"समाज माध्यम वर्तन म्हणजे काय
रे भाऊ?
सध्याच्या डिजिटल युगात समाज माध्यमे
(सोशल मीडिया) ही केवळ संवादाचे साधन राहिली नसून, ती व्यक्तीच्या
वर्तनाचा, मानसिकतेचा आणि सामाजिक परस्परसंबंधांचा महत्त्वाचा भाग बनली आहेत.
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि
व्हॉट्सअॅप यांसारख्या प्लॅटफॉर्मवर व्यक्ती आपल्या विचारांचे, भावनांचे आणि
ओळखीचे प्रदर्शन करतात. या आभासी जगात संवादाची नवी परिभाषा निर्माण झाली असून, त्याचा प्रभाव
वैयक्तिक ओळख, सामाजिक नातेसंबंध आणि मानसिक आरोग्यावर पडत
आहे.
समाज माध्यम वर्तन म्हणजे काय?
समाज
माध्यम वर्तन म्हणजे एखाद्या व्यक्तीचे सोशल मीडियावर (उदा. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब,
व्हॉट्सअॅप इत्यादी) केलेले आचार-विचार, संवाद
आणि सहभाग. हे वर्तन वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक
स्वरूपाचे असू शकते. समाज माध्यम वर्तनामध्ये माहिती शेअर करणे, प्रतिक्रिया देणे, संवाद साधणे, ट्रेंड्समध्ये सहभागी होणे आणि इतरांच्या पोस्टवर आपले मत आणि अभिप्राय
दर्शवणे यांचा समावेश होतो.
अ. वैयक्तिक घटक:
वैयक्तिक घटकामध्ये स्वतःची ओळख, स्वतःची
प्रतिमा आणि भावनिक स्थिती यांचा समावेश होतो. स्वतःची ओळख म्हणजे समाज माध्यमांवर
लोक स्वतःला कसे सादर करतात, यावर त्यांच्या वर्तनाचा प्रभाव
पडतो. स्वतःची प्रतिमा म्हणजे सामाजिक स्वीकृती मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारच्या
पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करतात. आनंदी, उदास, संतप्त किंवा
निराश अशा भावनिक स्थितीमध्ये व्यक्तींचे समाज माध्यम वर्तन वेगवेगळे असते.
1. स्वतःची ओळख (Self-identity): स्वतःची ओळख
म्हणजे व्यक्ती स्वतःला कसे पाहते आणि इतरांना स्वतःबद्दल काय दाखवते याचे मिश्रण.
समाज माध्यमांवर ही ओळख वैयक्तिक, व्यावसायिक
किंवा सामाजिक घटकांवर आधारित असते. लोक आपली ओळख जाणीवपूर्वक घडवतात आणि ती
वेळोवेळी बदलतही असतात (Goffman, 1959).
सोशल मीडिया वापरताना लोक एक विशिष्ट
प्रतिमा तयार करतात. उदाहरणार्थ, प्रोफेशनल प्लॅटफॉर्म LinkedIn
वर लोक आपली
व्यावसायिक ओळख जपतात, तर Instagram आणि Facebook
यासारख्या
प्लॅटफॉर्मवर अधिक वैयक्तिक आणि कलात्मक ओळख दर्शवली जाते (Papacharissi,
2011). काहीजण
आपली ओळख वास्तवाशी जुळणारी ठेवतात, तर काहीजण
आपल्या कल्पनाशक्तीने ती घडवतात, तेव्हा ते स्वतःला जाणीवपूर्वक अधिक
सकारात्मक, प्रभावी किंवा आकर्षक स्वरूपात सादर करतात.
समाज माध्यमांवरील स्वतःची ओळख साकारण्याच्या प्रक्रियेत लोक आपली नैसर्गिकता गमावू शकतात. समाज माध्यमांवर लोक आपल्या जीवनाच्या केवळ आकर्षक पैलूंनाच प्राधान्य देतात, त्यामुळे
त्यांच्या वास्तविक आणि ऑनलाइन ओळखीत फरक निर्माण होतो (Turkle,
2011). अशा
परिस्थितीत, जर ऑनलाइन ओळख आणि वास्तविक जीवनातील
व्यक्तिमत्त्व यामध्ये मोठी तफावत असेल, तर
व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ शकतो आणि त्याचा मानसिक आरोग्यावर
परिणाम होतो.
