संकल्पना लक्षात घेऊन महिलांना समान संधी देणे गरजेचे आहे. महिला दिन हा महिला आणि पुरुष दोघांनी एकत्र येऊन साजरा करावा आणि समानतेसाठी योगदान द्यावे, हीच खरी समाज प्रगतीची निशाणी आहे.

कधी कोवळी, कधी कणखर, कधी सागराची लाट,

कधी प्रेमळ, कधी कठोर, कधी शांत, कधी अवखळ वाट.


कधी कन्या, कधी माता, मायेच्या प्रेमाचा झरा,

कधी पत्नी, कधी भगिनी, घराचा आधार खरा.


गृहिणी बनून सांभाळते ती, घर-संसाराचा गंध मनी,

शिक्षिका बनून जागविते नव्या जगाची स्वप्ने ध्यानी.


कधी शेतकरी, कधी वैद्य, कधी न्यायासाठी लढणारी,

कधी शिपाई, कधी उद्योजिका, स्वतःच नशीब घडवणारी.


संघर्ष तिच्या सोबती, तरीही ती हसतच जगते,

स्नेह, करुणा, आणि धैर्याने आयुष्यभर ती झटते.


तिला नको उपमा, नको उपदेश, तिच्या सामर्थ्यास नवा सूर,

तीच सृजन, तीच शक्ती, तीच विश्वाचा नवा नूर!


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Anthony, S. B., & Stanton, E. C. (1869). The Revolution (Vol. 1). National Woman Suffrage Association.

Evans, R. (1977). The Feminists: Women's Emancipation Movements in Europe, America, and Australasia, 1840-1920. Routledge.

Ghodsee, K. (2014). Red Hangover: Legacies of Twentieth-Century Communism. Duke University Press.

Gokhale, S. D. (1993). Savitribai Phule and Her Contribution to Women's Education in India. Indian Journal of Social Work, 54(2), 247-258.

Goldman, W. (1993). Women, the State and Revolution: Soviet Family Policy and Social Life, 1917-1936. Cambridge University Press.

Holt, A. (1980). Women in Soviet Russia. Yale University Press.

International Centre for Research on Women. (2023). Women in the global economy: Trends and impacts. ICRW.

Kirk, G., & Okazawa-Rey, M. (2004). Women's Lives: Multicultural Perspectives. McGraw-Hill.

Luxemburg, R. (1913). The Accumulation of Capital. Berlin: Frankes Verlag.

Pankhurst, E. (1903). My Own Story. London: Eveleigh Nash.

Stromquist, N. (1998). Women in the Third World: An Encyclopedia of Contemporary Issues. Garland Publishing.

True, J. (2013). The Political Economy of Violence Against Women. Oxford University Press.

UN Women. (2023). Progress on the sustainable development goals: The gender snapshot 2023. United Nations.

United Nations Educational, Scientific and Cultural Organization. (2023). Women and digital skills: Bridging the gap for inclusive growth. UNESCO.

United Nations. (1975). International Women's Year: Equality, Development and Peace.

United Nations. (2024). International Women's Day. Retrieved from https://www.un.org/en/observances/womens-day

Von Drehle, D. (2003). Triangle: The Fire That Changed America. Grove Press.

World Bank. (2023). Maternal health and gender equality: Progress and challenges. World Bank Group.

World Economic Forum. (2023). Global gender gap report 2023. https://www.weforum.org

World Health Organization. (2022). Violence against women prevalence estimates, 2018. WHO.

Zetkin, C. (1910). Speech at the Second International Socialist Women’s Congress. Copenhagen, Denmark.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल | Holistic Teacher Appraisal Norms

  उच्च शिक्षणातील शैक्षणिक कामगिरी मूल्यमापनातील महत्त्वपूर्ण बदल भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांचे मूल्यमापन हा शिक्षण गुणवत्ता ...