2. स्वतःची प्रतिमा (Self-image): स्वतःची प्रतिमा म्हणजे व्यक्तीला स्वतःबद्दल असलेली कल्पना आणि इतर
कसे पाहतात याचा प्रभाव. समाज माध्यमांवर लोक इतरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर
(लाईक्स, कमेंट्स, शेअर्स) आपल्या प्रतिमेचे मूल्यमापन
करतात (Meier & Gray, 2014).
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व्यक्तींना
स्वतःची प्रतिमा घडवण्यासाठी विविध संधी देतात. उदाहरणार्थ,
Instagram वर लोक आकर्षक फोटो आणि संपादित केलेले व्हिडिओ शेअर करतात, तर Shorts, TikTok वर व्यक्तिमत्व अधिक क्रिएटिव्ह आणि
एंटरटेनिंग स्वरूपात मांडले जाते. बरेच लोक समाज माध्यमांवर आपली विशिष्ट जीवनशैली, सौंदर्य आणि
यशाचे प्रदर्शन करतात. हे नेहमीच वास्तवाशी जुळणारे नसते, परंतु लोकांना
समाजातील विशिष्ट प्रतिमा जपण्यासाठी दबाव जाणवतो (Perloff, 2014).
समाज माध्यमांवर फॉलोअर्सचा वाढता प्रभाव लोकांना त्यांच्या प्रतिमेबद्दल अधिक सजग बनवतो. जर एखाद्या व्यक्तीला समाज माध्यमांवर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसेल, तर
आत्म-सन्मानावर परिणाम होऊ शकतो आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. याशिवाय, शरीरसौष्ठवाबाबत
अवास्तव कल्पना निर्माण होऊन बॉडी डिसमॉर्फिया (Body Dysmorphic
Disorder) किंवा चिंता वाढू शकते (Fardouly et
al., 2015).
3. भावनिक स्थिती (Emotional
state): भावनिक स्थिती म्हणजे व्यक्तीच्या सध्याच्या
मनःस्थितीचा समाज माध्यम वापरावर होणारा प्रभाव. सोशल मीडिया लोकांच्या भावनिक
स्थितीवर थेट प्रभाव टाकते. आनंदी असलेल्या व्यक्ती प्रेरणादायी आणि सकारात्मक
पोस्ट शेअर करतात, तर उदास, निराश किंवा
क्रोधित असलेल्या व्यक्ती समाज माध्यमांवर नकारात्मक किंवा आक्रमक प्रतिक्रिया देऊ
शकतात (Kross et al., 2013).
अनेक वेळा सोशल मीडिया व्यक्तीच्या
भावनांना उत्तेजित करते. उदाहरणार्थ, सततच्या सूचना
(notifications), प्रतिक्रिया (comments), किंवा व्हायरल
कंटेंटमुळे (trending posts) व्यक्तीचे मानसिक आरोग्य प्रभावित
होऊ शकते. संशोधनातून असे दिसून आले आहे की नकारात्मक बातम्या, ट्रोलिंग किंवा
ऑनलाइन विवाद (cyber conflicts) लोकांच्या भावनांवर मोठा प्रभाव
टाकतात (Verduyn et al., 2017).
समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर
केल्यास लोकांना सामाजिक आधार मिळू शकतो. प्रेरणादायक पोस्ट, ऑनलाइन
समुदायांतील समर्थन, आणि माहितीची देवाणघेवाण मानसिक
स्वास्थ्य सुधारू शकते. पण समाज माध्यमांचा अति वापर केल्यास चिंता (anxiety),
नैराश्य (frustration),
आणि एकाकीपण (loneliness)
वाढू शकते.
संशोधनानुसार, सोशल मीडियाचा सातत्याने वापर करणाऱ्या
लोकांमध्ये तुलनेने अधिक नैराश्याचे लक्षणे दिसून येतात (Twenge
et al., 2018).
वैयक्तिक घटक समाज माध्यम वर्तनावर
मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. स्वतःची ओळख, प्रतिमा आणि
भावनिक स्थिती समाज माध्यमांवरील वर्तन निश्चित करतात. समाज माध्यमांवरील
लोकांच्या ओळखी आणि प्रतिमा नेहमी वास्तवाशी जुळत नाहीत, त्यामुळे काही
वेळा सामाजिक दबाव आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. भावनिक स्थितीचा सोशल मीडिया
वापरावर परिणाम होतो आणि काही वेळा सोशल मीडिया नकारात्मक भावना अधिक तीव्र करू
शकते. त्यामुळे समाज माध्यमांचा समतोल आणि जबाबदारीने वापर करणे अत्यंत महत्त्वाचे
आहे.
ब. सामाजिक घटक
समाज माध्यमांवर व्यक्तीचे वर्तन हे
सामाजिक घटकांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या
अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीचे ऑनलाईन वर्तन त्याच्या
सामाजिक संबंधांमुळे बदलू शकते (Bandura, 1986). समाज माध्यमांवर लोक अनेकदा
आपल्या मित्रपरिवाराशी, कुटुंबीयांशी आणि विविध ऑनलाईन
समुदायांशी संवाद साधतात. यामध्ये समूहांचा प्रभाव, सामाजिक तुलना
आणि प्रस्थापित सामाजिक नियम हे महत्त्वाचे घटक आहेत, जे व्यक्तीच्या
वर्तनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करू शकतात.
1. समूहांचा प्रभाव (Peer
Influence): समूहांचा प्रभाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वर्तन
त्याच्या मित्रमंडळींनी किंवा एखाद्या विशिष्ट गटाने ठरवलेल्या मानकांनुसार बदलणे.
समाज माध्यमांवर हा प्रभाव अधिक तीव्र होतो, कारण लोक
आपल्या पोस्ट्सला मिळणाऱ्या लाईक्स, शेअर्स आणि
कमेंट्सच्या आधारे आपले वर्तन ठरवतात (Prinstein &
Dodge, 2008).
उदाहरणार्थ, किशोरवयीन मुलं
त्यांच्या मित्रांनी कोणते ब्रँड वापरतात, कोणत्या
ट्रेंड्समध्ये सहभागी होतात आणि कोणत्या प्रकारच्या पोस्ट्स अपलोड करतात, याचा मोठा
प्रभाव त्यांच्यावर पडतो. संशोधनानुसार, जर एखाद्या
गटातील व्यक्ती आरोग्यदायी सवयींचा अवलंब करत असेल, तर त्या गटातील
इतर सदस्यही तशाच सवयी आत्मसात करतात (Christakis
& Fowler, 2007). त्याचप्रमाणे, जर एखाद्या गटात अनावश्यक खर्च, फॅशन ट्रेंड
किंवा अप्रामाणिक वर्तनाचा प्रभाव वाढला तर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो.
समूहातील व्यक्ती एकमेकांना शैक्षणिक, व्यावसायिक
किंवा वैयक्तिक प्रगतीसाठी प्रेरित करतात. पण अवास्तव ट्रेंड्सचा अंधानुकरण
केल्याने व्यक्तीवर मानसिक तणाव आणि अनावश्यक सामाजिक दबाव वाढतो.
2. सामाजिक तुलना (Social
Comparison): सामाजिक तुलना ही मानवी स्वभावाचा एक अविभाज्य
भाग आहे. Festinger (1954) यांनी मांडलेल्या Social
Comparison Theory नुसार, लोक आपली क्षमता, यश आणि सामाजिक
स्थान समजून घेण्यासाठी इतरांशी स्वतःची तुलना करतात. समाज माध्यमांवर ही तुलना
अधिक तीव्र होते, कारण लोक मुख्यतः आपले यशस्वी आणि
आकर्षक क्षणच शेअर करतात, ज्यामुळे पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये
असंतोषाची भावना निर्माण होऊ शकते.
उदाहरणार्थ, अनेक लोक
इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर इतरांच्या यशस्वी जीवनशैलीचे फोटो पाहून आपल्या
आयुष्यात कमतरता असल्याचे समजून नैराश्यात जातात (Chou &
Edge, 2012).
दुसरीकडे, काही लोक अशा तुलनेतून प्रेरित होऊन अधिक मेहनत करण्याचा निर्णय
घेतात.
जर तुलना प्रेरणादायी असेल, तर ती
व्यक्तीच्या उद्दिष्टपूर्तीस मदत करू शकते. पण अतीशय उच्च अपेक्षांमुळे
आत्म-संतोषाची कमतरता भासू शकते, आणि आत्मसन्मान कमी होऊ शकतो.
3. सोशल नॉर्म्स (Social
Norms): सोशल नॉर्म्स म्हणजे समाज माध्यमांवर प्रचलित
असलेले संकेत आणि नियम, जे ठरवतात की काय स्वीकारार्ह आहे
आणि काय नाही. हे नॉर्म्स ऑनलाईन समुदाय, ट्रेंड्स आणि
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या धोरणांमधून ठरतात (Cialdini, Reno,
& Kallgren, 1990).
उदाहरणार्थ, समाज
माध्यमांवर नैतिकतेशी संबंधित अनेक गोष्टींचे पालन केले जाते, जसे की संवेदनशील
विषयांवर संयम बाळगणे, कुणालाही ऑनलाईन ट्रोल न करणे, योग्य भाषा
वापरणे इत्यादी. तथापि, काहीवेळा सोशल नॉर्म्स चुकीच्या
दिशेनेही जातात, उदा. ट्रेंडमध्ये राहण्यासाठी अयोग्य किंवा
असत्य माहिती पसरवणे, किंवा विशिष्ट राजकीय/सांस्कृतिक
गटांचा दबाव अनुभवणे.
याचा सकारात्मक परिणाम म्हणून लोक
जबाबदारीने समाज माध्यमांचा वापर करतात, योग्य माहिती
शेअर करतात आणि सकारात्मक संवाद साधतात. पण सोशल नॉर्म्समुळे व्यक्तींना स्वतःला
कृत्रिमरीत्या बदलावे लागते, जे मानसिक तणाव निर्माण करू शकते.
समाज माध्यमांवरील वर्तनाला सामाजिक
घटक मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतात. समूहांचा प्रभाव, सामाजिक तुलना
आणि सोशल नॉर्म्स या तीन गोष्टी व्यक्तीच्या ऑनलाईन अनुभवावर प्रभाव टाकतात. जर
समाज माध्यमांचा वापर जाणीवपूर्वक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून केला तर त्याचा
व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीस मदत होऊ शकते. परंतु, त्याचाच अतिरेक
झाला किंवा चुकीच्या दिशेने वळला, तर मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम
होऊ शकतो. त्यामुळे, सोशल मीडियाचा वापर करताना
विवेकबुद्धी वापरणे आणि संतुलित दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.
क. तंत्रज्ञानाशी संबंधित घटक
समाज माध्यमांचा प्रभाव लोकांच्या
वर्तनावर मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाशी संबंधित घटकांवर अवलंबून असतो. अल्गोरिदम
आणि शिफारसी प्रणाली, गोपनीयता आणि सुरक्षितता तसेच वेळेचे
व्यवस्थापन या तिन्ही घटकांचा समाज माध्यम वर्तनावर मोठा प्रभाव पडतो.
1. अल्गोरिदम आणि शिफारसी (Algorithms
& Recommendations): समाज माध्यम प्लॅटफॉर्मवरील (Facebook,
Instagram, Twitter, YouTube) वापरकर्त्यांच्या वर्तनानुसार त्यांना विशिष्ट
प्रकारची सामग्री दर्शविण्यासाठी अल्गोरिदम विकसित केले जातात. यामध्ये मशीन
लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा मोठ्या
प्रमाणात वापर केला जातो (Zhou et al., 2020). उदाहरणार्थ, यूट्यूबवरील
"Recommended for you" विभागात वापरकर्त्याने पूर्वी पाहिलेल्या
व्हिडिओंवर आधारित नवीन व्हिडिओ सुचवले जातात.
अल्गोरिदमचा परिणाम असा होतो की
वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीच्या किंवा पूर्वी पाहिलेल्या विषयाशी संबंधितच
माहिती सतत मिळत राहते, ज्यामुळे फिल्टर बबल (Filter
Bubble) तयार होतो (Pariser, 2011). याचा अर्थ वापरकर्त्यांना
त्यांच्या मतांशी किंवा विश्वासाशी विसंगत असलेली माहिती पाहायला मिळत नाही, त्यामुळे
त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पडतो. तसेच, सोशल
मीडियावरील व्यसन वाढवण्यासाठीही हे अल्गोरिदम कार्य करतात. उदाहरणार्थ,
TikTok आणि Instagram Reels सारख्या प्रणाली
वापरकर्त्याच्या वर्तनावरून सामग्री सादर करतात, ज्यामुळे लोक
अधिक वेळ खर्च करतात आणि माहितीचा ओव्हरलोड होतो (Montag et al., 2019).
याचा परिणाम म्हणून वापरकर्त्यांवर
विशिष्ट विचारधारा किंवा माहिती लादली जाऊ शकते. वेळेचा अपव्यय होतो, कारण अल्गोरिदम
लोकांना सतत स्क्रीनसमोर ठेवण्यासाठी तयार केले जातात यातून ब्रेन रॉट (Word of the year, 2024) सारख्या सवयी
जडतात. चुकीची माहिती किंवा पूर्वग्रहदूषित माहिती पसरण्याचा धोका वाढतो (Cinelli
et al., 2021).
2. गोपनीयता आणि सुरक्षितता (Privacy
& Security): ऑनलाइन डेटाचे संरक्षण आणि गोपनीयता हा समाज
माध्यम वर्तनातील महत्त्वाचा घटक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांकडून
वैयक्तिक माहिती गोळा करतात आणि ती जाहिरातदारांना विकतात (Zuboff,
2019). डेटा
ब्रिचेस (Data Breaches) आणि सायबर हॅकिंग सारख्या घटनांमुळे
वापरकर्त्यांची माहिती असुरक्षित होते.
फेसबुक-केंब्रिज अॅनालिटिका डेटा
स्कॅंडल (2018) हे याचे एक प्रमुख उदाहरण आहे, ज्यामध्ये
कोट्यवधी वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती राजकीय प्रचारासाठी वापरण्यात आली होती (Isaak
& Hanna, 2018). याशिवाय, फिशिंग अटॅक्स (Phishing
Attacks), आयडेंटिटी थेफ्ट (Identity Theft) आणि डेटा लीक
यांसारख्या घटनांमुळे समाज माध्यम वापरकर्त्यांना आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ
शकते.
याचा परिणाम म्हणजे वैयक्तिक
माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, ज्यामुळे विश्वास आणि सुरक्षितता
धोक्यात येते. गोपनीयतेच्या अभावामुळे लोक सोशल मीडियावर अति पारदर्शक किंवा अति
सुरक्षित वर्तन करतात. सोशल मीडियावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना (उदा. टू-फॅक्टर
ऑथेंटिकेशन) न वापरल्यास डेटा चोरीचा धोका वाढतो.
3. वेळेचे व्यवस्थापन (Time
Management): समाज माध्यमांचा सतत वापर हा वेळेच्या
व्यवस्थापनावर गंभीर परिणाम करणारा घटक आहे. Deloitte’s
Global Mobile Consumer Survey (2018) नुसार, सरासरी
वापरकर्ता दिवसाला 2-3 तास सोशल मीडियावर घालवतो, तर काही
प्रकरणांमध्ये हे प्रमाण 6-7 तासांपर्यंत पोहोचते.
वेळेच्या व्यवस्थापनाचा अभाव हा
"डिजिटल डिस्ट्रॅक्शन (Digital Distraction)" आणि "कामात
चालढकल, कुचराई (Procrastination)" यास कारणीभूत
ठरतो (Johansson et al., 2021). उदाहरणार्थ, काम करत असताना
किंवा अभ्यास करत असताना सतत Instagram, WhatsApp किंवा YouTube
चेक करणे ही आजकाल
सामान्य सवय झाली आहे. यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि एकाग्रतेची पातळी कमी
होते (Duke & Montag, 2017).
याचा परिणाम म्हणून कामाच्या किंवा
अभ्यासाच्या वेळेचा अपव्यय होतो, परिणामी उत्पादकता कमी होते. सतत
सोशल मीडिया तपासण्याच्या सवयीमुळे व्यसन (Addiction) वाढते. "डिजिटल
डीटॉक्स (Digital Detox)" च्या गरजेची जाणीव वाढते, कारण लोक सोशल
मीडिया पासून काही काळ दूर राहण्यासाठी प्रयत्न करतात.
समाज माध्यमांवरील वर्तन हे मोठ्या
प्रमाणात तंत्रज्ञानाच्या प्रभावाखाली असते. अल्गोरिदम वापरकर्त्यांचे वर्तन
घडवतात, सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या मुद्द्यांमुळे लोक काळजीत असतात, आणि वेळेच्या
गैरवापरामुळे उत्पादकता कमी होते. म्हणूनच, समाज
माध्यमांचा जबाबदारीने आणि संतुलित वापर करणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता (Digital
Literacy) आणि गोपनीयता संरक्षण उपाययोजना (Privacy
Protection Measures) यांचा अवलंब केल्यास तंत्रज्ञानाशी संबंधित घटकांचा समाज माध्यम
वर्तनावर होणारा नकारात्मक प्रभाव मर्यादित ठेवता येईल.
ड. मानसशास्त्रीय घटक
समाज माध्यमांच्या वापराने मानवी
वर्तनावर खोलवर परिणाम होतो. विशेषतः, सामाजिक
माध्यमांच्या सतत वापरामुळे मेंदूतील न्यूरोकेमिकल बदल होतात, मानसिक
आरोग्यावर प्रभाव पडतो आणि व्यक्तीच्या भावनिक स्थितीवर परिणाम होतो. खालील
मानसशास्त्रीय घटक समाज माध्यम वर्तनावर प्रभाव टाकतात:
1. डोपामिन प्रभाव (Dopamine
Effect): डोपामिन हा मेंदूत स्रवणारा न्यूरोट्रांसमीटर
आहे जो आनंद, प्रेरणा आणि बक्षीस प्रणालीशी संबंधित असतो (Schultz,
2015). सोशल
मीडियावरील लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्समुळे हा
न्यूरोट्रांसमीटर सक्रिय होतो आणि वापरकर्त्याला आनंदाची अनुभूती मिळते (Meshi
et al., 2013). ही सक्रियता मेंदूच्या "रिवॉर्ड सेंटर्स" म्हणजेच
वेंट्रल स्ट्रायटम (ventral striatum) आणि प्रीफ्रंटल
कॉर्टेक्स (prefrontal cortex) मध्ये उत्तेजन निर्माण करतात, ज्यामुळे सोशल
मीडियावर अधिक वेळ घालवण्याची प्रवृत्ती वाढते (Tamir &
Mitchell, 2012).
सोशल मीडियावर मिळणाऱ्या पॉझिटिव्ह
प्रतिक्रिया व्यक्तीच्या आत्मविश्वासावर आणि आनंदाच्या अनुभूतीवर प्रभाव टाकतात.
परंतु, याची सवय लागू शकते, आणि व्यक्ती अधिकाधिक सोशल
मीडियाच्या प्रतिसादावर अवलंबून राहते (Alter, 2017).
संशोधनात आढळले आहे की सोशल मीडिया व्यसन (Social Media
Addiction) वास्तविक आयुष्यातील आनंदावर परिणाम करू शकते आणि समाज माध्यमांपासून
दूर राहिल्यास काही लोकांना तणाव व अस्वस्थता जाणवते (Andreassen
et al., 2012).
सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे मेंदू आनंदासाठी बाह्य मान्यता (external
validation) शोधू लागतो. हे एक "डोपामिन लूप" तयार करते, जिथे वापरकर्ता
सतत नवीन लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्सच्या शोधात असतो.
याचा परिणाम म्हणून व्यक्तीच्या तणावाची पातळी वाढते आणि एकाग्रतेवर परिणाम होतो.
2. FoMO (Fear of
Missing Out): FoMO म्हणजे नवीन माहिती, ट्रेंड्स किंवा
समाजमाध्यमांवरील घडामोडी मिस होण्याची भीती (Przybylski et
al., 2013).
सोशल मीडियावर इतरांचे यश, आनंदी क्षण आणि सामाजिक घडामोडी
पाहिल्यानंतर काही लोकांना असे वाटते की ते काहीतरी गमावत आहेत. त्यामुळे असंतोष, नैराश्य आणि
असुरक्षितता वाढवू शकते (Stead & Bibby, 2017).
संशोधनानुसार, FoMO
हा अनेकदा
तरुणांमध्ये आणि नियमित सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात
आढळतो (Buglass et al., 2017). सतत सोशल मीडिया तपासण्याची सवय (checking
behavior) हे FoMO चे प्रमुख लक्षण मानले जाते. जसे-जसे
वापरकर्त्यांना नवीन माहिती मिळत राहते, तसतसे त्यांना
सोशल मीडियावर अधिक वेळ घालवण्याची आवश्यकता वाटते, अन्यथा ते
तणावग्रस्त आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागते. (Elhai et al., 2020).
FoMO
असलेल्या
व्यक्तींची झोपेची गुणवत्ता कमी होते, आत्मसन्मानावर
नकारात्मक परिणाम होतो आणि त्यांच्यात तणाव वाढतो. सतत ऑनलाइन राहिल्याने वास्तव
आयुष्यापेक्षा सोशल मीडिया अधिक महत्त्वाचा वाटू शकतो, ज्यामुळे
समाजामधील नातेसंबंधांवर परिणाम होतो.
3. साइबर बुलिंग आणि ट्रोलिंग (Cyberbullying
& Trolling): साइबर बुलिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला
ऑनलाईनद्वारे जाणूनबुजून अपमानित करणे, धमकावणे किंवा
मानसिक त्रास देणे. ट्रोलिंग हे यापेक्षा वेगळे असून, त्यामध्ये
कोणीतरी हेतुपुरस्सर उत्तेजक किंवा आक्षेपार्ह टिप्पण्या किंवा पोस्ट करतो, ज्यामुळे
दुसऱ्यांना राग येतो किंवा त्यांना भावनिक त्रास होतो (Buckels
et al., 2014).
संशोधनानुसार, तरुण आणि
किशोरवयीन मुले विशेषतः साइबर बुलिंगचे जास्त बळी ठरतात (Kowalski
et al., 2014). यामुळे नैराश्य, चिंता आणि
आत्महत्येच्या विचारांमध्ये वाढ होऊ शकते (Hinduja &
Patchin, 2018). सोशल मीडियावरील गुप्त ओळख (anonymity) आणि संवादातील
अभाव यामुळे लोकांना ट्रोलिंग आणि बुलिंग करणे सोपे वाटते (Suler,
2004).
साइबर बुलिंग आणि ट्रोलिंगमुळे आत्मसन्मान कमी होतो, भावनिक
अस्थिरता वाढते आणि बळी पडणाऱ्या व्यक्तींमध्ये सामाजिक अलिप्तता (social
withdrawal) वाढते. काही प्रकरणांमध्ये हे गंभीर मानसिक आजारांना कारणीभूत ठरू
शकते.
समाज माध्यम वर्तनावर मानसशास्त्रीय
घटकांचा मोठा प्रभाव आहे. डोपामिन प्रभावामुळे व्यक्ती सोशल मीडियावर सतत परत येते, FoMO
मुळे तणाव आणि
असंतोष वाढतो, तर साइबर बुलिंग आणि ट्रोलिंगमुळे मानसिक
आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. समाज माध्यमांचा संतुलित वापर आणि डिजिटल
वर्तनाविषयी जागरूकता वाढवणे गरजेचे आहे.
समारोप:
समाज
माध्यम वर्तन व्यक्तीच्या वैयक्तिक, सामाजिक, तांत्रिक आणि मानसिक घटकांवर अवलंबून असते.
ते सकारात्मक असल्यास व्यक्तीला माहिती, प्रेरणा आणि संधी
मिळू शकतात, परंतु नकारात्मक असल्यास मानसिक आरोग्यावर
विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणूनच संतुलित आणि जबाबदारीने समाज माध्यमांचा वापर
करणे गरजेचे आहे.
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
संदर्भ:
Alter,
A. (2017). Irresistible: The Rise of Addictive Technology
and the Business of Keeping Us Hooked. Penguin Press.
Andreassen,
C. S., Torsheim, T., Brunborg, G. S., & Pallesen, S. (2012). Development
of a Facebook Addiction Scale. Psychological Reports, 110(2),
501-517.
Auxier,
B., & Anderson, M. (2021). Social Media Use in 2021. Pew Research Center.
Bakshy,
E., Messing, S., & Adamic, L. A. (2015). Exposure to
ideologically diverse news and opinion on Facebook. Science, 348(6239),
1130-1132.
Bandura,
A. (1986). Social foundations of thought and action: A
social cognitive theory. Prentice-Hall.
Buckels,
E. E., Trapnel P. D., and.
Paulhus D. (2014). Trolls just want to have fun.
Personality and Individual Differences, 67, 97-102.
Buglass,
S. L., Binder, J. F., Betts, Lucy R., and Underwood, J. D.M. (2017).
Motivators of online vulnerability. Computers in Human Behavior, 66, 248-255.
Cadwalladr,
C., & Graham-Harrison, E. (2018). The Cambridge
Analytica Files. The Guardian.
Chou,
H. T. G., & Edge, N. (2012). "They are happier
and having better lives than I am": The impact of using Facebook on
perceptions of others' lives. Cyberpsychology, Behavior, and Social Networking,
15(2), 117-121.
Christakis,
N. A., & Fowler, J. H. (2007). The spread of obesity
in a large social network over 32 years. The New England
Journal of Medicine, 357(4), 370-379.
Cialdini,
R. B., Reno, R. R., & Kallgren, C. A. (1990). A focus
theory of normative conduct: Recycling the concept of norms to reduce littering
in public places. Journal of Personality and Social Psychology, 58(6),
1015.
Elhai,
J. D., Haibo, Y. and Montag, C. (2020). Fear of missing
out: Examining relations with negative affectivity, online social engagement,
and problematic smartphone use. Computers in Human Behavior, 102,
79-87.
Fardouly,
J., Diedrichs, P. C., Vartanian, L. R., & Halliwell, E. (2015).
Social Media and Body Image Concerns. Current Opinion in Psychology, 9, 1-5.
Festinger,
L. (1954). A theory of social comparison processes. Human
Relations, 7(2), 117-140.
Goffman,
E. (1959). The Presentation of Self in Everyday Life.
Doubleday.
Gomez-Uribe,
C. A., & Hunt, N. (2015). The Netflix Recommender
System: Algorithms, Business Value, and Innovation. ACM Transactions on
Management Information Systems (TMIS), 6(4), 1-19.
Hinduja,
S., & Patchin, J. W. (2018). Connecting adolescent
suicide to the severity of cyberbullying and bullying victimization. Journal of
School Violence, 17(4), 349-360.
Kokolakis,
S. (2017). Privacy attitudes and privacy behaviour: A
review of the literature. Computers & Security, 64, 122-134.
Kowalski,
R. M., Giumetti, G., Schroeder, Amber and Lattanner, Micah (2014).
Cyberbullying among college students: Evidence from multiple domains of
college life. Misbehavior Online in Higher Education, 7(2),
293-319.
Kross,
E., Verduyn, P., Demiralp, E., Park, J., Seungjae Lee, D., Lin, N., ... &
Ybarra, O. (2013). Facebook Use Predicts Declines in
Subjective Well-Being in Young Adults. PLoS One, 8(8), e69841.
Meier,
E. P., & Gray, J. (2014). Facebook Photo Activity
Associated with Body Image Disturbance in Adolescent Girls. Cyberpsychology,
Behavior, and Social Networking, 17(4), 199-206.
Meshi,
D., Morawetz, Carmen and Heekeren, H.R. (2013). Nucleus
accumbens activation mediates the influence of social media feedback on
self-related decisions. Science Reports, 3, 3011.
Papacharissi,
Z. (2011). A Networked Self: Identity, Community, and
Culture on Social Network Sites. Routledge.
Pariser,
E. (2011). The Filter Bubble: What the Internet is Hiding
from You. Penguin Books.
Perloff,
R. M. (2014). Social Media Effects on Young Women’s Body
Image Concerns. Sex Roles, 71, 363-377.
Prinstein,
M. J., & Dodge, K. A. (2008). Understanding peer
influence in children and adolescents. Guilford Press.
Przybylski,
A. K., Murayama, Kou, DeHaan, Cody R., and Gladwell, Valerie (2013).
Motivational, emotional, and behavioural correlates of fear of missing
out. Computers in Human Behavior, 29(4), 1841-1848.
Schultz,
W. (2015). Neuronal reward and decision signals. Learning
& Behavior, 43(3), 293-305.
Stead,
H., & Bibby, P. A. (2017). Personality and fear of
missing out. Personality and Individual Differences, 115, 46-50.
Suler,
J. (2004). The online disinhibition effect. Cyber Psychology
& Behavior, 7(3), 321-326.
Tamir,
D. I., & Mitchell, J. P. (2012). Disclosing
information about the self is intrinsically rewarding. Proceedings of the
National Academy of Sciences, 109(21), 8038-8043.
Twenge,
J. M., Joiner, T. E., Rogers, M. L., & Martin, G. N. (2018). Increases
in Depressive Symptoms, Suicide-Related Outcomes, and Suicide Rates Among U.S.
Adolescents. Clinical Psychological Science, 6(1), 3-17.
Verduyn,
P., Ybarra, O., Résibois, M., Jonides, J., & Kross, E. (2017).
Social Media Use and Well-Being: What We Know and What We Need to Know.
Current Directions in Psychological Science, 26(6), 527-532.
Zuboff,
S. (2019). The Age of Surveillance Capitalism.
PublicAffairs.
खूप छान मांडणी सर
उत्तर द्याहटवा